निसर्ग माझा मित्र वर मराठी निबंध | Nisarg Maza Mitra Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण निसर्ग माझा मित्र मराठी निबंध बघणार आहोत. 'निसर्ग' हा शब्द उच्चारताच तन-मनाची दालनं पटापट उघडू लागतात, डोळे भावविभोर होतात , कान सावध होतात , बोटे ठेका धरू लागतात.मनमयुर नाच लागतो कुठल्यातरी जादूनगरीत जाऊन पोहोचल्यासारखं सार घडत नकळत शब्द गुंफले जातात.
“कलावंत तू, मूर्तिमंत तू
गुरूणाम् गुरू तू
जिवलग सखा तू
हृदयी तुझ्या सौंदर्य पाजळे
धरणी अन् आसमंतही उजळे..."
निसर्गाने रेखाटलेलं सृष्टीचं चित्र अद्भुतरम्य आहे.चैतन्य , सौंदर्य आणि समृद्धी यांचा तो त्रिवेणी संगम आहे. त्यात मातीचा मृदगंध , नाचऱ्या फुलांचा सुगंध , झऱ्यांची गाणी, नटलेली धरणीराणी, ओली वर्षाराणी, झरझरणाऱ्या पर्जन्यसरींचा पदन्यास, ढगांचा गडगडाट, विजेचे नर्तन , विहंगांचे मंजूळ कूजन, नदीची खळखळ, पानांची सळसळ , सागराची गर्जना , हे सारं निसर्गाच्या चित्रात आहे, अंतरंगात आहे.
विविध रंग जाई व जुई आहे. सौंदर्यफुलांचा सडा पडलेला आहे. त्यावर फुलपाखरांचं भिरभिरणं चालू आहे. हिरवा पोपट आहे. पंचरंगी मिठ्ठ आहे. अनेक पक्षी आहेत. ग्रह, उपग्रह, चांदण्या, तारे, चंद्र, सूर्य, पर्वत , नद्या, डोंगर असं खूपसं काही रंगविणारा हा महान चित्रकार मनाला भुरळ घातल्याशिवाय कसा राहील बरे? कविवर्य केशवसूत म्हणतात
“असे सुंदरता जरि अढळ कोठे तरी करी ती सृष्टीत मात्र वास
पहा मोहील सर्वदा ती तुम्हास" असा हा निसर्ग! या निसर्गाने आपल्याला सुख दिले , समृद्धी दिली, संस्कार दिले. निसर्गाचे ऋण मानव कधीच फेडू शकणार नाही. निसर्ग म्हणजे परमेश्वराचे मूर्तिमंत काव्य आहे.ते चिरंजीव आहे, चिरंतन आहे, अक्षय आहे.
झाडावरची फुले म्हणतात, हसा झाडे म्हणतात- जगा आणि जगू द्या, नद्या म्हणतात- परोपकार हेच जीवन , सूर्य म्हणतो- प्रकाशमान व्हा.सागर म्हणतो अथांग व्हा , विशाल व्हा. 'नि:स्वार्थ जगा' हेच सारा निसर्ग आपल्याला ओरडून सांगत असतो.
कोलकत्त्याच्या बॉटनिकल गार्डनमध्ये एक झाड आहे. त्या एकाच झाडला विविध आकाराची पाने आहेत.एकासारखे दुसरे पान नाहीच मुळी ! त्या झाडाला म्हणतात 'पगला पेड'. पाहणारा मात्र आनंदाने पागल होतो.
निसर्गच आपल्याला हवा, अन्न, पाणी देतो. प्रेम व सौंदर्य मुक्तपणे उधळतो. कधी लहरीपणाही दाखवितो. दुष्काळ, भूकंप , महापूर असं रौद्र रूप घेऊन येतो? क्षणात चित्र बदललं जातं , असा हा निसर्ग सृजनशीलता, क्षमाशीलता आणि समानता यांची शिकवण धरणीमाता देते.
एक एक अंकुर फुलवीत हिरवीगार होते.पेरलेल्या एका दाण्यातून धान्याच्या राशी तयार होतात.वसुधा ही निसर्गाची सम्राज्ञी आहे. मातीच्या कुशीत जन्म होतो, वाढ होते अन् अंतिम चिरनिद्राही याच मातीच्या कुशीत आपण घेतो.राजा वा रंक कोणताही भेदभाव ही धरती करीत नाही. वृक्ष छाया देतात.फळे , फुले देतात .
दुसऱ्यांसाठी जगतात . नद्या आपले पाणी स्वतः पित नाही. परोपकार निसर्गाच्या कणाकणात व्यक्त होतो. म्हणूनच निसर्ग एक गुरू आहे. मुक्त हस्ताने शिक्षण देणारा.
ओंजळ मात्र आपण रिती ठेवायला नको. मुंग्यापासून ऐकी, जाळे विणणाऱ्या कोळ्यापासून जिद्द व परिश्रम , पर्वताची भव्यता, चंद्राची शीतलता, सूर्याची उज्वलता हे सारं निसर्गात जे जे आहे ते जीवनात आणायचं आहे. निसर्ग मित्र म्हणून सदैव मदतीला तत्पर आहे.
जेव्हा भावना अनावर होतात , हृदयाच्या गाभाऱ्यातल्या तारा तटातट तुटून सूर जुळत नाहीत, तेव्हा एकाकी झालेलं मानवी मन दूर कुठे तरी एकटं निसर्गाच्या सहवासात जाऊन हळूच आपल्या अश्रृंना वाट मोकळी करून देतं.
मग तो समुद्रकिनारा असेल किंवा शीतल चंद्र साक्षीला घेऊन आलेली शांत रात्र असेल. मूक निसर्ग, मूक भावना यांच्यात अबोलानंच बरचसं संभाषण होतं. अन् मनातल वादळ शांत होत .“जीवनाचे मर्म उलगडले निसर्गाची साक्ष पटली,
निसर्ग 'सखा' माझा आशेचे कलश भरले, सारी निराशा मिटली" भौतिक सुखासाठी आज मानव निसर्गावर विजय मिळवू पाहत आहे. पण तो विसरत आहे की निसर्ग आपल्याला एक प्रश्न विचारीत आहे - 'माणसा, माणसा कधी होशील तू 'माणूस'? ' निसर्गाच्या स्वाधीन व्हा. स्वच्छंद जगा.
दुसऱ्यांसाठी जगा. सारे रंग, सारं सौंदर्य डोळ्यांत साठवा, मन समृद्ध करा , कोणाला दुखवू नका, अनमोल जगा, मातीमोल होऊ नका असा संदेशाचा नजराणा देणारा निसर्ग मला खूप खूप आवडतो, मन बेहोश होतं त्याच्या सहवासात.
"हिरवे हिरवेगार गालीचे
हरित तृणांच्या मखमालीचे....'
निसर्गाने रंगांची अशी उधळण केली आहे की वर्णन करायला शब्द थिटे पडतात. शुभ्र आकाशगंगा तर निळसर पांढरी शुक्रचांदणी, मंगळाची प्रभा लालसर पिवळी अन् सप्तरंगानं नटलेलं इंद्रधनुष्य......रंगाचा मनोज्ञ संगम..... म्हणूनच बालकवी म्हणतात
“वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले, नभोमंडपी कुणी भासे" निसर्गाला शतशः नमन! “दिव्यत्त्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती!...."मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद