पुस्तके नसती तर मराठी निबंध | Pustake Nasti Tar Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पुस्तके नसती तर मराठी निबंध बघणार आहोत. आपल्या देशात भरपूर प्रकाशाचे दिवस आहेत. विपुल अशी साहित्यसंपदा आहे. २३ एप्रिल २००१ ते २२ एप्रिल २००२ हे वर्ष सरकारने 'पुस्तक वर्ष' म्हणून जाहीर केले. 'सर्वांसाठी पुस्तके आणि पुस्तकांसाठी सर्व', हे त्या वर्षांचे घोषवाक्य होते.
शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये पुस्तक-वाचनाला प्रोत्साहन देण्यात आले. पुस्तक पेढीची स्थापना करण्यात आली. ग्रामीण वाचनालय चळवळीस पाठिंबा देण्यात आला. लेखक व मुले यांच्यात परस्पर चर्चा घडविण्यात आली.
पुस्तक-प्रदर्शनांवर भर देण्यात आला. सरकार, पुरस्तर्के, प्रकाशक, ग्रंथालये, नॅशनल बुक ट्रस्ट यांसारख्या संस्था पुस्तके उपलब्ध करून देतात. अशा या विकसनशील देशात ज्ञानसमृद्धीसाठी प्रयत्न होत असताना मनात विचार आला, पुस्तके नसती तर... खरंच, फारच भयंकर कल्पना आहे.
पुस्तके नव्या जगाचे, नव्या विचारांचे दरवाजे उघडतात. सभोवतालच्या संकुचित जगापलीकडचे जग, संस्कृती, जीवनात डोकावण्याची संधी देतात. मग पुस्तके नसती, तर ही संधी मिळाली असती? वाचकांची ज्ञानसमृद्धी करणाऱ्या, बुद्धीला खाद्य व चालना देणाऱ्या पुस्तकांना, ती नसती तर, अशी कल्पना करायची? अहो, पुस्तके नसती, तर घडणाऱ्या घटनांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहताच आले नसते.
प्रत्येक वेळी घटनेचा नवा अर्थ सापडला नसता. सर्जनशीलतेचा आगळा-वेगळा आनंद हिरावला गेला असता. सुसंस्कृतपणा माणसाचे लक्षण ! पुस्तकांअभावी माणूस असंस्कृतच राहिला असता. आपल्या भोवतालचे जग विविधतेने नटलेले आहे.
निसर्ग आणि प्राणी यांनी नटलेली सृष्टी आहे. माणसांचे बहुरंगी जीवन आहे. व्यक्तिगत कौटुंबिक सुख-दु:खे आहेत. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक नातेसंबंध आहेत. या साऱ्यांची निर्मिती आहे. गोष्टी. घडणे-बिघडणे सुरूच आहे. त्यातच राष्ट्राचा इतिहास, परंपरा यांच्या जोडीने वर्तमानपत्रे असतात.
माणसाची भवितव्याची स्वप्ने असतात. ही स्वप्ने पुस्तके थोड्या खर्चात नि मेहनतीने पूर्ण करू शकतात. हे सारे पुस्तके नसती, तर झाले असते साध्य ? समाजाची प्रगतीच थांबली असती. माणसाने स्वप्नेच बघितली नसती.
विद्वान गुरू भेटेल-न भेटेल, संवाद करण्यासारखा मित्र भेटेल-न भेटेल, स्वतंत्रपणे अचूक विचार करता येण्यासारखे शिक्षण मिळेल-न मिळेल, सहज घेता येण्यासारखे अनुभव मिळतील-न मिळतील; पण पुस्तकांसारखा मित्र मात्र दुसरा नाही.
पुस्तके नसती, तर मिळाला असता असा मित्र? व्यास, वाल्मिकी यांनी रामायण, महाभारतासारखे ग्रंथ लिहन ठेवले. आजही आपण त्यांतील ज्ञान मिळवू शकतो. साहित्य-खजिना फार समृद्ध आहे. आज संगणकापासून पाककलेपर्यंत अनेक ग्रंथ आपल्याला पदोपदी मार्गदर्शन करतात. हे मार्गदर्शन मिळाले असते? तेव्हा माणसाला सुसंस्कृत बनविणारी पुस्तके नसती तर? भयंकर चित्र साकारतंय खरं! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद