समाजप्रबोधन झालेच पाहिजे मराठी निबंध | SAMAJPRBODHAN ESSAY IN MARATHI

 समाजप्रबोधन झालेच पाहिजे मराठी निबंध | SAMAJPRBODHAN  ESSAY  IN  MARATHI


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण समाजप्रबोधन झालेच पाहिजे मराठी निबंध बघणार आहोत. अनेक व्यक्तींचा मिळून समाज बनतो. समाजावर रूढी, परंपरा यांचा पगडा असतो. अंधश्रद्धेने त्याच्या प्रगतीला खीळ घातलेली असते. असा समाज आपल्या मतांवर ठाम असतो. 


रूढि-परंपरांच्या विळख्यातून स्वत:ची सुटका करून घेण्याची त्याची इच्छा नसते. त्यामुळे सामाजिक क्रांती एका दिवसात होत नाही; तर ती कासवाच्याच गतीने होते. जेव्हा समाजात अनाचार वाढतो, तेव्हा कोणीतरी अवतारी पुरुष जन्म घेतो आणि तो या समाजाचे प्रबोधन करतो. संत हे समाजाचे खरे शिक्षक बनतात.


संत ज्ञानेश्वरांना संन्याशाची पोरे म्हणून लोकांनी वाळीत टाकले, त्यांचा छळ केला. पण चमत्काराशिवाय नमस्कार नाही, या न्यायाप्रमाणे निर्जीव भिंत चालविणे, पाठीवर माडे भाजणे, रेड्याच्या तोंडन वेद म्हणविणे, यासारख्या त्यांनी केलेल्या चमत्कारांनी लोक प्रभावित झाले. 


त्यांनी केलेले चमत्कार म्हणजे जादूटोणा नव्हे तर, लोकांच्या प्रबोधनासाठी त्यांनी हे योग सामर्थ्याने घडवून आणले. आणि मग हळूहळू लोकांचे प्रबोधन घडू लागले. ज्या समाजाने त्यांचा छळ केला, त्या समाजासाठी त्यांनी विश्वेश्वर देवाकडे पसायदान मागितले. “जे जे वांछील ते तो लाहो प्राणिजात." समाजाला आपली चूक कळून, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्यास सिद्ध होणे, म्हणजेच समाजप्रबोधन.


संत तुकारामांनी रूढी, परंपरा, भोंदूपणा यासारख्या मानवी दोषांची परखड शब्दांत कानउघाडणी केली. नाठाळाच्या माथी हाणू काठी' म्हणून प्रहार केला. सर्वसामान्यांच्या जवळ गेलेला, त्यांच्या रोजच्या दु:खाशी समरस होणारा दुसरा संतकवी नाही.

जे का रंजले गांजले, 

त्यांसि म्हणे जो आपुले '

 तोचि साधु ओळखावा, 

देव तेथेचि जाणावा।


सर्व संप्रदायांच्या ढोंगीपणाचा व धर्मांधतेचा बुरखा फाडणे, ही एक मोठीच मर्दुमकी होती. संत म्हणून आपली प्रबोधनकाराची भूमिका पार पाडताना त्यांचा जबरदस्त आत्मविश्वास होता. ते खालील अभंगात म्हणतात -


"मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास।

कठीण वज्रास भेदू ऐसे॥ 


संतांनी आपल्या सर्वच प्रकारच्या लेखनातून दुर्गुणांवर प्रहार करून सद्गुणांची जोपासना करण्याचा आग्रह धरलेला आहे. समाजजीवन दु:खमय नव्हे; तर आनंदमय होण्यासाठी सद्विचारांची स्थापना व्हायला हवी. याचसाठी संतवाङ्मयात संतवचने आलेली आहेत. रामदासांनी 'दासबोध' व 'मनाचे श्लोका'यांतून लोकांचे प्रबोधन केले आहे.


मना चंदनाचे परी त्वां झिजावे।

 परी अंतरीं सज्जना नीववावे॥

मरावे परी कीर्तिरूपी उरावे। 


समाजाच्या अंधश्रद्धा, कर्मठ जीवनपद्धती, कर्मकांड, शब्दप्रामाण्य, पुस्तकी पांडित्य, वैयक्तिक नैतिकता, यांवर त्यांनी हल्ला केलाच; परंतु लोकांच्या दोषांवर प्रहार केले. त्यात लेकरांना मारणारे स्वार्थी आई-बाप, हुंड्याने मुली विकणारे, खराब कविता लिहिणारे, नवसाने पुत्रप्राप्ती करणारे, जोगी, ज्योतिषी, तंबाखूसेवन करणारे, हिंसक या सर्वांवर टीका करून त्यांना सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला.


संत एकनाथांनी पदे, आरत्या, भारुडे यांतून समाज-प्रबोधन केले. त्यासाठी व्यवहारातील उदाहरणे घेऊन मनोरंजक पद्धतीने भारुडे सादर करून समाजाचे प्रबोधन केले.‘इंचू चावला, इंचू चावला!' 'रोडगा वाहीन तुला', 'दादला नको गं बाई' अशा प्रकारची भारुडे त्यांनी समाज-प्रबोधनासाठीच रचली. \


आधुनिक संत गाडगेमहाराज यांनीही समाजातील वाईट प्रथांपासून समाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी कीर्तन ह्या प्रकाराचा वापर केला. समाजप्रबोधन झालेच पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्या संतांनी आपल्या ग्रंथांतून दिलेली शिकवण उद्याच्या पिढीसमोर ठेवणे, हे विचारवंतांचे काम आहे.


“काय वानू मी संतांचे उपकार ! 

मज निरंतर जागविती।' 

                                                      हे संत तुकोबांचे वचन पुन्हा प्रत्ययाला येतील. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद