सत्याचा विजय होतो मराठी निबंध | Satyacha Vijay Hoto Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सत्याचा विजय होतो मराठी निबंध बघणार आहोत. "सत्यम् शिवम् सुंदरम्” सत्य हे शिव आहे, सुंदर आहे. सत्य म्हणजे खरेपणा. जगात सत्याचाच विजय होतो, हे सिद्ध झालेले आहे. भारताच्या संस्कृतीत सत्य हे आदर्श तत्त्व मानले आहे.
जहाँ सत्य, अहिंसा और धरम का पग-पग लगता डेरा
वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा ।
म्हणूनच सत्यमेव जयते'
हे न्याय-प्रक्रियेचे बोधवाक्य आहे. न्यायदेवतेने सत्याचीच कास धरली आहे. तिच्या हातात तराजू आहे. सर्वांना समान न्याय मिळावा, हीच तिची इच्छा आहे. 'सत्य' ही एक शाश्वत गोष्ट आहे. सत्य कधीही लपून राहत नाही. ते कधी ना कधी प्रकट होतेच. सत्य हे एखाद्या ओंडक्यासारखे असते. ओंडका कितीही दाबून धरला, तरी हात सोडल्यावर तो तितक्याच वेगाने वर उसळी मारतो.
पूर्वी राजा हरिश्चंद्र सत्यवादी म्हणून प्रसिद्ध होता. सत्यामध्ये प्रचंड ताकद आहे. म्हणूनच जे शाश्वत आहे, जे शक्तीशाली आहे, तेच चिरंतन असते. असत्य कापराच्या वडीप्रमाणे जळून भस्म होते. एवढे हे प्रभावी साधन जीवनात खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच महात्मा गांधीजींनी सत्याचे प्रयोग केले.
त्यांच्या लहानपणी त्यांनी राजा हरिश्चंद्र' हे पुस्तक वाचले होते. त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला. एकदा त्यांनी असत्याने वागून चूक केली होती. ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली. तेव्हापासून त्यांनी सत्याची कास धरली. गौतम बुद्ध म्हणतात -
"जो सत्याचरणी आहे, तोच खरा सुखी असतो." ही गोष्ट गांधीजींना पटली व त्यांनी कधीही असत्याची साथ दिली नाही.आयुष्यात खोटे बोलण्याची सवय लागली, तर ती जित्याची खोड बनते. एक खोटे बोलले, की सतत खोटे बोलावे लागते. खरे बोलण्याचा फायदा असा की, आपण कोणापाशी काय बोलतो, हे लक्षात ठेवायची गरज नसते.
पण सतत खोटे बोलणारा नेहमीच उघडा पडतो. त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नसते. एकदा विश्वास गमावला, की तो कधीच कमावता येत नाही. विश्वासाच्या पायावर जीवनाची इमारत उभी राहते. पायाच कच्चा असेल, तर इमारत ढासळणारच. याचाच अर्थ सत्याचाच नेहमी विजय होतो.
एक धनगर नेहमी खोटे बोलून लोकांना सांगायचा, 'लांडगा आला रे'. लोक हातात काठ्या, कंदील घेऊन त्याच्या मदतीला धावायचे. पण तेथे गेल्यावर लोकांना समजायचे की, ती गंमत होती; खोटे होते. पण खरेच त्याच्यावर तशी वेळ आली, तेव्हा मात्र त्याच्या मदतीला कोणीही नाही आले.
सत्यासारखा धर्म नाही, सत्यापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे काही नाही; आणि असत्यापेक्षा भयंकर असे जगात काहीच नाही, असे महाभारतातील वचन आहे. धर्मराजाने जेव्हा 'नरो वा कुंजरोवा' असे विधान केले, तेव्हा त्याचा रथ जमिनीवर येऊन आदळला. तो रथ जमिनीपासून नेहमी चार बोटे वर चालायचा.
सत्याला कल्पना-जगतात स्थान नाही. कारण सत्य शोधणारा कल्पनेच्या जगात कधीच वावरत नाही, वावरणार नाही. सत्य म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती. म्हणून नेहमी सत्याचे आचरण करावे. सत्य हाच वाणीतील मध व सत्य हाच धर्मातील प्राण होय; म्हणून त्यातूनच विश्वप्रेमाचा जन्म होतो.
गौतमबुद्धाने म्हणूनच धर्माच्या शिकवणुकीत सत्याला महत्त्व दिले. स्वामी विवेकानंद यांनी नेहमी सत्याचाच पाठपुरावा केला. ते म्हणतात, “सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग होऊ शकेल; परंतु सत्याचा मात्र कोणत्याही गोष्टीसाठी त्याग होऊ शकत नाही." म्हणूनच सत्याने वागावे. सत्यात फार मोठी ताकद आहे; म्हणूनच नेहमी सत्याचाच विजय होतो.
"सत्यमेव जयते ।”मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद