स्वयंपूर्ण खेडी-काळाची गरज मराठी निबंध | SAVYANPUN KHEDI KALACHI GARAJ ESSAY IN MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वयंपूर्ण खेडी-काळाची गरज मराठी निबंध बघणार आहोत. स्वयंपूर्णता याचा अर्थ स्वत:च्या गरजा स्वत:च भागविण्याची क्षमता. आजची खेडी स्वयंपूर्ण नाहीत, ही खरे तर खेदाची गोष्ट आहे.
आपण स्वतंत्र होऊन साठपेक्षा अधिक वर्षे झाली, तरीही खेड्यांची दुरवस्था पाहन खूप वाईट वाटते. आज खेड्यांमध्ये अनेक समस्या आहेत. शिक्षण, वैद्यकीय सोयी, बाजारपेठ, उद्योगधंदे, करमणूक, कलागुणांचा विकास व वाव यांचा अभाव तर आहेच; रस्ते, दळणवळणाची साधने, प्रबोधन, वीज इ. बाबतही सुधारणा नाही. __
आज खेड्यांच्या या स्थितीचा आढावा घ्यायचा झाले, तर लक्षात येईल, की एकीकडे आम्ही २१ वे शतक पार करीत आहोत. नवनवी आव्हाने स्वीकारून ती पेलली जात आहेत. प्रगती ही मानवाची खरी कसोटी. इंग्रजपूर्व काळात तर शहरे फार नव्हतीच.
खेड्यांनी बनलेला हा भारत देश. तेव्हा खेडी स्वयंपूर्ण होती. याचे प्रमुख कारण म्हणजे बलुतेदार पद्धत. बारा बलुतेदार आपली कला वापरून गावासाठी उपयोगी वस्तू बनवत असत. त्यासाठी फार मोठी पैशांची गरज नसे. वस्तु-विनिमयाच्या रूपात खरेदी-विक्री होत असे. खूप फायदा मिळवायचा, धंद्यात जम बसवायचा, यासाठी कोणतीही स्पर्धा नव्हती.
जे काही मिळेल, त्यात सगळे सुखी-समाधानी होते. पिढीजाद व्यवसाय असे, त्यामुळे लहानपणापासूनच घरातील कला-कौशल्य अवगत असे. तेव्हा खेड्यातील गरजा कमी होत्या; पण त्या गावातल्या गावातच भागात असत. यालाच ग्रहण लागले. खेडी ओस पडू लागली. __
औद्योगिक क्रांतीचे पडसाद ग्रामीण जीवनावर उमटले. लोकांनी पिढीजाद धंदे सोडून दुसऱ्या कामासाठी शहरांत धाव घेतल्याने पिढीजाद कौशल्ये लयास गेली. झाले ते झाले ! आता यापुढे तरी लोकांनी 'चला खेड्याकडे' या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे. पण त्यासाठी खेडी स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. स्वयंपूर्ण खेडी ही काळाची गरज आहे.
आज शहरातील लोकसंख्या वाढत असल्याने सुख-सुविधा सर्वांपर्यंत पोहोचत नाहीत. शहरे बकाल होत चालली आहेत. स्वच्छता नसल्याने रोगराई, गर्दी असल्याने अपघात, झोपडपट्ट्या, यांमुळे शहरे वेडीवाकडी फुगत चालली आहेत. या साऱ्याला आळा घालण्यासाठी खेडी स्वयंपूर्ण बनली पाहिजेत.
छोट्या गावातच सर्व सुविधा उपलब्ध झाल्या, तर शहराकडे जाण्याचे आकर्षण थांबेल. आज शिक्षण, नोकरी, उद्योग-धंदा, वैद्यकीय सेवा, दळणवळणाचा अभाव त्यामुळे बाजारपेठेपर्यंत न पोहोचता आल्याने गावातच कमी किंमतीत माल विकावा लागतो. या साऱ्यासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागते.
शेतीसाठी जमीन थोडी असल्याने शेतीतून मिळणारे उत्पन्न पुरेसे नसते; त्यामुळे पूरक व्यवसाय करावे लागतात. पण त्यासाठी भांडवल नाही, ग्राहक नाही. यामुळे हंगाम संपल्यावर हाताला काम नसल्याने शहरात काम शोधण्यासाठी यावे लागते.
हीच सुविधा खेड्यांत मिळाली, तर लोक खेड्यांतच स्थिरावतील. खेडी स्वयंपूर्ण होणे, ही काळाची गरज आहे. ही गरज पूर्ण न झाल्यास संपूर्ण देशाचाच समतोल ढासळेल. खेडी अस्तित्वातच राहणार नाहीत.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद