शाळेतल्या नाटकातील माझी भूमिका मराठी निबंध | Shalechya Natkatil Mazi Bhumika Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शाळेतल्या नाटकातील माझी भूमिका मराठी निबंध बघणार आहोत. स्नेहसंमेलन जवळ आले, की शाळेतील उत्साहाचे वातावरण अधिकच उत्साही बनते. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. वर्गावर्गाचे कार्यक्रम बसविले जातात.
आपल्याला नटायला मिळणार, नेहमीपेक्षा वेगळी वेशभूषा, कार्यक्रमांच्या तालमी, अभ्यासाला सुटी, अशा कितीतरी आनंददायी गोष्टी त्या काळात खुणावतात आणि सुखावतात. आमच्या वर्गशिक्षिका खूप उत्साही आणि हरहुन्नरी आहेत.
त्या कार्यक्रम उत्तमच बसवतात. त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळावे, म्हणून मी यंदा नाटकात भाग घ्यायचे ठरविले. बाईंच्या मागे सारखी भुणभुण लावली. माझी चिकाटी पाहून बाईंनी मला एक छोटीशी भूमिका दिली-अर्थात अनेक अटींवर. मला तेव्हा त्यांच्या सगळ्या अटी मान्य होत्या; कारण मला नाटकात भूमिका करायची होती.
दुसऱ्या दिवशी आम्हा नाटकातल्या सगळ्या पात्रांना बाईंनी एकत्र यायला सांगितले. प्रथम नाटकाचा विषय, कथानक नीट समजावून सांगितले. आम्हाला कोणाला कोणती भूमिका करायची, हेदेखील सांगितले. प्रत्येकाला संहिता दिली.
आमचे आधी संहितावाचन झाले. प्रत्येक शब्द, वाक्य कसे म्हणायचे, याची तालीम सुरू झाली. आमचे पाठांतर झाल्यावर नाटक उभे राहण्यासाठी आम्हाला कोणी, कसे आणि कोठे उभे राहायचे. संवादफेक कशी करायची, एकमेकांना प्रतिसाद कसा द्यायचा, चेहऱ्यावरील भाव कसे व्यक्त करायचे, हातवारे कसे करायचे वगैरे बाईंनी शिकविले.
प्रेक्षकांकडे पाठ करायची नाही; दुसरे पात्र बोलत असताना आपला त्याच्या वाक्यांशी काही संबंध नाही, असे होता कामा नये. तेव्हा आपल्याही चेहऱ्यावर हावभाव असले पाहिजेत. थोडक्यात, देहबोली कशी असावी, याची माहिती दिली जात होती. मी कधीतरी नुसताच उभा राही, तेव्हा बाई म्हणायच्या, “अरे, ठोकळ्यासारखा उभा राहू नकोस.
काहीतरी प्रतिक्रिया दे." मी त्या नाटकात अकबर राजाची भूमिका करत होतो. माझी उंची, देहयष्टी, रंग एकंदरीत त्या भूमिकेला योग्य अशी होती. प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग करण्याचा दिवस उजाडला. रंगमंचावरील दिवे लागले. पडदा उघडला. दरबाराचे दृश्य होते.
रंगमंचावर प्रवेश करून मी सिंहासनावर विराजमान होऊन माझी वाक्ये म्हणणार होतो. विंगमध्ये बाईंनी सूचना दिल्या होत्याच. मी रंगमंचावर प्रवेश तर झोकात घेतला; पण माझा तो राजाचा पोषाख, त्या जडावा सगळेच काहीतरी विशेष वाटायला लागले. समोरच्या प्रेक्षकांचे डोळे माझ्याकडे रोखलेले पाहताच माझी घाबरगुंडी उडाली.
मला काही सुचेना. मी बाईंच्या शब्दांत ठोकळ्यासारखा सुन्न उभा. मी सिंहासनावर बसल्याशिवाय पुढच्या पात्रांना त्यांची वाक्ये म्हणता येईनात. मी एकदम सुन्न झालेलो. माझा सहकलाकार तयारीचा. त्याने समयसूचकता दाखवून तो म्हणाला,
“महाराजांचा विजय असो, महाराज आपण सिंहासनावर विराजमान व्हावे. महाराज, आपल्या मनात आत्ता नेमके हेच चालले आहे ना ! असे म्हणून माझे वाक्य त्यानेच म्हटले. अशा प्रकारे एकही वाक्य न म्हणता, माझे नाटक संपले. ती माझी पहिली नि शेवटची भूमिका. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद