शेतकऱ्याचा दिनक्रम मराठी निबंध | SHETKARYACHA DINKARAM ESSAY IN MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शेतकऱ्याचा दिनक्रम मराठी निबंध बघणार आहोत. चला, आज मी तुम्हाला तुमच्या एका मित्राकडे नेणार आहे. हो, हो मित्रच. तो नुसता मित्रच नाही, तर आपला अन्नदाता आहे. त्याचे जीवन आपल्या जीवनापेक्षा किती भिन्न आणि कष्टाचेसुद्धा असते. अरे,
मी सांगून काय उपयोग? प्रत्यक्षच बघा ना ! चला, निघायचं ना? चला खास बैलगाडी आलीय आपल्यासाठी. घाबरू नका. तुम्हालाही कळेल ना बैलगाडीत बसल्यावर कसे वाटते ते. आम्ही जांभुळपाडा येथे गेलो. पहाटेची वेळ होती. झुंजुमुंजू झाले. कोंबडा आरवला. गावात काळोख होता. वाटले, सगळे झोपलेले असतील.
पण छे ! प्रत्येक घरात कंदिलाच्या प्रकाशात दिवसाची सुरुवात झालेली. चहा पिऊन, प्रातर्विधी उरकून हे शेतकरी अंधारातच आपल्या बैलांना घेऊन शेतात चाललेत बघा. तेवढ्यात गावातल्या स्त्रियांनी आम्हाला पाहिले आणि चहा प्यायला बोलविले. त्यांच्या घरात गेलो.
घरे अगदी साधी. गरजेच्याच वस्तू घरात. शोभेच्या वस्तू किंवा फर्निचराने नटवलेले घर नाही. तरीही अगत्य, आदरातिथ्य. त्यांच्या प्रेमळ आदरातिथ्याचा स्वीकार करून आम्हीदेखील शेतावर गेलो. शेतात नांगराला बैलांना जुंपून नांगरणीचे काम सुरू झालेले.
नांगरणी करताना शेतातील मातीची ढेकळे फुटून माती भुसभुशीत होत होती. शेतकऱ्याचे काम किती कष्टाचे असते, हे लक्षात आले. घाम गाळल्यानंतर दुपारी कांदा-भाकर त्यांच्या पुढ्यात येते. हात-पाय धुवून झाल्यावर एक घागर भरून घेऊन झाडाखालीच न्याहारी सुरू झाली.
तृप्तीची ढेकर दिली. वाटले, आता शेतकरी आडवा होऊन विश्रांती घेईल. पण छे ! त्याने बैलांना पाणी पाजले, चारा घातला, गाईंना चारा घातला आणि शेळ्या-मेंढ्यांना चरायला सोडले. आल्यावर दोर वळणे, शेतातील तण काढणे, बी-बियाण्याची निगा राखणे, असे काही ना काम होतेच. संध्याकाळपर्यंत शेतकरी कामच करीत होता. सूर्यास्त झाला. अंधार पडला. शेतकरी गुरांना घेऊन घरी परतला. संपला दिवस. रात्रीचे भोजन होऊन झोप.
नांगरणी, पेरणी, काढणी, निंदणी, खुरपणी, राखण अशी काही ना काही कामे त्याला करावीच लागतात. खरीपाचा हंगाम झाल्यावर जमिनीतून भाजीपाला काढावा लागतो. नुसत्या शेतीवर भागत नाही; म्हणून पूरक व्यवसाय करावे लागतात.
पशुपालन, कुक्कुटपालन अशा प्रकारचे व्यवसाय केल्याशिवाय वर्षभर पोट भरेल, याची खात्रीच नसते. ही सगळी माहिती घेऊन आम्ही घरी परतलो. कितीतरी दिवस शेतकऱ्याचा दिनक्रम डोळ्यांपुढून जाईना.बिचाऱ्या शेतकऱ्यांना रजा नाही, सुटी नाही, करमणूक नाही, की विरंगुळा नाही. कष्ट हेच त्यांचे जीवन. सर्वांनीच त्यांचे जीवन जाणून घ्यायला हवे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद