सिंहगडाचे मनोगत मराठी निबंध | SHINH GADACHE MANOGAT MARATHI NIBANDH
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सिंहगडाचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. मी ‘कोंढाणा!' कोंढाणा म्हटल्यावर गडबडलात ! अहो, शिवाजी महाराजांच्या काळात माझे नाव कोंढाणा असेच होते. मी मुघलांच्या ताब्यात होतो. शिवबांनी मला जिंकण्यासाठी तानाजी सारख्या शूर मावळ्याला पाठविले.
खरे तर तेव्हा तानाजीच्या मुलाचे लग्न होते. घरात शुभकार्य असताना शिवबांसाठी तानाजी गड जिंकण्याच्या ईष्र्येने मोहिमेवर निघाला. किल्ला चढून जाणे म्हणजे शत्रूला सावध करण्यासारखे होते; म्हणून तो शूर मावळा घोरपडीवरून गड चढून आला. अजूनही आठवतेय मला, त्याचे ते शौर्य, त्याची ती स्वामीनिष्ठा !
त्याची ती कर्तव्यनिष्ठा आठवली, की अजून अंगावर रोमी उभे राहतात. अशा क्षात्रधर्माचे तेजस्वी स्फुल्लिंग असलेल्या तानाजीसारख्या शूरवीराचे बलिदान आठवते. तो धगधगता ज्वलंत इतिहास शक्य आहे का विसरणे?
'गड आला, पण सिंह गेला' हे शिवबांचे उद्गार अजूनही कानांत घुमतात. तेव्हापासून मी कोंढाण्याचा सिंहगड झालो. शिवबांच्या मावळ्यांच्या त्यागाच्या रक्ताने माखलेले माझे शरीर पावन झाले. वीरश्रीने ओतप्रोत भरलेल्या थोर क्रांतिपर्वाचा विसर पडणे शक्य आहे का? माझ्या प्रत्येक अणु-रेणूत शिवतेज भरलेले आहे.
शिवबांच्या काळात माझे वैभव अगदी कुणीही हेवा करावे, असेच होते. आज मी भग्नावस्थेत आहे. माझे गतवैभव छिन्नविच्छिन्न झालेले आहे. तरी मी अभिमानाने सांगतो की, मी इतिहासाचा महान शिलेदार आहे; तरीही मी हुतात्म्यांचा सम्राट आहे.
माझ्या भग्नतेतच शिवबांच्या अमरत्वाचे निशाण अभिमानाने फडकत आहे. मला अभिमान वाटतो की, मला त्यांच्यामळेच अमरत्वाचे वरदान मिळालेले आहे. जोपर्यंत मी आहे. तोपर्यंत हा धगधगता इतिहास लोकांना आठवणारच.
आज माझ्या अंकावर विराजमान अशा शूर तानाजीचा पुतळा म्हणजे माझा गौरवच ! आज माझ्या या भूमीवर अनेक प्रेमवीर यायला लागले आहेत. पण मला फार वाईट या गोष्टीचे वाटते की, ज्या भूमीवर ज्वलंत इतिहास घडला, त्या भूमीवर प्रेमचाळे नकोत; तर तानाजींच्या स्मृतीला अभिवादन केले पाहिजे;
त्यांच्या चरणी नतमस्तक झाले पाहिजे.माझी अजून एक शान म्हणजे लोकमान्य टिळकांचा बंगला. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी सिंहगर्जना करणाऱ्या, लोकमान्य नेत्याचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. पण या बंगल्याचेही लॉजिंग-बोर्डिंग झालेले पाहिले, की मन विषण्ण होते.
थोर व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी मलिन होऊ नये, अशी मनापासून इच्छा आहे. माझ्या भूमीवरील त्या विधवा झालेल्या तोफा, ते ढासळलेले भव्य बुरुज पाहून येणाऱ्या भारतीयांचा उर भरून आला पाहिजे.
पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा, तानाजी कडा, राजाराम महाराजांची समाधी, अशा इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू, गोष्टी पाहून रोमारोमात वीरश्री संचरली पाहिजे. कारण, ही त्यागाची,शौर्याची भूमी आहे. मित्रांनो, तुम्ही तर हे एक पर्यटनस्थळच बनवून टाकले आहे.
तुम्ही इथे येता, खाता-पिता, देवटाक्याचे गार पाणी पिता, गरमा-गरम भजींवर ताव मारता, पिठले-भाकरी, मडक्यातले दही खाता, तृप्त होता नि निघून जाता. पण खरे सांगा, तुम्हाला माझ्या या भूमीवर आल्यावर इतिहासाची आठवण येते? कधी तरी तानाजींच्या समोर नतमस्तक व्हावेसे वाटते?
आता तर माझ्या छातीवर दूरदर्शनचे प्रक्षेपण केंद्र उभारले गेले आहे. माना वर करून त्या टॉवरकडे बघता; पण तानाजीकडा बघताना त्यांच्या साहसाबद्दल अचंबित होता का? बाळांनो, १५ व्या शतकापासून घडणाऱ्या प्रत्येक ऐतिहासिक घटनेचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे मला तुमच्यातील झालेला बदल जाणवल्यावाचून कसा राहील?
आता अजून एक आकर्षण तुम्ही मानवाने निर्माण केले आहे. तुमच्या लक्षात आलेच असेल. वनसंवर्धन करून तयार झालेले उपवन. १० ते १५ कि.मी. परिसरात झालेले हे उपवन नक्कीच आनंददायी आहे. तेव्हा निसर्गाशी जवळीक साधा. पक्षि-निरीक्षण करा, अभ्यास करा, संशोधन करा, आनंद मिळवा, विरंगुळा मिळवा आणि ताजेतवाने व्हा.
पण ह्या भूमीवर घडलेला ज्वलंत इतिहास कधीही विसरू नका. ह्या वीरगाथेची अनंत पारायणे व्हायला हवीत. हे सर्व एक बुजुर्ग या नात्याने सांगितले. विचार करा. वारसा जतन करा. जय तानाजी! जय शिवाजी! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद