श्रमदानाने बांधला बंधारा मराठी निबंध | SHRAMDANANE BHANDHLA BNDHARA ESSAY IN MARATHI


श्रमदानाने बांधला बंधारा मराठी निबंध  | SHRAMDANANE BHANDHLA BNDHARA ESSAY IN MARATHI 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण श्रमदानाने बांधला बंधारा  मराठी निबंध बघणार आहोत. आमचे गाव तसे दुष्काळी भागातीलच.शेती व्यवसाय प्रमुख. गावात आज सुधारणा होईल, उद्या सुधारणा होईल, या आशेने जगत होतो. पण म्हणतात ना, संकटकाळी कोणी, कुणाच्यातरी रूपाने मदतीला धावून येतो, तसेच झाले. 


किसन हा गावातीलच मुलगा शेतीविषयक शिक्षण घेऊन गावात परतला होता. गावाची स्थिती बदलण्यासाठी गावातील सर्व लोकांची त्याने एक सभा घेतली. त्या सभेत त्याने गावात बंधारा बांधण्याचा प्रस्ताव मांडला. लोकांनी अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या- कोण करणार, कसे करणार, केव्हा करणार, पैसे उभे कसे करणार, एक का अनेक.


किसन म्हणाला, "बाबांनो, आपले काम आपणच करायचे असते. 'जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला.' आजवर आपण अर्ज-विनंत्या केल्या. झाला काही फायदा? 'आपणच करावा आपला उद्धार.' बघा, आता पावसाळ्यातच नदीला पाणी असते. 


उन्हाळ्यापर्यंत सर्व पाणी आटून जाते. मग पाण्याची चणचण सुरू. त्यासाठी तुम्ही सगळे तयार असाल, तर आपण नदीवर बंधारा घालूया. त्यामुळे पाणी अडेल; पाणी जमिनीत जिरेल. पाणी जिरले, की आपल्या विहिरींनापण झरे फुटतील. उन्हाळ्यात


विहिरी आटणार नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी बाया-बापड्यांना वणवण करावी लागते, ती थांबेल. बघा, आहात सगळे तयार? सर्वांनी तत्काळ होकार दिला. झाले ! गावातील स्त्रिया, पुरुष, मुले, मुली, सर्वजण श्रमदानासाठी सिद्ध झाले. 


श्रमदानाने आपण लवकरच हे बंधाऱ्याचे काम पूर्ण करू, असा विचार करून सर्वजण कामाला लागले. सर्व गाव एक झाला. प्रत्येक जण कामाला लागला. गावात एकोप्याचे, सहकार्याचे वातावरण निर्माण झाले."इथे मोल ना दामाचे मोती होतील घामाचे त्यागाला या नाव नसे


पुण्यवान हा देश असे" अशी गाणी म्हणत श्रमदानाला सुरुवात झाली. फावडी, कुदळी, खोरी, घमेली, झाडू गोळा झाले. माती खणण्याचे काम पुरुष करत नि ती माती घमेल्यात भरून पुढे-पुढे नेण्याचे काम महिला व मुले करू लागली. उन्हा-तान्हात काम करतानाही कोणीच कुरकुर करत नव्हते. 


सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम सुरू असायचे. साधारण महिनाभरात बंधारा बांधून झाला. पाणी अडल्यामुळे त्या वर्षीचा उन्हाळा गावाला सुसह्य झाला. आता यापुढे 'साथी हाथ बढाना, साथी रे' हे गावाचे सूत्र राहील. कोणतीही गोष्ट सहकार्याच्या तत्त्वावर केली, तर नक्कीच यशस्वी होते.


“एकमेकां साह्य करू, 

अवघे धरू सुपंथ ! 

संघटित होऊन श्रमदाने करू गाव बलवंत." 

                                                                    आमच्या गावाचा आदर्श सर्वजण घेणार ना? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद