संस्मरणीय फुटबॉल सामना मराठी निबंध | SNSMARNEEY FUTBOLL SAMNA ESSAY IN MARATHI

 
 संस्मरणीय फुटबॉल सामना मराठी निबंध | SANSMARNEEY FUTBOLL SAMNA ESSAY IN MARATHI 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  संस्मरणीय फुटबॉल सामना मराठी निबंध बघणार आहोत. ज्ञान विद्या मंदिर विरुद्ध शारदा प्रशाला यांच्यातील फुटबॉलचा सामना हिराबाग मैदानावर होणार होता. दोन्ही शाळांचे संघ तयारीचे होते. सामना चुरशीचा होणार, म्हणून प्रेक्षकांची संख्याही खूप होती. 


खेळाच्या मैदानाच्या चारी कोपऱ्यांत झेंडे फडकत होते. गोलच्या चारी ठिकाणी जाळी होती. पंचांनी शिटी वाजवून खेळाला प्रारंभ करण्याची सूचना दिली. खेळ सुरू झाला. जवळ-जवळ अर्धा तास झाला, तरी कोणाचाच गोल झाला नाही. 


एकदा शारदा प्रशालेच्या खेळाडूंनी गोल करण्याचा प्रयत्न केला; पण ज्ञान विद्या मंदिराच्या खेळाडूंनी चेंडू परतवून लावला. गोलरक्षक खूपच चपळ होता. चेंडू चतुराईने फेकून एक गोल वाचवला. पण थोड्याच वेळात शारदा प्रशालेने गोल केलाच. पंचांनी शिटी वाजवली; सारे वातावरण चैतन्यमय झाले. सर्वांनी ओरडून त्यांना प्रोत्साहन दिले.


आता ज्ञान विद्या मंदिराच्या संघावर खूप काळजीपूर्वक खेळण्याची जबाबदारी आली. सर्व खेळाडू खूप सावधानतेने खेळू लागले. इतक्यात मध्यंतर झाले. दोन्ही शाळांचे संघ तोडीस तोड होते. प्रेक्षकांच्यातून त्यांचे कौतुक होत होते. पंधरा मिनिटांची विश्रांती संपल्याची शिटी वाजली. दोन्ही संघ पुन्हा मैदानात आले. 


खेळाडू आपापल्या ठिकाणी पोहोचले. खेळाला पुन्हा सुरुवात झाली. शारदा प्रशालेने पुन्हा जोर धरला. ज्ञान विद्या मंदिरला हरवण्याचा जणू त्यांनी चंगच बांधला. खूप एकाग्रतेने खेळाडू खेळू लागले. आता त्यांच्यापुढे फक्त एकच लक्ष्य होते गोल करणे. सुरेंद्र सिंगने चेंडूला अशी लाथ मारली की, चेंडू विरुद्ध संघाच्या गोलात गेला. 


त्यांचा दुसरा गोल झाला. सर्वांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे खेळाडूंचा उत्साह अधिक वाढला. प्रेक्षक प्रोत्साहन देत होते, रुमाल हवेत उडवीत होते. संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेले होते. सामना संपायला थोडा वेळच शिल्लक राहिला होता. तेवढ्यात शारदा प्रशालेने तिसरा गोल गेला. 


पंचांनी पुन्हा शिटी वाजवली. खेळ समाप्त झाला. शारदा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. लगेचच मैदानात संघनायकाला उचलून घेऊन सर्वांनीच आनंद व्यक्त केला. आज ह्या खेळाडूंनी सहकार्य, सांघिक वृत्ती, एकाग्रता, चिकाटी ह्या गुणांचे दर्शन घडविले. 


खेळातील विजय मिळविण्यासाठी या गुणांची आवश्यकता असते. सातत्य व सराव असेल, तर खेळातील यश निश्चित असते, हे या संघाने दाखवून दिले. सामना संपल्याबरोबर विजयी संघ घोषित करून त्यांना करंडक देऊन त्यांचा गौरव केला. खेळाचे महत्त्व विशद करून दोन्ही संघांचे कौतुक केले. असा हा फुटबॉलचा सामना अविस्मरणीय ठरला. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद