अखंड भारत एक आवाहन मराठी निबंध | Speech On India In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अखंड भारत एक आवाहन मराठी निबंध बघणार आहोत. भारतावर तब्बल दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केले. त्यांना हुसकावून लावण्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले. १९४७ साली देश स्वतंत्र झाला.
भारतमातेने मोकळा श्वास घेतला. आज या हुतात्म्यांमुळे आपण साऱ्यांनी स्वतंत्र देशात जन्म घेतला. स्वराज्याचे सुराज्य करण्याचे काम आमच्या युवापिढीचे. भारत देशाचे क्षेत्रफळ मोठे. काश्मीर ते कन्याकुमारी विस्तारलेल्या आपल्या देशात सर्व पंथ, धर्माचे लोक राहतात.
भारताचे वैशिष्ट्य म्हणजे विविधता. भाषा, चालीरीती, सण, उत्सव, पोशाख, खाणे-पिणे इ. भिन्न असले, तरी आम्ही सारे बांधव आहोत, ही भावना फार महत्त्वाची ! आमचे ऐक्य टिकविण्यासाठी आम्ही सारे एका सांस्कृतिक धाग्याने बांधलेले आहोत. जेव्हा देशावर एखादे संकट येते, तेव्हा सर्व भेदभाव विसरून सारे एक होतात.
सर्वांच्या मनात माझा देश' हा एकच भाव असतो. आज काश्मीरमध्ये अशांतता आहे. पाकिस्तानी काश्मीर घ्यायला टपलेले आहेत. कारगिलच्या युद्धात समस्त भारताने एक होऊन याला चोख प्रत्युत्तर दिले. अधून-मधून धार्मिक दंगली उसळतात, त्यावेळी धर्माच्या नावाखाली अराजक माजविले जाते आणि विवेक नाहीसा होऊन, प्रार्थना स्थळांची एकमेकांनाकडून विटंबना करणे चालू होते.
'मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना' पण तरीही धर्म युद्धे चालू होतात. अशा वेळी दोन्ही धर्मांच्या लोकांनी आपापसातील हेवेदावे, भांडण विसरून एक होण्याची गरज असते. त्याशिवाय भारताची अखंडता कशी टिकणार? स्वातंत्र्य मिळतानाच भारतपाकिस्तान वेगळे झाले.
खरे तर साने गुरुजींचे स्वप्न होते, 'बलसागर भारत होवो.' देशभक्तांनीदेखील अखंड भारताचेच स्वप्न बघितले होते. तेव्हा आता आपला हा देश अखंड राखण्याचे आव्हान आहे. या आव्हानाचा स्वीकार सर्वांनी केला पाहिजे. प्रत्येक युवकाचे ते कर्तव्य आहे.
आजही भाषावाद, प्रांतवाद, सीमावाद, पाणी तंटा, अधून-मधून डोके वर काढीतच असतात. असे वाद राष्ट्रीय एकात्मतेस बाधक ठरतात. हे सारे वाद परस्पर सामंजस्याने सोडविण्याची गरज आहे. अंतर्गत बंडाळी, फुटीरवाद, फितुरी, यांसारख्या प्रवृत्ती घातक आहेत. आपण आपापसात भांडत राहिलो, तर परकीयांचे फावते.
त्यांच्या आक्रमणाचा धोका संभवतो. चीन, पाकिस्तान यांनी भारतावर जेव्हा आक्रमणे केली, तेव्हा सारा भारत देश सर्व भेदभाव विसरून एकजुटीने उभा राहिला आणि परकीय आक्रमणाला परतवून लावले. पण फक्त संकटकाळी एकत्र येण्यापेक्षा नेहमीच 'हम सब एक हैं' असे म्हणून वागले पाहिजे.
जसे आपण घरातील कलह चार भिंतींतच ठेवतो, तेव्हाच घराची . अखंडता शाबूत राहते, तसेच राष्ट्राच्याबाबतीत देखील घडले पाहिजे.'हिंदू, मुस्लिम, सिक्ख, ईसाई मिलकर रहते भाई-भाई.' ही भावना प्रत्येक धर्माच्या माणसात निर्माण झाली, तर 'मी भारतीय आहे'. हा एकच विचार भारताच्या अखंडतेसाठी उपयुक्त ठरेल.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद