सुसंगती सदा घडो मराठी निबंध | Susangati Sada Ghado Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सुसंगती सदा घडो मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.
“सुसंगति सदा घडो,
सुजनवाक्य कानी पडो!
कलंक मतिचा झडो,
विषय सर्वथा नावडो.
" कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिलेल्या या पंक्ती जीवनाची एक दिशा दर्शवितात. आपण ज्या परिस्थितीत राहतो, ज्यांच्या सहवासात राहतो, त्या सर्वांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आपण ज्यांच्या संगतीत राहतो, त्यांचे राहणीमान, त्यांचे विचार, त्यांचे गुण दोष यांचा परिणाम नकळतपणे आपला स्वभाव घडवण्यावर होत असतात.
सुगंधी फुलांनी ओंजळ भरलेली असेल तर फुलांचा परिमल तुमच्यासोबत असेल. याउलट एक डांबराची गोळी बाळगाल तर त्याचा उग्र विशिष्ट दर्प तुमच्यासोबत असेल. म्हणजे संगत जशी असेल तसे तुम्ही विकसित होणार . बाह्य वातावरणाचा, संगतीचा परिणाम आपल्या अंतर्मनावर होत असतो.
बापूजींनी म्हटले "बुरा मत देखो, बुरा मत कहो, बुरा मत सुनो" वाईट प्रवृत्तीपासून स्वतःचा बचाव करता आला पाहिजे. दूरदर्शनच्या कार्यक्रमासंबंधी पाहिले तरी दोन गोष्टी निश्चितपणे समोर येतात. दिवसभर फिल्मी व रिमिक्स गाणी, उत्तान दृश्ये , बीभत्स नाचगाणी बघितल्यास त्यांचा वाईट परिणाम नक्कीच कोवळ्या मनावर होतो.
कारण जगात जे जे चांगले आहे, मंगल आहे, पवित्र आहे त्यांचा सुपरिणामही चिरंतन आहे, मंगलकारी आहे. चांगले विचार कानावर पडत असतील तर मनाचा विकास योग्य दिशेने होईल व जीवनाची वाटचाल सुकर होईल..
“पेराल तसे उगवते
ऐकाल तसे बनवते
पहाल तसे कराल
घ्याल तसे व्हाल...
" कोणाच्या संगतीने काशी अन् कोणाच्या संगतीने फाशी, असंही म्हणतात . कुमारवयात मुलांची संगत कशी आहे. हे फार महत्त्वाचे. या वयात संगतीचा, वातावरणाचा पगडा जसा मनात खोलवर रूततो, त्याचे पडसाद जीवनभर उमटतात. गुणी मुलांची संगत प्रगतीकडे नेते. कुसंगत अधोगतीकडे नेते.
आजचे समाजाचे चित्र विदारक आहे. युवक हा मदिरा अन् मदिराक्षी, गर्द यांच्या विळख्यात गुरफटला जात आहे. अपराधांची मालिका सुरू होऊन गुन्हेगारीत जीवन कैद होत आहे. 'वाल्याचा वाल्मीकी' झाला हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. वेळीच स्वतःला सावरून वाईट दोषांना लाथाडून चांगल्या सहवासात राहा.
नीरक्षीरविवेक बाळगा. त्यातून चांगले तेवढेच घ्या. वाईट ते सोडून द्या. "असंगाशी संग, प्राणाशी गाठ!" कुसंगत कधी जीवघेणी ठरेल याचा नेम नाही. कारण 'कोरड्याबरोबर ओले जळते .' एकाच टेबलावर चार तरुण मद्यपान करीत असतील तर त्याच टेबलावर बसून एखादा तरुण त्यांच्याबरोबरच साधे शीतपेय पीत असेल.
तरी तो मद्यपान करीत आहे असेच जग म्हणेल. तुम्ही कोणाबरोबर उठता बसता, कोणाबरोबर येता-जाता, तसे तुम्ही असणारा हा तुमच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन आहे. तो नाकारता येत नाही.
'संस्कार' जीवनाची दिशा ठरवतात आणि हे संस्कार संगतीतून जन्म घेतात . तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याचे अस्तित्व राहत नाही. कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याचा थेंब मोत्यासारखा शोभतो. ज्ञानदेवाच्या सहवासात येऊन 'नाम्या' हा संत नामदेव झाला. सुसंगत सत्कृत्याकडे नेते. परिस लोखंडाचेही सोने करतो.
फुलांच्या हारामध्ये असणारा साधा दोराही फुलांबरोबर देवाच्या अंगी स्थान प्राप्त करतो. मोक्षप्राप्तीसाठी साधुसंत , सज्जन यांचा सहवास आवश्यक आहे. चांगले विचार मनावर रुजतात, मनःशांती मिळते. जीवनाकडे उदात्त व परोपकारी दृष्टीने बघणे समजते.
अथांग,शांत , उदात्त निसर्गाची एकांत संगत मनाच्या तारा झंकारून प्रसन्न सूर छेडते तो आंनद वेगळाच! अशी संगत हवी जी आपल्याला भरभरून सुख देईल. क्षणभराचे नाहीत तर जीवनभराचे. कारण संगत खोलवर रुजते. तिचे परिणाम दूरवर जातात .
संग तसा रंग! जगात गुण-दुर्गुण, सज्जन-दुर्जन दोन्ही आहेत . दूरदृष्टिकोन ठेऊन काय निवडावे, स्वतःला कसे सावरावे हे आपल्या हातात आहे. आपला स्वभाव चांगला घडत गेला तरच स्वतः सुखी राहून दुसऱ्यांना सुख देता येईल.
"काचही भासते पाचू सोन्याच्या संगे
आरसाही झळाळतो सूर्याच्या संगे
चंदनाची माती देहाची सहाने संगे
पतंगाचे जळणे ज्योतीचिया संगे
माती ही सुगंधमय फुलांच्या संगे
बोरी-बाभळीही सुवासिक चंदनाच्या संगे!"
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद