स्वाभिमानाने जगा, देश वाचवा मराठी निबंध | SWABHIMANANE JGA AANI DESH VACHVA ESSAY IN MARATHI

 स्वाभिमानाने जगा, देश वाचवा मराठी निबंध | SWABHIMANANE JAGA  AANI DESH VACHVA ESSAY IN MARATHI


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वाभिमानाने जगा, देश वाचवा मराठी निबंध बघणार आहोत. स्वाभिमान म्हणजे स्वत:च्या चांगल्या गोष्टींबद्दल श्रद्धा आणि त्यामुळे स्वत:बद्दल निर्माण होणारा अभिमान. मनुष्यात स्वाभिमान असलाच पाहिजे. 


मानवी आयुष्याची वाटचाल करीत असताना अनेक संकटे येत असतात. संकटाच्या वेळी काहीजण सहसा आपले धैर्य गमावून बसतात, लाचार बनतात व शरणागती पत्करतात; परंतु याउलट जो संकटास आव्हान देतो, संकटाशी लढतो आणि यशस्वी होतो, तो अपयशरूपी हलाहलदेखील पचवतो. 


तो खरा स्वाभिमानी. छत्रपती संभाजीराजे यांचे उदाहरण बघा. मुघलांनी त्यांचा अनन्वित छळ केला. धर्मांतर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. पण त्यांच्यातील स्वाभिमान किंचितही कमी झाला नाही. देशाभिमार, धर्माभिमान यासाठी त्यांनी प्राणांचीही पर्वा केली नाही. 


स्वाभिमानामध्ये एक तेज असते; शक्ती असते.स्वाभिमानी व्यक्तीला कोणत्याही भौतिक सुखाचे प्रलोभन वाटत नाही. तृणशय्या, हाताची उशी अन् कोंड्याची भाकरीदेखील त्याला प्रिय वाटते. त्याच्यात एका आगळ्या वेगळ्या सामर्थ्याचा संचार होतो. 


त्यायोगे तो नवनवी क्षितिजे पादाक्रांत करतो. स्वाभिमानशून्य माणूस कर्तव्यशून्य, दुर्बळ व भित्रा असतो. स्वाभिमानी मनुष्य न्यायप्रिय असतो आणि बाणेदार वृत्तीचा असतो. तो कशालाही भीत नाही, कोणापुढेही झुकत नाही. न्यायप्रिय रामशास्त्री प्रभुणे यांनी राघोबादादांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली, तेव्हा त्यांची जीभ जरादेखील कचरली नाही; त्यांना जराही भीती वाटली नाही. 


त्यांना पदाचा त्याग करावा लागला, शहर सोडून जावे लागले, तरीही त्यांनी मान तुकवली नाही. त्यांच्यातील स्वाभिमान तसाच कायम राहिला. स्वाभिमानी माणसाचा कणा नेहमी ताठ असतो. तो स्वत:च्या फायद्यासाठी कधीच स्वाभिमान सोडत नाही. अशी माणसे म्हणजे देशाला भूषणावह असतात. अशा व्यक्तींमुळेच देश प्रगतिपथावर जातो. 


आपल्या धर्मात सर्वात श्रेष्ठ, ‘असतो या सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योमां अमृतगमय।' या ब्रीदाप्रमाणे सर्वांना आदर्शाप्रत नेण्याची क्षमता आहे. स्वाभिमान म्हणजे गर्व नव्हे. स्वत:बद्दलचा फाजील आभिमानही नाही. ज्याच्याजवळ स्वाभिमान असतो, तो आपली मातृभाषा, मातृभूमी यांचा आदर करतो. 


नाहीतर आज काही लोक आपल्याच मातृभाषेचा तुच्छ, गावठी भाषा म्हणून अनादर करताना दिसतात. काहींना आपल्या देशापेक्षा दुसऱ्या देशांचा अभिमान जास्त असतो. अशी माणसे विदेशी भाषा, विदेशी शिक्षण, विदेशी वस्तू यांचा जास्त उदोउदो करतात. आपला देश त्यांना मागासलेला वाटतो.


'जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसि' या उक्तीचा त्यांना विसर पडलेला दिसतो. राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, बहिष्कार आणि स्वराज्य ह्या चार गोष्टी चतु:सूत्री म्हणून ओळखल्या जातात. त्या स्वाभिमानदर्शक चतु:सूत्रीचा आज आपल्याला विसर पडला आहे.


स्वत:च्या म्हणून ज्या ज्या गोष्टी असतात, त्या त्या सर्व गोष्टींबद्दलचा अभिमान म्हणजे स्वाभिमान. मग हा देश माझा आहे, असे वाटत असेल, तर मी भ्रष्टाचार करणार नाही किंवा मी कुणाकडूनही लाच घेऊन, दुसऱ्याला फसवून, लुबाडून पैसे कमावणार नाही. 


निढळाच्या घामाचेच अन्न खाईन, असा बाणेदारपणा आला, तर माझा देश कधीच रसातळाला जाणार नाही. आजकाल अभ्यास न करता कॉपी, पेपरफुटी, मार्कातील फेरफार, अशा गोष्टींना उधाण आलेले दिसते. त्यामुळे आज आम्ही खोट्या प्रतिष्ठेच्या मागे तर लागलेलो नाही ना, हे तपासून बघा. 


अनेक वर्षांच्या परकीय राजवटीमुळे निर्माण झालेली लाचारी, भौतिकवादामुळे निर्माण झालेल्या नाना वासना, त्या पूर्ण होण्यासाठी होणारा भल्याबुऱ्या मार्गांचा अवलंब, सहज सुखसोई हा भाव प्रत्ययाला येतो. मोठी रेघ लहान करायची असेल, तर तिच्याशेजारी तिच्यापेक्षाही मोठी रेघ काढावी लागते, 


हे लक्षात घेऊन स्वाभिमान निर्माण करण्याचे काम घरा-घरांतून मोठ्या प्रमाणावर व्हावे. अशी आदरास पात्र माणसे, म्हणजेच स्वाभिमानी माणसेच देशालाही वाचवतात आणि उन्नतिपथावर नेतात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद