ताडोबाचे व्याघ्र अभयारण्य मराठी निबंध | Tadobache Vyagrha Abhayaranya Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ताडोबाचे व्याघ्र अभयारण्य मराठी निबंध बघणार आहोत. प्राचीन काळी राजे-महाराजे शिकार करण्यात स्वत:ला धन्य मानीत असत. शिकार म्हणजेच मृगया. या मृगयेला सारा लवाजमा निघायचा.
शिकार करून आणलेल्या प्राण्यांची शिरे कापून आणि. त्यांत भुस्सा भरून ती दिवाणखान्यातील भिंतींवर लटकायची. हा आमचा पराक्रम, असे मिशीवर पीळ देऊन मोठ्या अभिमानाने सांगणारे राजे काळाआड गेले. पण या शिकारीचा छंद पुढच्या पिढीत संक्रमित झाला.
मनुष्यप्राणी हा फारच स्वार्थी. तात्कालिक स्वार्थासाठी तो काय वाटेल ते करायला सिद्ध होतो. जंगले कमी झाली. लोकसंख्यावाढीबरोबर घरांसाठी जमीन कमी पडू लागली. मग काय, जंगलांवर आक्रमण. वास्तविक जंगलात राहण्याचा मान प्राण्यांचा; पण त्यांना हुसकावून किंवा
कायमचे संपवून टाकण्याचा मानवाने चंगच बांधला. वाघासारखे प्राणी दुर्मिळ होऊ लागले. वास्तविक वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी; पण त्याला संरक्षण नाही. अखेर शासनाला जाग आली. प्राण्यांची संख्या घटली, तर पर्यावरण धोक्यात येईल, याची जाणीव झाली; आणि काही अरण्ये अभयारण्ये बनली. या अभयारण्यात प्राण्यांची शिकार करता येणार नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान' हे अभयारण्य आहे. या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे ११७ चौ. कि. मी. आहे. अभयारण्यात प्राणी नैसर्गिक वातावरणात मुक्तपणे फिरतात नि माणसे बंद काचेच्या किंवा जाळीच्या गाडीतून फिरतात.
प्राण्यांचे मुक्त जीवन पाहण्याची संधी अभयारण्यात मिळते. चंद्रपूरपासून ४५ कि. मी. अंतरावर हे अभयारण्य आहे. नागपूरपासून ताडोबापर्यंत रस्त्याने जायचे असल्यास १३७ कि. मी. अंतर आहे. आम्ही व्याघ्रदर्शन घेण्यासाठी ताडोबाच्या अभयारण्यात गेलो होतो.
अभयारण्याचा परिसर खूप मोठा. या अभयारण्यात एक विश्रामधामदेखील आहे. ठिकठिकाणी मचाण उभारलेले आहेत. दमल्या-भागलेल्यांना त्या मचाणावर बसून सुरक्षितपणे अरण्याचे अवलोकन करता येते. ह्या अरण्यात वाघाव्यतिरिक्त सांबर, गवा, हरिण, चिंकारा, नीलगाय, चितळ व मगरी आहेत. सांबर, हरिण आणि वाघ एकत्र राहतात, याचे मोठे आश्चर्य वाटले.
अभयारण्यात फिरायचे, तर पायी फिरणे अवघड. त्यामुळे काही ना काही वाहनाची व्यवस्था करावीच लागते.त्या दिवशी सारा दिवस अभयारण्यात फिरलो. मचाणावर बसून खाद्य-पदार्थांचा आस्वाद घेतला. संध्याकाळ व्हायला आली, तरी व्याघ्रदर्शन काही झाले नाही.
वाघ संध्याकाळ झाल्यावर पाणी प्यायला तळ्यावर येतील; म्हणून तेथेच दबा धरून बसलो. पण छे. त्या दिवशी वाघांचे निर्जला व्रत होते की काय! एकही वाघ तेथे फिरकला नाही. वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्यात येऊन वाघाचे दर्शन न घेता कसे जायचे? मन खट्टू झाले.
मनोमन वाघाची प्रार्थना करू लागलो. “हे व्याघ्रा, आम्हाला दर्शन दे', तुझे रूप आयुष्यभर डोळ्यांत साठवून ठेवीन." प्रार्थना फळास आली. समोरून अंधारात डोळे चमकताना दिसले. बॅटरीच्या प्रकाशात पाहिले, तर साक्षात पिवळ्या रंगाचा, अंगावर काळे पट्टे असलेला उमदा वाघ समोर उभा. डोळ्यांवर विश्वासच बसेना.
दिवसभर प्रतीक्षा केल्यावर, त्याची प्रार्थना केल्यावर प्रसन्न झालेला वाघोबा पाहून खूप खूप आनंद झाला. सर्व वाघांचा प्रतिनिधी म्हणून समोर उभ्या ठाकलेल्या वाघाला अगदी प्रेमाने कुशीत घ्यावेसे वाटले आणि त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवून त्याला जीवनासाठी अभय द्यावेसे वाटले.
अशा प्रकारे भव्य अशा विविध वनश्रींनी नटलेल्या, प्रदूषणमुक्त, प्राण्यांच्या मुक्त प्रांगणात म्हणजेच ताडोबाच्या अभयारण्यात झालेले व्याघ्रदर्शन केवळ अविस्मरणीय! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद