पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध | Purgrastache Manogat Marathi Nibandh

 पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध | Purgrastache Manogat Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण पूरग्रस्ताचे मनोगत  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  नमस्कार मित्रांनो! मी तुमचाच एक बांधव. पूरग्रस्त. मी मुंबईकर. मुंबईत यंदा अभूतपूर्व पाऊस पडला. बंदिस्त मुंबई हादरली. रेल्वे वाहतूक ठप्प पडली. शहरे व उपनगरे जलमय झाली. 


अडकून पडलो. पावसाची झड थांबण्याची चिन्हे दिसेनात. प्रसार माध्यमांच्या साहाय्याने पुराच्या बातम्या कानांवर आदळत होत्या. निसर्गाचे अक्राळविक्राळ रूप समोर येत होते. दूरदर्शनवरील दृश्ये अक्षरश: बघवत नव्हती. पावसाच्या जोराने कोसळणाऱ्या जुन्या चाळी, वाहून जाणारी वाहने, माणसे, जनावरे, अनेक झोपड्यांतले संसार वाहून जात होते.


संकटात माणूस बरेच काही शिकतो. मीही त्याला अपवाद नव्हतो. अशा रौद्ररूप धारण केलेल्या पर्जन्याला कोण लगाम घालणार? अशा वेळी परस्पर-विरोधी घटना अनुभवायला येत होत्या. मी जेव्हा कार्यालयातून बाहेर पडलो, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर माझे घर दिसू लागले.


मी एका जुन्या चाळीतच राहत होतो. या चाळीची या पावसाने, पुराने नक्कीच दुरवस्था केलेली असणार, या विचाराबरोबर मनात चर्र झाले. मन वेगाने घराकडे धावत होते; पण विस्कळित झालेल्या साऱ्याच यंत्रणेमुळे शरीराने जाणे अशक्य होते. मनात विचारांनी आणि आसमंतात पावसाने थैमान घातले होते. मनाला घराची


ओढ लागली होती आणि पाण्याचा लोंढा शरीराला ओढत होता. कसाबसा, अनेक कसरती करून घरापाशी पोहोचलो.घराच्या भिंती कोसळलेल्या, सारा संसार पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहत चाललेला मी अक्षरश: माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. माझी बायको आणि माझा छोटा मुलगा घर कोसळताना घरातच होते. 


त्यांच्या विचाराने अंग शहारले. त्यांचे काय झाले असेल, या कल्पनेने अंगात कापरे भरले. घरातल्या वस्तू त्यांच्यापुढे खूपच क्षुद्र वाटू लागल्या. वेडापिसा होऊन मी त्यांना हाका मारू लागलो. प्रत्येकाचीच माझ्यासारखी स्थिती. विचारणार तरी कोणाला? 


ज्याचे त्याचे डोळे आपल्या माणसाला शोधत होते. प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर चिंता दिसत होती. बऱ्याच वेळानंतर पाण्याचा लोंढा जरा कमी झाला. एका ढिगाऱ्याखाली कोणीतरी स्त्री कण्हताना दिसली. तिला बाहेर काढण्यासाठी गेलो. अंगभर जखमा, काळे-निळे वळ, चेहरादेखील ओळखू येत नव्हता. 


शेजारीच लहान मुलगा. तोही बेशुद्धावस्थेत. त्यांना माती बाजूला सारून बाहेर काढले. बघतो तो काय, ती माझीच बायको आणि मुलगा. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार सुरू करण्याची धावपळ सुरू झाली. जरा स्थिरस्थावर झाल्यावर विचारशक्ती जागृत झाली. 


"गंगामाई घरात पाहुणी म्हणून आली, घरभर नाचली. माणूस त्यातही कसे सुख शोधतो, याची प्रचीती आली. पुढे बराच काळपर्यंत चिखलगाळ उपसला. सगळा संसारच उद्ध्वस्त झाला होता. पुन्हा सारी जमवाजमव सुरू झाली. सरकारने पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. 


समाजातून, अन्य राज्ये, अन्य देश, सगळीकडून मदतीचा ओघ सुरू झाला. पण तो खऱ्या संकटग्रस्तांपर्यंत पोहचूच शकत नव्हता. ज्यांचे काहीच नुकसान झालेले नाही, असेच सारे लोक मदत मिळवू लागले. विविधतेतून एकतेचे दर्शन घडले खरे; पण संधिसाधू लोकांच्या स्वार्थी वृत्तीचाही अनुभव आला.


पुराबाबत अर्थात त्याच्या कारणाबाबत विचार करताना लक्षात आलं की, पूर ही नैसर्गिक आपत्ती असली, तरीही त्यासाठी आपणच बऱ्याच अंशी जबाबदार आहोत. आपणच नद्यांच्या पात्रात राडारोडा टाकतो; त्यामुळे नद्यांची पात्रे अरुंद व उथळ होतात. 


प्लॅस्टिकमुळे नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होतात. नद्यांच्या पात्रात भराव टाकून सर्रास बांधकामे केली गेली. समुद्र हटवून बांधकामे केली गेली. निसर्गाच्या विरुद्ध वर्तन केल्यावर निसर्ग कोपणारच ना?


संकटे अचानक उद्भवली, की शासनयंत्रणाही कोलमडते. नुसती धावपळ सुरू होते. स्वयंसेवकांचे प्रशिक्षण, औषधांचा पुरवठा, हेलिकॉप्टर्स, जीव संरक्षक पथके, बोटी, अशा आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक गोष्टींची जमवाजमव करेपर्यंत हजारो


जीव जातात, शेकडो लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. मित्रांनो, मी पूरग्रस्त म्हणून बरेच काही सोसले आहे. मीच एकटा पूरग्रस्त नाही; माझ्यासारखे अनेक लोक आहेत. त्या सर्वांच्या वतीने मी प्रश्न विचारतो या साऱ्या संकटाला जबाबदार कोण?


तेव्हा मित्रांनो, प्रत्येक कृती विचारपूर्वक करा. कृती करताना होणाऱ्या परिणामांचा विचार करा. मानवाचा जन्म पुन्हा-पुन्हा प्राप्त होत नाही. तेव्हा ग्रस्त, मस्त न होता स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करा. कराल ना? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2

पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध | Purgrastache Manogat Marathi Nibandh


"माझं नाव कशाला विचारता ? पण तुमची तरी काय चूक आहे म्हणा ! खरोखरच मी आता नावापुरता उरलोय. माझं सर्वस्व गेलं. होत्याचं नव्हतं झालं. घर फिरलं तर घराचे वासे फिरतात असं म्हणतात...पण आभाळ फाटलं व माझं घरंच पुराच्या पाण्यात पार बुडालं...कोसळलं, आणि बघता बघता वाहून गेलं, आणि त्यात माझे...माझे...


काय सांगू माझ्या दुर्दैवाची कहाणी. रायगड जिल्हयात नागोठण्याच्या बाजूला आमचं लहानसं गाव. त्यात आमचं जुनं मातीचं घर. म्हातारे आईवडील आणि मी असे तिघे जण तिथे सध्या राहत होतो. मोठ्या दोन बहिणींची लग्नं आधीच होऊन गेली होती. आमच्या घराच्या मागे पुढे अंगण, त्यात फुलझाडंऽऽ हंऽऽ हंऽऽ


आता ते वर्णन व्यर्थ आहे. काही काही राहिलं नाही त्यातलं, आमची थोडीशी शेती होती. पोटापुरती...पण तिचं तर केव्हापासून तळंच झालं असणार ! केव्हापासून म्हणजे २३ जुलैच्या भीषण मध्यरात्रीपासून ! त्या रात्री पाऊस एखाद्या वेताळासारखा कोसळायला लागला. 


प्रचंड वादळवाऱ्यानं तो अगदी पिसाळल्यासारखा झाला होता. एखाद्या निरपराध अश्राप माणसाला जुलुमी जमीनदाराने हंटरने फोडून काढावं तसा हा चवताळलेला आणि चेकाळलेला पाऊस साऱ्या गावाला झोडपून काढत होता.


घरादाराच्या छपरांवर तडतडणाऱ्या पावसाच्या आवाजाने मी जागा झालो. वीज केव्हाच बंद पडली होती. घरात मिट्ट काळोख झाला होता. खिडकी उघडून मी बाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला. 


पावसाचे फटकारे बसले. समोरचे रस्ते, शेतं, कुरणं पाण्याने भरभरून वाहत आहेत याची जाणीव मला बॅटरीच्या प्रकाशात झाली. आमच्या अंगणात गुडघाभर पाणी साचलेलं दिसत होतं. वाटलं होतं अर्ध्या एक तासात ओसरेल पाणी..

पण पाणी ओसरण्याऐवजी वाढतच गेलं. आई-बाबा जागे झाले होते. बाबा दाराकडे जात होते. आईने त्यांना अवलं. त्यांना गोठ्यातल्या गायीची आणि तिच्या वासराची काळजी वाटत होती. इतक्यात गायवासरांचे हंबरडे ऐकू आले. काळीज चर्र झाले. 



बाबांचा...त्यांचाच काय, आईचा व माझा जीवदेखील गलबलला. बाबा पुन्हा दाराकडे तीरासारखे धावले, तोच बाजूची भिंत कोसळली. आणि...पाण्याचा प्रचंड लोंढा घरात घुसला. भराभर पाणी वर चढू लागलं. आईबाबांना घेऊन मी घराच्या पोटमाळ्यावर बसलो. तिघेही जीव मुठीत धरून होतो. 


तेवढ्यात बाजूच्या भिंती कोसळल्या. मधल्या आढ्याच्या बहालाचा आधार घेण्यासाठी मी माझा एक हात त्याला धरला आणि...लाटेच्या तडाख्यात बाबा पाण्याबरोबर वाहताना दिसले. मी ओरडलो. एका हाताने मी आईला धरायचा प्रयत्न केला. 


पण...आणखी एक जबरदस्त लाट आली आणि...माझ्या हातातून आईला ओढून ढकलून घेऊन गेली...मागे राहिलो फक्त मी...नावापुरता ! या गोष्टीला आता बरेच दिवस होऊन गेले. पुढे मला समजलं सारं गावच पाण्यात वाहून गेलं. गुरं, ढोरं, शेळ्या, मेंढ्या, कुत्री, मांजरं...नव्हे तर शेकडो माणसंदेखील ! 


कुठे सारं कुटुंबच्या कुटुंब गेलं, कुणाचे आई वडील, कुणाचे भाऊ बहीण, कुणाची बायको, मुलं जगलेल्या...! साऱ्यांच्याच डोळ्यात पाऊस ! कोण कुणाचे अश्रू पुसणार ?... शाळा जमीनदोस्त झाली. पंचायत चिखलात रुतली...सारंच विपरीत घडलं...


तेव्हा मला कळलं ही माझी एकट्याची आत्मकथा नाही. साऱ्या गावाच्या दुर्दैवाची दारुण गाथा हीच आहे. महाप्रलयाचाच प्रत्यय यावा असा भास झाला. माझ्या वाट्याला जे दुःख आलं ते कधीही कुणाच्याही नशिबी न येवो हीच प्रार्थना !"मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 3

पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध | Purgrastache Manogat Marathi Nibandh




श्रावणातलं आल्हाददायक ऊन पडलं
होतं. हवेत गारठाही होता, कारण मधून मधून पावसाच्या सरींचा शिडकावा होत होता. सुटी असल्याने आज सगळेजण घरीच दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहात होतो. इतक्यात दारावरची बेल वाजली. दार उघडताच दाढी वाढलेला एक तरुण, एका छोट्या मुलासह दारात उभा होता. 


त्याच्या हातात जुनी फाटकी बॅग, दोन कळकट मळकट पिशव्या होत्या. पिशव्यात भांडी, जुने कपडे असे सामान ठासून भरले होते. त्याला पाहताच बाबा आश्चर्याने उद्गारले, 'अरे अनिल, काय अवतार करून घेतलास? कधी आलास सांगलीहून ? बाळाची आई कुठंय अरे? सांग सारं पटापट! अनिल ढसाढसा रडू लागला. रडता रडता बोलू लागला.


“काय सांगू कथा ..... नव्हे माझ्या कर्माची व्यथाच. माझ्या आयुष्याची पार धुळवड झाली. कृष्णामाईला पूर आला. तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल. टी. व्ही. वरून बातम्याही पाहिल्या असतील. पण सर, ते काहीच नाही हो. वास्तव फार भीषण होतं. आईनं यावं लेकाकडे, पण हे असं धसमुसळेपणानं? खूप पाऊस झाला ह्यावर्षी. 


'संथ वाहते कृष्णामाई' म्हणणाऱ्यांना तिनं तिचं रौद्र रूप दाखवलं. खरंतर गावात ती शिरली मोठ्या दिमाखात, तेव्हाच आयाबहिणींनी तिची साडीचोळीनं रीतसर ओटी भरली. पाहुणीनं दोन दिवस राहावं, तशी ती राहील नि शांततेनं परत जाईल वाटलं, पण ह्यावेळेस तिच्या मनात काळंबेरंच होतं. 



ती शांत झालीच नाही. नदीला महापूर आला. काठावरचे औदुंबराचे-दत्ताचे-स्थान पाण्याखाली गेले. पाणी वाढतच होते. भयानक लाटा गावातल्या वाड्या वस्त्यांवर आदळू लागल्या. लाटांच्या लांब लांब जिभा एक एक माणूस, घर, झाड, वाडा गिळंकृत करू लागल्या. 


पाहता पाहता पाणी वाढू लागले. गावकऱ्यांनी एकमेकाला खूप मदत केली. लहान मुले, स्त्रिया यांना सुरक्षित जागी नेले. पाऊस मधूनच कमी झाल्यावर पोहत जाऊन पुरातल्या लोकांना वाचवले. सलग चार दिवस पावसाचे थैमान चालले होते.


मी, पत्नी व सोन्या एका वळचणीच्या जागी स्थिर थांबलो होतो. आमचं घर केव्हाच पाण्याखाली गेलं होतं. तीन पिढ्यांचा जुना वाडा तो. किती तग धरणार ? पिके पाण्याखाली गाडली गेली, सोनं, नाणं, भांडी, कपडे हे कमी पडलं, म्हणून जणू कृष्णामाईनं माझ्या पत्नीचाही घास घेतला. 


सोन्याला वाचवायच्या फंदात बायको गेली बघा. हात सुटलेला सोन्या गटांगळ्या खात होता. तो माझ्या हाती लागला ओंडक्याला धरून, अर्धवट ग्लानीत असताना. पण मदत मागणारा पुरातला बायकोचा हात मात्र मी पकडू शकलो नाही. तिने टाहो फोडून शेवटची हाक मला दिली. 


'धनी, वाचवा वाचवा' म्हणणारा तिचा आक्रोश माझ्या कानात अजून घुमतोय. तीन दिवस आम्ही सारेच अन्नपाण्यावाचून होतो. ओल्या कपड्यांशिवाय अंगावर काहीच नव्हते. पूर ओसरल्यावर मदतीची पथके मात्र झाडून आली. त्यांनी कपडे, अन्न पाकिटं ह्यांचं वाटप केलं. 


वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टर्स, परिचारिका आल्या. सर्वत्र रोगराई अस्वच्छता, दलदल माजली. काही खरे समाजसेवक जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे, नरामध्ये नारायण पाहणारे अनामिक, काही फोटोपुरते कार्यकर्ते तर काही स्वयंसेवकाच्या वेशातले चोर - हाताला मिळेल ते खिशातही घालीत होते.



आता मंत्र्यांच्या हेलीकॉप्टरमधून पूरग्रस्तांसाठी भेटी, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न, त्यावर महाचर्चा, समित्या...हे सारं सारं होईल. मदतीचे ओघ येतील. साऱ्या राजकीय पक्षांमध्ये चढाओढही लागेल, पण ही आलेली मदत नक्की कुणाकुणाला मिळेल सांगता येत नाही सर. 



सरकार जमीन देईल, पूरग्रस्तांसाठी घरे बांधली जातील पण माझा कुणाकडे वशिलाही नाही सर. मला कोण देणार घर? कुणाशी ओळखही नाही माझी. तुम्ही काही कराल का सर? कृष्णेकाठी एका छोट्याशा वाडीत राहणारा, मी एक अर्धशिक्षित खेडूत. 


दोन वर्षे कॉलेज केलं. तेव्हाची तुमची माणुसकी आठवली आणि थेट तुम्हाला भेटायला आलो. खर तर वेडच लागायची पाळी आली होती माझ्यावर. डोकं बधीर अन् मेदू बद पडला होता. कसाबसा तुमचे शब्द आठवून सावरलो. 'Never give up. You are not defeated, till yourself tell, that I am defeated. जोपर्यंत मी हारलो असं तुम्ही स्वत: म्हणत नाही, तोपर्यंत तुम्ही हारला नाहीत.


जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया

जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया


'प्रतिकूल तेच घडेल' असं धरून चालावं म्हणजे परिस्थितीशी दोन हात करता येतात. संसाराचा होम झाला, शरीराची चाळण झाली हीनशक्ती झाली तरी, प्रयत्नांची कास सोडू नये. मीही नाही सोडली सर. हिंमत धरलीय. आता पुढचा मार्ग सांगा. मार्गदर्शन करा सर.”


त्याच वेळी कवी हरिवंशराय बच्चन ह्यांच्या काव्यपक्ती मला स्मरत होत्या. "प्रलय की नि:स्तब्धता से सृष्टीका निर्माण फिरफिर नीड का निर्माण फिर फिर नेह का आहवान फिरफिर ।। माणसाने कधी आशा सोडायची नसते. प्रलयानंतर ही सृष्टीच, निर्मितीचं नवं गाणं गाते.


एवढं बोलून अनिलने बाबांच्या पायावर डोके ठेवले होते. मला वाटलं कपाट उघडावं व सारे पैसे अनिलदादाला द्यावेत. एवढ्यात बाबा उठले. त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. त्याला उठवले, थोपटले. भरल्या डोळ्यांनी सोन्याला मांडीवर घेतले व फोनची बटणे दाबली. बाबा बोलत होते, “सध्या अनिलला तुमची जागा वापरू द्या. कपड्यांना इस्त्री करेल. 


चार पैसे मिळवील. सोन्याला गाडगेबाबांच्या वसतीगृहात नि शाळेत प्रवेश घेऊयात.” अनिलच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली. माझे हृदय बाबांबद्दलच्या अभिमानाने भरून आले. अनिल मार्गाला लागेल, पण त्याच्या इतर बंधूंचे काय झाले असेल?  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद