वन महोत्सव मराठी निबंध | Van Mahotsav Nibandh Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपणवन महोत्सव मराठी निबंध बघणार आहोत. आमच्या शाळेत वनमहोत्सावाचे आयोजन केले होते. संपूर्ण शाळेत उत्साहाचे वातावरण होते. प्रत्येक मुलाने एक रोप आणले होते. शाळेच्या परिसरात कोणते झाड कोठे लावायचे, हे ठरविण्यात आले. प्रत्येक ठिकाणी खुणा केल्या गेल्या.
झाडे लावताना ही काळजी घ्यावी लागते; कारण प्रत्येक झाडाचा विस्तार किती असेल, त्याची मुळे किती दूरवर पसरतील, हे लक्षात घ्यावे लागते. प्रमुख पाहुणे येणार होते. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण होऊन मग प्रत्येकाच्या हस्ते वृक्षारोपण होणार होते. प्रमुख पाहुणे वृक्षप्रेमी होते.
त्यांनी त्यांच्या जमिनीत रोपवाटीका चालू केली होती. सर्वांना फुकट रोपे देऊन वनमहोत्सव साजरा करण्याचा त्यांचा उपक्रम होता. शाळेत सर्वत्र फलक लावलेले होती. त्यातून 'वन' ही राष्ट्रीय संपत्ती आहे, राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करा, ह्या आशयाचा मजकूर आणि चित्रे होती.
'चिपको आंदोलना'चे फलक होते. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' अशा सुभाषितांनी सजविलेली चित्रे तयार करून एक चित्रकला-प्रदर्शन भरविले होते. ह्या प्रदर्शनासाठी मुलांनी खूप मेहनत घेतली होती. वृक्षदिंडी काढण्यात आली. प्रत्येक मुलाने आणलेले रोप डोक्यावर घेऊन मुले शिस्तीत चालली होती. पालखीत तुळशीचे रोप ठेवून मिरवणूक निघाली. त्या वेळी
मुलांच्या हातात फलक होते. त्या फलकांवर घोषणा लिहिलेल्या होत्या. 'झाडे लावा, झाडे जगवा', 'वृक्ष आमचे मित्र', 'आम्ही झाडे तोडणार नाही; तोडून देणार नाही.' घोषणांना जोर चढला होता. शाळेभोवतालचा परिसर दणाणून निघाला होता. सर्वजण ही दिंडी पाहण्यासाठी जमलेले होते. खूप उत्साह आणि शिस्त होती.
वृक्षदिंडीनंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू झाला. तत्पूर्वी पाहुण्यांनी वनमहोत्सवाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, “पृथ्वीच्या ६०% भागात असलेली वने आता फक्त ३०% भागातच राहिलेली आहेत. अशी वने कमी झाली, तर निसर्गाचा तोल ढासळत जाईल, पाऊस वेळेवर पडणार नाही, तापमान वाढत जाईल; म्हणून वनांच्या वाढीची, त्यांच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची आवश्यकता आहे.
नुसती झाडे लावून उपयोग नाही; तर ती वाढली पाहिजेत, जगली पाहिजेत.” सर्वांनी टाळ्या वाजविल्या. नंतर वृक्षारोपण झाले. मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी रोपांना झारीने पाणी घातले.आम्ही सर्व मुलांनी वनसंरक्षण, वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा घेतली. असा हा वनमहोत्सव शाळेत साजरा झाला.
अगदी प्रत्येकाने अंत:करणपूर्वक ह्या महोत्सवात भाग घेतला आणि खऱ्या अर्थाने संत तुकारामांच्या अभंगाचा प्रत्यय आणून दिला. 'वृक्षवल्ली आम्हा, सोयरी वनचरे'.संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. वने, वृक्ष यांच्यावरील माहितीपट दाखविण्यात आले. एक दिवस सर्वांनी एकत्र वनभोजन केले.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद