वेरूळची कैलासलेणी मराठी निबंध | Verulchi Kailash Leni Essay In Marathi

 वेरूळची कैलासलेणी मराठी निबंध | Verulchi Kailash Leni Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वेरूळची कैलासलेणी मराठी निबंध बघणार आहोत. चालुक्य आणि पल्लव या दोन राजवंशांच्या काळातच महाराष्ट्रात उदयास आलेल्या, राष्ट्रकूट या बलाढ्य राजवंशाच्याही काळात महाराष्ट्रात कला आणि स्थापत्य या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली. 


हे कलावशेष मुख्यत: औरंगाबादजवळील वेरूळ या ठिकाणी पाहावयास मिळतात. वेरूळला आपल्याला पाहायला मिळते कैलास लेणे. कैलास हे एकपाषाणी मंदिर आहे. कैलास मंदिराच्या जोत्याची उंची १५ फूट असून, मोठ्या आकाराचा हत्ती, सिंह आणि व्याल यांच्या मूर्ती तिथे कोरलेल्या आहेत. 


मंदिराच्या प्राकारात अनेकविध शिल्पे आणि मूर्ती कोरलेल्या आहेत. रामायण आणि महाभारत यांतील विविध कथा सांगणारे शिल्पपटही तेथे आहेत. इतर शिल्पांमध्ये महाबलिपुरमच्या शिल्पाशी नाते दाखविणारे महिषामर्दिनीचे शिल्प, रती आणि मदन यांचे इक्षुदंडासहित असणारे, तसेच शिवाचे त्रिपुरान्तक इत्यादी शिल्पे उल्लेखनीय आहेत.


दरवाज्याच्या समोरच अभिषेकलक्ष्मीचे भव्य शिल्प दिसते. सरोवरातील अनेक कमलांपैकी एक पूर्ण विकसित कमळावर ती बसलेली दाखविली आहे. तिच्या मस्तकावर दोन गजराज कलशातून अभिषेक करत आहेत, असे दिसते. समृद्धीच्या या देवतेला प्रथम अभिवादन करून दर्शक खरे तर कैलासाच्या प्रांगणात शिरतो. या शिल्पासारखीच


योगीश्वर आणि अंधकासुर वध या शिवाच्या मूर्तीसुद्धा अतिशय भव्य आणि भारावून टाकणाऱ्या आहेत. ____ मुख्य मंदिराच्या जोत्यावर एक प्रचंड शिल्प आहे. 'रावणानुग्रह' या नावाने हे शिल्प प्रसिद्ध आहे. कैलासमधील हे शिल्प म्हणजे शिल्पींच्या आत्तापर्यंतच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा परिपाक आहे. 


हे शिल्प न पाहता आणि न समजावून घेता वेरूळहून परत आलात, तर ती वेरूळ-भेट व्यर्थ आहे! शिवभक्त रावण कुबेराचा पराभव करून लंकेला परत जात असताना त्याला वाटेत कैलासावरच्या शिवप्रभूचे दर्शन घ्यावेसे वाटते. 


पण शिवपार्वती एकांतात असल्यामुळे द्वारपाल रावणाला अडवतात आणि त्यामुळे रावण चिडतो. तो संपूर्ण कैलास पर्वत उखडून टाकायचा विचार करतो व कैलास हलवायला सुरुवात करतो. पर्वतावरील सगळे निवासी घाबरतात आणि शिवाची प्रार्थना करतात. शिव आपल्या पायाच्या अंगठ्याने रावणाला पाताळात ढकलतो.


या गोष्टीचे शिल्पांकन अतिशय सविस्तरपणे इथे केलेले दिसते. दशाननाची डोकी अगदी स्वतंत्रपणे दाखविली आहेत. तसेच, त्याचे अनेक हातही विविध गोष्टींमध्ये व्यस्त दाखवले आहेत. पण खरे पाहण्यासारखे आहे, ते त्याचे पाठमोरे शरीर. कलाकाराने मानवी शरीराचा पूर्ण अभ्यास करूनच हे शिल्प कोरले असावे, असे वाटते. 


एवढे वजन उचलल्यावर एखाद्या माणसाच्या पाठीचे स्नायू जसे ताणले जातील, तसेच कोरलेले आहेत. त्याच्या हातांच्यावर पर्वत आणि त्यावर कैलासावरचे दृश्य. पर्वत हलायला लागल्यावर कैलासावर जो हाहा:कार उडाला, त्याचे प्रलयकारी वर्णन इथे केलेले दिसते.


या शिल्पाची रचना आणि व्यक्तींच्या कायिक हावभावांवरून त्यांच्या मनःस्थितीची येणारी कल्पना, हे या शिल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तसेच, आत घाबरून पळणारी दासी, पळताना तिचा सुटणारा अंबाडा शिल्पींनी अतिशय सफाईने दाखविला आहे.


मंदिराभोवतीच्या मूळ डोंगराच्या खडकात ओवऱ्या तयार करून, त्यात भिंतीत अर्धस्तंभ कोरून त्या तयार झालेल्या चौकटीत काही शिल्पपट कोरलेले आहेत. त्यात शिव आणि विष्णू यांच्या अनेक अवतारकथा कोरलेल्या दिसतात. 


त्यातील कल्याण सुंदर' म्हणजे शिव आणि पार्वती विवाहाचा प्रसंग अनेक बारकाव्यांसह कोरला आहे. या ओवऱ्यांमधून पुढे आल्यावर एक यज्ञशाला' नावाचे दालन आहे. उजवीकडे 'सरिता मंदिर' आहे. या मंदिरात गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या मूर्ती आहेत. कैलासनाथ मंदिराचे जितके वर्णन करावे, तितके कमीच आहे.


"शिल्प घडविले फोडून पत्थर।

 'विश्वदाय' हे मंदिर सुंदर॥ 

                                                                                                                    कैलास मंदिर, वेरूळ


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद