विज्ञान आणि मानव मराठी निबंध | Vidnyan Ani Manav Nibandh Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विज्ञान आणि मानव मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. आज विज्ञानाला माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. मानवी जीवनाचं असं एकही क्षेत्र नसेल की जे विज्ञानाने ढवळून काढलेलं नाही.
विज्ञानामुळे माणसाचं जीवन प्रगत झालंय, उन्नत झालंय. त्याच्या जीवनात समृद्धी अवतरली आहे. आणि सुखसोईचा तर सुकाळ झालाय. विश्वातली अनेक गूढं उकलली आहेत, अनेक दुर्धर रोग बरे होताहेत. देशादेशातलं अंतर तर एवढं कमी झालंय, की हजारो मैल दूर असलेल्या माणसाजवळ, जवळ बसून बोलावं, असं बोलता येतं.
विज्ञानामुळे माणूस, माशासारखा पाण्यात पोहू शकतो. पक्ष्यासारखा आकाशात भरारी मारू शकतो आणि क्षणात वेगाने धरणीवर उतरू शकतो. ही सारी विज्ञानाची किमया आहे. पाऊस पडला नाही तर विज्ञानाच्या सहाय्याने तो आपण पाडू शकतो. विज्ञानाने यंत्रमानव तर बनवलाय; पण परमेश्वराप्रमाणे अगदी हाडामासाचा माणूसही बनवला.
तेव्हा माणूस आज प्रतिपरमेश्वर बनलाय. हे सर्व पाहिलं की वाटतं, विज्ञान हा परमेश्वराने मानवाला दिलेला वर आहे. पण ही झाली विज्ञानाची चकचकीत बाजू. याच विज्ञानाची दुसरी एक काळी बाजू आहे. विज्ञानाला जशी एक संरक्षक, संवर्धक शक्ती आहे; तशीच दुसरी संहारक आणि विध्वंसक शक्ती आहे. आणि दुःखाची गोष्ट ही आहे की आज या विनाशकारी शक्तीवरच भर दिला जातोय.
अणुबॉम्ब हे खेळणं वाटावं, अशी नवनवीन शस्त्रं आणि अस्त्रं निर्माण होताहेत. आजपर्यंतची शस्त्रं फक्त जे विद्यमान आहे तेच नष्ट करीत असत. आता आण्विक-जैविक अशी अस्त्रं निर्माण झाली आहेत व ती वर्तमानाबरोबर माणसाचं भविष्यही उद्ध्वस्त करून टाकताहेत.
वायूरूप असलेली अस्त्रे माणसाच्या शरीरांत निरनिराळ्या रोगांचे जंतू निर्माण करतात. भावी पिढीला विकृत आणि विकलांग बनवतात. मानवाच्या पिढ्यान् पिढ्या बरबाद करणारं हे विज्ञान, असंच थैमान घालणार असेल तर एक दिवस असा येईल की या जगावर एकही मानव शिल्लक रहाणार नाही.
अशा या उजाड, भकास जगाकडे पाहून कदाचित परग्रहावरचा माणूस म्हणेल, 'इथे पूर्वी माणूस नावाचा प्राणी रहात होता.' हे पाहिलं, की वाटतं, विज्ञान हा परमेश्वराने मानवाला दिलेला शाप आहे.
विज्ञानातले शोध आपल्याबरोबर धोके आणि आपत्ती, अरिष्टे आणीत असतात. जेव्हा चाकाचा शोध लागला तेव्हा, जसं हे चाक मानवाची गती वाढविणार आहे हे ठरलं, तसंच या चाकाखाली कोणी ना कोणीतरी एकवेळ चिरडलं जाणार आहे, हेही ठरलं.
जेव्हा अग्नीचा शोध लागला, तेव्हा, हा अग्नी माणसाचं अन्न शिजवणार आहे, हे ठरले. आणि तेव्हाच हेही ठरलं, की हा अग्नी केव्हा ना केव्हा तरी, कोणा ना कोणाचं तरी घर जाळणार आहे. यातल्या कोणत्या कारणासाठी आपण चाक आणि अग्नी वापरणार आहोत, हे मानवाने ठरवायचं आहे.
विज्ञानाने आपल्यापुढे एक जटिल समस्या उभी केली आहे. जगायचं की मरायचं ? मरण सोपं आहे. हा विज्ञानाचा बेभान वारू तसाच स्वैरपणे चौखूर उधळू द्यायचा. जगायचं असेल, तर या वारूला लगाम घातला पाहिजे. या उधळलेल्या बैलाच्या नाकात वेसण घातली पाहिजे सदसद्विवेकबुध्दीची, तारतम्याची, धाधाची. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
विज्ञान आणि मानव मराठी निबंध | Vidnyan Ani Manav Nibandh Marathi
आधी होते मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती ।
मग झाले मी पणती, घराघरातून मिणमिणती ।।
काचेचा तो महाल मजू, कंदील त्याला जन म्हणती ।।
बत्तीचे ते रूप नवे, प्रकाश झगमगे चोहिकडे ।।
विज्ञान आणि मानव यांच्यातील अतूट संबंध दर्शविण्यासाठी आणि कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रकोरीप्रमाणे विज्ञानाच्या प्रगतीचा प्रवास सांगण्यासाठी वरील काव्यपंक्ती पुरेशा आहेत. आज विज्ञानाने गरूडझेप घेऊन सारे जगच पालटून टाकले आहे. विज्ञानाच्या जादूई कांडीने सारे जग जादूई नगरी झाले. कुणी पूर्वज इथे आला तर ओळखणारच नाही हे जग! मोबाईल फोनवरून
बोलणे, 'जागेवरून रिमोट कंट्रोलद्वारा टी.व्ही. हाताळणे' हे पाहून थंडीतही आम्ररस खाताना गोठून जाईल आणि 'इदं न मम' म्हणत माघारी फिरेल. आज असा एकही घटक नाही ज्याला विज्ञानाचा परीसस्पर्श झालेला नाही. विज्ञानाच्या दुडक्या चालीने गृहिणी सुखावली.
त्यांच्या जीवनात आनंदाचे कारंजेच फुलवले या विज्ञानाने! ग्राईडर वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा घरात समावेश होऊ लागला आणि खऱ्या अर्थाने स्त्रीला स्वातंत्र्याचा उपयोग घेता येऊ लागला. थोड्या फार फरकाने का होईना पण ती 'रांधा, वाढा, उष्टी काढा' यातून मुक्त झाली.
विज्ञानाचा हा भीमपराक्रम केवळ एवढ्याच बाबतीत नाही, तर त्यामुळे कृषिक्षेत्रात झालेली प्रगती म्हणजे ग्रिनीज 'बुक आफ वर्ल्ड रेकॉर्ड!' विज्ञानाचा नांगर शेतातून फिरला आणि पंजाब, हरियाणा सारख्या वैराण वळवंटाचे हिरव्यागार नंदनवनात रुपांतर झाले. 'जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुरूनि टाका' या केशवसुतांच विचारांना विज्ञानाने आत्मसात केले आणि कृषीक्षेत्रात पारंपारिक तंत्रज्ञानाला झुगारून देऊन आधुनिक तंत्राचा वापर सुरू केला हरितक्रांती घडून आली.
औषधाबाबतीतही तेच! आज क्षय, धनुर्वात, डांग्या खोकला या रोगांवर रामबाण उपाय सुचले आहेत. त्यामुळे आयुर्मर्यादा वाढली आहे. नेत्रदान करून सृष्टीचे सुंदर रूप पाहता येते, तर रक्तदान करून एका जीवाला जीवदान देता येते. त्यामुळे पूर्वजापेक्षाही अधिक पुण्य गाठीस बांधता येते.
अशा या विज्ञानानेच मानवी आरोग्य सुदृढ बनविले. सुदृढ समाज निर्माण केला. कालिदासासारख्या महाकवीची प्रतिभा कुंठित व्हावी, अशी ही विज्ञानाची करामत! पूर्वी प्रभू रामचंद्रांनी कौसल्येजवळ चंद्र मागितला होता. परंतु त्याची ती इच्छा कौसल्याने आरशात चंद्र दाखवून पूर्ण केली होती.
याच चंद्रावर आज नील आर्मस्ट्रॉंग - एडविन ऑल्ड्रिन जाऊन आले आहेत. खरच! विज्ञानाने मानवी जीवनात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. अशक्य गोष्ट शक्य करणारा किमयागारच तो! वाटते खरंच! स्वर्गातील कामधेनू अथवा कल्पवृक्ष यापेक्षा वेगळा असू शकेल काय? नक्कीच नाही.
आज इन्सॅट बी हे उपग्रह अवकाशात सोडले जात असल्यामुळे हवामानाची, वादळांची पूर्वसूचना मिळते. त्यामुळे मानवी जीवन सुरक्षित बनते 'जो जे वांछील तो ते लाहो, प्रणिजात' हा ज्ञानेश्वरांचा संदेश मूर्तरूपात आणणाऱ्या संगणकाची निर्मिती या विज्ञानानेच केली. विज्ञानामुळे मानवी जीवनात आमूलाग्र प्रगती झाली. औद्योगिकीकरण, दळणवळण साधनांत वाढ झाली.
विज्ञानाने मानवी जीवनात अनुकूल बदल केले असले तरी कित्येकदा सुंदरसे मानवी जीवन उद्ध्वस्त केले. म्हणतात ना - “विनाशकाले विपरीतबुद्धी” १९४५ साली हिरोशिमा, नागासाकी हे शहरे अणुबॉम्बस्फोटात बेचिराख झाली. मुंबईतील १२ मार्च १९९३ च्या बॉम्बस्फोटाने अनेक संसार उद्ध्वत झाले. भोपाळ येथील एम. आस. सी. या वायुगळतीने
अनेक जीवांचे प्राण घेतले रशियातील भीषण चेर्नोबिल दुर्घटना! विज्ञानामुळे कारखाने निघाली व विविध प्रदूषणाच्या विळख्यात आपण अडकलो. विज्ञानामुळे यंत्रे, संगणक, लोकसंख्यावाढ झाली. आणि त्यांच्या एकत्रित परिणामातून बेकारीचा भस्मासूर उदयास आला.
विज्ञानामुळे वाहनात प्रगती होऊन 'दहा दिशांचे तट कोसळले ध्रुव दोनही जवळ आलें!' असे झाले तरी 'दोन ध्रुवावर दोघे आपण!' यातून वैचारिक प्रदूषण वाढीस लागत आहे आणि मानवाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल चालू आहे.
“पृथ्वीमाते मंगल गे ।
सुंदर कोमल वसुंधरे।।”
अशी आपली चराचर सृष्टी आहे. विज्ञानामुळे मानवी जीवनावर आघात होत असले तरी या सर्व कृती मानवाच्याच आहेत. मानवाला हे समजले नाही की 'विज्ञान हे दुधारी अस्त्र आहे'. त्याचा आपण जसा वापर करू तसे आपणास फळ मिळेल. It is not gun that fights, the mind behind the gun that fights.
परंतु हे विज्ञान मात्र नेहमीच मानवाच्या भल्यासाठी आहे. विज्ञानामुळेच आपण आज हे जग पाहू शकत आहोत. विज्ञानाशिवाय जगाची कल्पना करणेच अशक्य म्हणूनच कवी केशवसुतांच्या कवितेत थोडासा बदल करून म्हणावेसे वाटते. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद