यत्न तो देव जाणावा मराठी निबंध | YATNA TO DEV JANAVA ESSAY IN MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण यत्न तो देव जाणावा मराठी निबंध बघणार आहोत. असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे. 'कर्म' हीच खरी मानवाची ओळख होय. तो जे कर्म करतो, जसे करता , तसे त्याचे जीवन बनते . जीवनात संकटे, अडचणी, प्रश्न सारे आहेतच. पण हार न मानता प्रयत्नपूर्वक जीवनपथ चालायचा आहे.
आपले प्रयत्न हीच आपल्या देवाची उपासना आहे. त्यातूनच आपले ध्येय, आपली महत्वाकांक्षा साकारणार आहे. "प्रयत्नांची पराकाष्ठा प्रत्येक वस्तूवर विजय मिळवू शकते.'' असे होमर यांनी म्हटलेच आहे. गतीतून प्रगती हवी असेल तर प्रयत्न हवेत.
जीवनात जे ध्येय आपण ठरविले आहे ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतांना येणाऱ्या संकटाची,अडचणीची तमा न बाळगता प्रखर अशी झुंज देत जीवनाला सामोरे जाणे सोपे नाही. मानवसेवेचे व्रत घेतलेले डॉ.शरदकुमार दीक्षित स्वतः अपंग आहेत.
दोनदा त्यांची बायपास सर्जरी झालेली असून कॅन्सरही आहे. या सर्वांवर सिंहाच्या छातीने मात करून त्यांनी दरवर्षी भारतात चार महिने मोफत फ्लास्टीक सर्जरी करून देण्याचे व्रत घेतले आहे.
स्वआरोग्य प्रश्नचिन्ह बनून समोर ठाकले तरी प्रयत्नाची कास न सोडता मानवसेवेचे ध्येय पूर्ण करणारा हा महामानव! प्रचंड जिद्द आणि चिकाटी यातून प्रयत्नांचा जन्म होत असतो. जीवनात काहीही सहज मिळत नाही. त्यासाठी प्रयत्न करावेच लागतात.
“उद्यमेन हि सिध्दयन्ति, कार्याणि न मनोरथैः
न हि सुप्तस्य सिंहस्य, प्रविशन्ति मुखै मृगः"
कार्ये उद्योगानेच (प्रयत्नानेच) सिध्दीला जातात. मनोरथांनी नव्हे. झोपलेल्या सिंहाच्या मुखात हरिण येऊन प्रवेश करत नाही. 'प्रयत्नावाचून प्रारब्ध लंगडे' असे म्हणतात. प्रयत्न करायचे नाही आणि दोष प्रारब्धाला देणे योग्य नाही. आपल्या हृदयानं, आपल्या दोन्ही हातानं भरभरून काम करा. योग्य दिशेने वाटचाल करा मग यश निश्चित मिळते.
'प्रयत्ने एक बीज लाववे
फळ पावावे कणसापरी।'
एक दाणा हजार दाणे घेऊन येतो तो उगाच नाही. प्रयत्नांच्या घामाचे मोती त्या मातीत पडतात म्हणूनच! "प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक आहे." अस विनोबा भावे म्हणतात. “जिथे राबती हात ,तेथे हरी" ही सर्व विधाने एकच सांगतात "काम करा" प्रयत्न करा. आनंद फुलवा. संकटावर मात करा.
अपयशाने खचू नका. परत प्रयत्न करा.यश नक्की मिळेल. जीवन अमोल आहे वेळ दवडू नका. क्षणाक्षणाचे सोने करा व आनंद लुटा आळस करू नका. दुसऱ्यावर विसंबून राहू नका. स्वतः धडपड करा. स्वतःचे जीवन अधिक उदात्त, मंगलमय व परिपूर्ण करा.
"जो अंधाराला भिऊन पळतो,
सूर्य त्यांच्यासाठी नसतो."
असं कुसुमाग्रजांनी सांगितलंय....दोन घडीच्या या जीवनाच्या डावात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नाशिवाय दुसरा पर्याय नाही. मरणाला सामोरे जाऊनही चक्रव्यूहात प्रवेश करणे व चक्रव्यूहातून विजयी परतण्याची धडपड करणे या अभिमन्यूच्या प्रयत्नांनी त्याला अजरामर केले. संत गाडगेबाबा, मदर तेरेसा, बाबा आमटे यांनी जगाच्या कल्याणासाठी प्रयत्न केले. त्यांचे जीवन सोने झाले.
काय जगावे जगतापाठी नुसते कुजण्यासाठी ..... देव्हारा व्हा, देवमूर्ती व्हा येऊनि जगतापाठी! कलावंत असो, शास्त्रज्ञ असो, संत असो वा समाजसुधारक असो सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे म्हणून ते अमर आहेत. थोर नेते, देशभक्त यांचे जीवन याची साक्ष देतात.
जंगलात हरवलेली व्यक्ती रडत एकाच जागी बसून राहिली, रस्ता शोधण्याचा प्रयत्न करणार नाही तर काय होईल? हीच बाब जीवनात पदोपदी प्रत्ययास येते.
जीवनाच्या नभी प्रयत्नांचा चंद्र आला सुखाच्या कोजागिरीत यशाने आकंठ भरला एक रिक्त प्याला.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद