एका वृद्ध स्त्रीचे मनोगत मराठी निबंध | Aka Vrudha Stri Che Manogat Essay Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका वृद्ध स्त्रीचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. जांभूळपाडा येथे एक नवा वृद्धाश्रम बांधला असल्याचे वाचून मी माझ्या मैत्रिणीबरोबर तेथे गेले होते, तेथे एका वृद्ध आजींशी आम्ही गप्पा मारल्या.
त्या सांगत होत्या, "पोरींनो, तुम्ही आलात म्हणून मला खूपच आनंद झाला आहे. नाहीतर आम्ही इकडे अगदी एकाकी असतो. कोणाला आमच्याकडे यायला वेळ नसतो. कोणाला आमच्याशी बोलत बसायला आवडत नाही. नेहमी आम्ही इथलीच माणसे समोर भेटत असतो.
त्यामुळे तुमच्यासारखे कोणी बाहेरून आले की ते साऱ्यांचे पाहुणे बनतात. मग कोणी त्यांना आपल्याजवळची बिस्किटे देतील, कोणी खडीसाखर हातावर ठेवतील. बघालच आता तुम्ही!. मी येथे आले ती परिस्थितीमुळे! आता मी थकले. हातपाय चालत नाहीत. तरीपण हे होते तोपर्यंत आम्ही दोघे एकमेकांच्या सोबतीने राहत होतो.
पण गेल्यावर्षी ते गेले. मी एकटीच उरले. माझा मुलगा, सून परदेशात असतात. मला तिकडे बोलावतात. पण मला काही माझी मायभूमी सोडून तिकडे जायचे नाही. शिवाय त्या परक्या देशात, तिथली भाषा येत नाही. म्हणजे कोणाशी बोलाचालायला सुद्धा येणार नाही.
सून, मुलगा नोकरीवर गेले की एकटे आपले भुतासारखे बसून राहायचे. मग तसे एकटेच बसायचे, तर मी आपल्या देशात बसेन आणि इथेच देह ठेवेन. मुलाला मी म्हटले, तुम्ही तुमचे आयुष्य सुखात जगा. माझी चिंता करू नका. मी मृत्यूनंतरही नेत्रदान, देहदान करण्यासाठी फॉर्म भरून ठेवले आहेत. म्हणजे तशीही तुम्हाला काळजी करायला नको.
तेव्हा आता हा वृद्धाश्रम हेच माझे घर. वृद्धाश्रम अतिशय चांगला आहे. इथे साऱ्यांच्या राहण्या जेवण्याची खाण्याची सोय चांगली आहे. आम्हा दोघीदोघींना एकएक खोली दिलेली आहे. दर दोन दिवसांनी एक डॉक्टर येतात. कोणाला काही होत असेल तर औषध देतात.
पण माणसाला फक्त एवढेच हवे असते का? आपल्या माणसांचा सहवास, त्यांचे प्रेम हवे असते. ज्या मुलाबाळांसाठी आपण खस्ता खाल्ल्या, अनेक अडचणी सोसून त्यांना मोठे केले, त्या मुलाबाळांचा सहवास, नातवंडांची संगत हवी असते. पण ते येथे शक्य नसते. माझ्या इतर मैत्रिणींची कहाणी करुणामय आहे.
त्यांना घरात अडगळ समजून येथे आणून टाकण्यात आले आहे. त्यांच्या घरची माणसे फार क्वचित त्यांच्या भेटीसाठी येतात. ही तरुण मंडळी एक गोष्ट विसरतात का, की एक दिवस त्यांनाही म्हातारपण येणार आहे. पूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धतीत वयोवृद्ध माणसांचा मान राखला जायचा.
त्यांचे आशीर्वाद लाख मोलाचे वाटत. पण आज चित्र पालटले आहे. तरुणांना घरातील वृद्ध मंडळी आधार न वाटता अडगळ वाटतात. दोन पिढ्यांच्या विचारातील दरीमुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
परंतु काळाबरोबर धावणाऱ्या मुलांची मने वृद्ध आईबापांनी समजून घेतली, तर दोन पिढ्यांतील विचारांचे अंतर कमी होईल. नातवंडांना आजीआजोबांचा आधार मिळेल, मुलांवर घरात चांगले संस्कार घडतील. तसेच तरुण पिढीने वयोवृद्धांच्या तब्बेतीच्या तक्रारी जाणून घ्याव्यात,
त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करावा. तर घरोघरी स्नेहभाव नांदेल अन् मग वृद्धाश्रम ओस पडतील.अच्छा! तर मुलींनो, येथील सर्व वृद्ध आपापल्या घरी सुखासमाधानाने राहायला लागोत हीच शुभेच्छा !!मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद