भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | BHARTIY SAMAJAT STRIYANCHE STHAN MARATHI NIBANDH
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध बघणार आहोत. भारतीय इतिहासाची पृष्ठे स्त्रीच्या गौरवाने भरलेली आहेत. स्त्रीला गृहलक्ष्मी, अर्धांगिनी, सहचारिणी इत्यादी नावांनी ओळखले जाते. जर आपण लक्षपूर्वक भूतकाळाची पृष्ठे पाहिली तर तिला त्यात माया, प्रपंच असेही म्हटले आहे.
म्हणून भारतीय स्त्रीचे समाजात काय स्थान होते आणि आता काय स्थान आहे? याचा वैदिक काळापासून वर्तमान काळापर्यंत जेव्हा आपण आढावा घेऊ तेव्हाच स्त्रीची वास्तव स्थिती समजू शकते.
वैदिक व उत्तर वैदिक काळापासूनच अशी उदाहरणे सापडतात ज्यात स्त्रीची प्रशंसा केली आहे. प्रकृतिस्वरूप स्त्रीला परमेश्वराच्या शक्तीच्या रूपात स्थान मिळाले आहे. विद्या, विभूती आणि शक्तीची क्रमशः सरस्वती, लक्ष्मी व पार्वती किंवा दुर्गेच्या रूपात सर्वत्र पूजा होते. महर्षि मनुने म्हटले आहे “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता" जिथे स्त्रीची पूजा होते तिथे ईश्वराचा निवास असतो.
प्राचीन काळात सहशिक्षणाचेही उल्लेख सापडतात. वाल्मीकी ऋषीच्या आश्रमात लव कुशाबरोबर ऐंत्रेयीने शिक्षण घेतले होते. मुलींचे लहान वयात विवाह होत नसत. स्वयंवर मांडून आपला पती निवडण्याचे त्यांना स्वातंत्र्य होते. गृहस्वामिनी, माता म्हणून तिला पिता व आचार्यांपेक्षा उच्च दर्जाचे स्थान दिले गेले होते.
महाभारतात "गुरुणां चैव सर्वेषां माता परमं को गुरू" असा उल्लेख येतो. आपल्या देशात एक काळ असाही आला की सगळ्या वाईटाचे मूळ स्त्री जातीलाच मानले गेले. तिला पायातली चप्पल समजले गेले. सतीची चाल, बालविवाह आणि विधवांकडे तिरस्काराने पाहिले गेले, संतानी, कवींनी स्त्रियांप्रती अत्यंत कटू दृष्टिकोन स्वीकारला होता.
कारण स्त्रीमुळे परमेश्वर साधनेत अडथळा येतो अशी त्यांची समजूत झाली होती. पातिव्रत्य धर्माचा उपदेश केवळ स्त्रीला करण्यात आला. पुरुषांसाठी पत्निव्रत धर्माचा कोणताही उपदेश करण्यात आला नाही. कारण त्याची आवश्यकताच वाटली नाही. उलट त्याला फुला फुलांवर गुंगणारा भुंगा समजून सूट देण्यात आली.
"वृद्ध रोगी, मूर्ख, निर्धन, आंधळा बहिरा, रागीट, दीन, हीन असा पती असला तरी पत्नीने त्याची सेवा केली पाहिजे न केल्यास ती सरळ नरकात जाईल परंतु असे कुठेही म्हटले नाही की दुर्दैवाने पत्नी आंधळी, बहिरी, रागीट इ. असेल व पतीने तिची सेवा न केल्यास त्याला नरकात जावे लागेल" असे तुलसीदासाचे मत आहे.
महर्षि दयानंदांच्या मते, 'स्त्रीचा पूजनीय देव म्हणजे पती आणि पुरुषाची पूजनीय देवी स्त्री आहे". मध्यकाळात एकांगी उपदेशामुळे स्त्री आत्महीन झाली होती. परंतु पडदा पद्धतीने तिचे उरले सुरले आत्मबलही हिरावून घेतले. या पद्धतीचे समर्थन हिंदू-मुसलमान दोघांनीही केले.
पडदा पद्धतीमुळे स्त्रियांची स्थिती दयनीय झाली. शंकराचार्य स्त्रीला नरकाच्या दाराची उपमा देतात. तुलसीदास स्त्रीला शूद्र म्हणतात. अशा रीतीने हळूहळू समाजात स्त्री ची प्रतिष्ठा कमी होत गेली.
जरी वर्तमानकाळात बालविवाह सतीची चाल, विधवा यांच्याकडे पाहण्याचा पूर्वीचा दृष्टिकोन राहिला नाही. तरी पण हुंडा प्रथा, अपहरण, बलात्कार इ. समस्यांनी आज परिसीमा गाठली आहे. हुंड्याची प्रथा जीवघेणी बनली आहे. सामाजिक पुनर्जागरणाच्या काळात महान समाज सुधारकांनी सतीची चाल नष्ट केली, विधवांचा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण इत्यादी वर जोर दिला.
स्त्रियांना आपले महत्त्व कळून आले. अशा प्रकारे समाजसुधारकांचे सामूहिक प्रयत्न, राजकीय आणि सामाजिक जागृती पाश्चात्य संस्कृती व विचारांच्या प्रभावामुळे स्त्रीने गुलामीच्या बेड्या तोडल्या आणि ती मुक्तीच्या दिशेने गेली. सामाजिक आणि व्यावसायिक अशा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री ने प्रवेश केला. आहे. व ती सेवा करीत आहे.
तिने ज्ञान दान करून गुरुपदाला सुशोभित केले. खेळ, गिर्यारोहण, मॉडेलिंग, नृत्य संगीत इत्यादी विविध क्षेत्रांवर स्त्रियांचे वर्चस्व आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष विजयालक्ष्मी पंडित होत्या, भारतात बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सरोजिनी नायडू बनल्या.
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी राहिल्या. अनेक प्रांतांत महिला राज्यपाल आहेत. संसदेत विधानसभेत महिला प्रतिनिधी महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत. स्वातंत्र्यानंतर समानतेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
भारतीय घटनेत पुरुष आणि स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य व लिंग भेद न मानता सर्व अधिकार मिळावेत असे नमूद करण्यात आले आहे. हिंदू वारसाहक्काच्या कायद्यानुसार स्त्रियांनाही संपत्तीत समान हक्क मिळाला. हिंदू विवाह कायद्यानुसार त्रासदायक वैवाहिक संबंध संपविण्यासाठी घटस्फोटाची संमती देण्यात आली.
हुंडा घेणारा व देणारा दोघेही शिक्षेस पात्र समजण्यात आले. अशाप्रकारे स्त्रियांना घटनात्मक सुरक्षितता देण्यात आली. आज भारतात स्त्री-पुरुष दोघे मिळून काम करतात. समाजातील प्रत्येक समस्येविरुद्ध आवाज उठवितात. स्त्रिया शोषणाला प्रतिकार करतात. यावरून हे कळते की आता स्त्रियांमधे पुरेशी जागरुकता आली आहे.
अनेक सुधारणा झाल्या तरी आणखी काही समस्या शिल्लक आहेतच. स्त्रियांना मताधिकार मिळाला पण शोषणाची समस्या आहेच. हुंडा प्रथा, बाल विवाह वगैरे चालूच आहे. स्त्रियांना सर्वांचे सुख हवे संघर्ष नव्हे.
स्त्री ही त्याग, वात्सल्य आणि शांतीची देवी आहे. स्त्रीशक्ती नवनिर्माण करते व मनुष्याला देवत्वाकडे घेऊन जाते. म्हणून स्त्रीला समाजात सन्मान मिळाला पाहिजे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद