भारतीय संस्कृती वर निबंध | Bhartiya sanskriti in marathi essay

 भारतीय संस्कृती वर निबंध | Bhartiya sanskriti in marathi essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  भारतीय संस्कृती वर मराठी निबंध बघणार आहोत. संस्कृती म्हणजे चांगल्या प्रकारे संस्कार केलेला, शुद्ध केलेला असा त्याचा अर्थ आहे. संस्कृतीची व्याख्या करणे कठीण आहे. इंग्रजी शब्द Culture चा हा पर्यायी शब्द आहे. 


संस्कृतीच्या स्वरूपाबद्दल विचारवंतांनी आपले मत व्यक्त केले आहे. के. एम. मुन्शी म्हणतात "आपल्या वागण्यात जी आपली मानसिक अवस्था, मानसिक प्रकृती असते जिचा उद्देश आपले जीवन चांगले शुद्ध, पवित्र बनविणे व आपले उद्दिष्ट प्राप्त करणे हा असतो. तीच आमची संस्कृती आहे."


डॉ. भगवान दास यांच्या मते "मानसिक क्षेत्रात प्रगतीची सूचक प्रत्येक सम्यक कृती, संस्कृतीचे अंग बनते." यात प्रामुख्याने धर्म, तत्त्वज्ञान, सर्व प्रकारचे ज्ञान, विज्ञान, कला, सामाजिक व राजकीय संस्था, प्रथा यांचा समावेश होतो." मॅथ्यू अर्नोल्डच्या मते "एखादा समाज किंवा राष्ट्राची श्रेष्ठ प्राप्ती म्हणजे संस्कृती आहे. समाज आणि राष्ट्र त्याच्याशी परिचित असते."


सारांश, संस्कृती ही समष्टीप्रधान असते. ती एखाद्या समाजाने राष्ट्राने शेकडो वर्षांपासून जपून ठेवलेली प्राप्ती असते. संस्कृतीशी मिळताजुळता शब्द सभ्यता आहे. पण दोन्हीच्या अर्थात अंतर आहे. सभ्यता एखाद्या समाज व राष्ट्राच्या वर्तमान जीवन प्रणालीला निर्देशित करते. 


ती बाह्य जीवनाची वाहक आहे. तर संस्कृती आत्म्याच्या अभ्युत्थानाची निदर्शक आहे. सभ्यता आपल्या भौतिक आणि स्थूल प्रगतीचा आरसा आहे. तर संस्कृती भूत आणि वर्तमानकाळाच्या आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक मूल्यांचे रसायन आहे. संस्कृती मनुष्याचे मन बुद्धीच्या श्रेष्ठ प्राप्तीचा संचय आहे. 


ती ऊर्बोन्मुखी आहे. ऋषी, तपस्वी, कर्मयोग्यांच्या पुरुषार्थाची गंगा आहे. जिथपर्यंत भारतीय संस्कृतीचा प्र श्न आहे ती अत्यंत पुरातन आहे. तिच्यात असे काही आहे जे इतरत्र उपलब्ध नाही. . भारत जगातील पुरातन राष्ट्र आहे. त्यास भारत वर्ष, इंडिया, आर्यावर्त, हिंदुस्थान, हिंद नावाने ओळखले जाते. 


स्वयं ईश्वराने जिथे अवतार घेतला ही ती पुण्य भूमी आहे. या देशात सात मोक्ष देणारी तीर्थस्थळे आहेत. अयोध्या, मथुरा, काशी, कांची, हरिद्वार, उज्जैयिनी आणि द्वारका या तीर्थस्थळांची यात्रा होणे हे प्रत्येक हिंदूला आपले सौभाग्य वाटते. शंकराचार्यांनी देशाच्या चार दिशांना चार मठांची स्थापना करून त्याला ऐक्याच्या सूत्रात बांधले होते.


पूर्वेकडे गोवर्धन मठ, पश्चिमेकडे शारदा मठ, उत्तरेकडे ज्योतिर्मय मठ, दक्षिणेकडे शृंगेरी मठ. आजही भारताच्या आत्म्यात स्थित आहेत. याठिकाणी शैव, वैष्णव, आणि शाक्त आपल्या श्रद्धेनुसार आपल्या आराध्य दैवतांचे वंदन, पूजन व भजन करतात.


होळी, दिवाळी, दसरा, रक्षाबंधन, मकरसंक्रांत, पोंगल, ओणम इ. सण देशाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत साजरे केले जातात. भारत एक कर्मप्रधान देश आहे. येथील कर्मफलाचा सिद्धांत ही जगाला एक अलौकिक देणगी आहे. अवतारवाद भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. 


या देशात अनेक धर्म, जाती, संप्रदायावर निष्ठा ठेवणारे लोक राहतात. येथील १८ प्रादेशिक भाषांना घटनेने मान्यता दिली आहे. धर्म, जाती, भाषा, वेषभूषा यात भिन्नता असूनही हा देश धर्म आणि तत्त्वज्ञानदृष्ट्या एक आहे.


"अनेकतेत एकता" हे येथील संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. भारतीय लोक असे मानतात की आत्मा चिरंजीव आहे. त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. यज्ञ, हवन, पूजन आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत १६ संस्कार ही भारतीय संस्कृतीची चिन्हे होत. मंदिर मशीद, गुरुद्वारे येथील जातीय एकतेचे सूचक आहेत. 


भारतीय संस्कृतीतील समन्वयाचा सिद्धांत महत्त्वाचा आहे. त्यानुसार सर्व धर्मांच्या लोकांनी अवगुणांचा त्याग करणे श्रेयस्कर आहे. भारतीय संस्कृतीची ग्रहणक्षमता असाधारण आहे. अनेक विदेशी जातींनी भारतावर वेगाने आक्रमण केले. परंतु काही काळानंतर ते बौद्ध व शैव बनले. 


भारताने मुस्लिम. वास्तुकला, ग्रीक कला व ज्ञान ग्रहण केले. इथे जे आले ते इथलेच झाले. म्हणून भारतात हजारो प्रकारचे रीतिरिवाज, पोषाख, विवाह, खाण्यापिण्याच्या पद्धती प्रचलित आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक भिन्नता दिसून येते. 


कुठे गगनचुंबी पर्वत, कुठे बर्फाची शिखरे, कुठे घनदाट जंगले, कुठे वाळवंटे, कुठे खळाळत जाणाऱ्या नद्या तर कुठे कोरडी पठारे. कधी भूकंप, कधी दुष्काळ, कधी पूर; कधी वादळ तरीही हा देश आपल्या परंपरा जिवंत ठेवून कणखरपणे उभा आहे.


आपली संस्कृती आपणास शांती, अहिंसा, ऋजुता, सहिष्णुता, उदारता, अपरिग्रह, दया आणि क्षमेचे धडे शिकविते. त्याचबरोबर संकटप्रसंगी वज्राप्रमाणे कठोर होऊन परिस्थितीशी सामना करण्याची पण प्रेरणा देते. 


आपल्या संस्कृतीचा प्रभाव श्रीलंका, चीन, सुमात्रा, इंडोनेशियावर पडला आहे. जयशंकर प्रसाद आपल्या काव्यात म्हणतात. "यवन को दिया दया का दान, चीन को मिली धर्म की दृष्टि। मिला यह स्वर्ण-भूमि को रत्न, शील का सिंहल को भी दृष्टि। 


भारतीय संस्कृतीचे वर्णन करणे फार गुंतागुंतीचे आहे. आपल्या संस्कृतीत योग आणि भोग, तप आणि त्याग, साधना आणि सिद्धी, धर्म आणि तत्त्वज्ञान,ज्योतिष आणि व्याकरण यांचा अद्भुत समन्वय आहे. चार पुरुषार्थांची कल्पना ही भारतीय संस्कृतीचीच देणगी आहे. 


पुढेष्णा, वित्तेष्णा आणि लोकेष्णेच्या आधारे फ्राईड, एडलर इ. नी आपले तत्त्वज्ञान मांडले. काम आणि संपत्तीच्या मूळ प्रेरणेचे सिद्धांत भारतीय लोकेष्णा आणि वित्तेष्णेची व्याख्याच आहे. त्यांच्यात आपले काहीच नाही. साम्यवादाच्या कल्पनेचा आधारही भारतीय उपनिषदात सापडतो.


"तेनत्यक्तेन भुग्जीथा मा गृधः कस्य स्विद् धनम्॥ अर्थात् ईश्वराला आपल्याबरोबर ठेवीत त्यागपूर्वक (याला) भोगत राहा. आसक्त होऊ नका (कारण) धन कुणाचे आहे, कुणाचेच नाही.


भारतीय संस्कृती एका दिव्य विभूतीचे चिंतन नसून ती कर्मप्रधान व आचरणप्रधान आहे. यात आपल्या स्थूल देहाचे केवळ चिंतनच नव्हे तर आचरणाचा आग्रह होता जो जनसामान्यांच्या गुणाला उत्तेजन देऊन त्यास देवत्वाकडे घेऊन जातो. ही आत्मस्वार्थाची भावना सोडून. "बहुजन सुखाय बहुजन हिताय' च्या सद्सद्विवेकाला जागृत करते.


भारतीय संस्कृती बहिर्मुखी नसून अंतर्मुखी आहे. म्हणून ती बाहेरच्या वादळ वाऱ्याला तोंड देत अमर झाली. ही संस्कृती मनुष्या मनुष्यात भेद करीत नाही म्हणून मानवतेशी तिचे नाते जुळले. तिचा स्वभाव तत्त्वज्ञान आणि कर्मावरून दिसून येतो.


 'वसुधैव कुटुंबकम' कारण ती "आत्मवत सर्व भूतेष" च्या तत्त्वज्ञानावर आधारलेली आहे. युगानयुगे चालत आलेली ही आपली जीवनप्रणाली आहे. हे जीवनाचे आदर्श अनेक युगांपासून आपल्या जीवनात मिसळत आले आहेत. 


ही मूल्ये म्हणजे केवळ धार्मिक उपदेश नसून आपल्या ऋषी मुनींची साधना, तफ्चर्या आणि चिंतनाचा परिणाम आहे. ज्याचा उद्देश आत्मसाक्षात्कार आणि 'स्व' ला ओळखणे हा आहे. भारतीय संस्कृतीची ही सर्वांगीणता तिच्या वरेण्यतेसाठी पुरेशी आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद