देश हा देव असे माझा मराठी निबंध |Desh Ha Dev Ase Mazha Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण देश हा देव असे माझामराठी निबंध बघणार आहोत. जहाँ डालडालपर सोनेकी चिड़ियाँ करती हैं बसेरा। वह भारत देश है मेरा ॥ हे गीत ऐकताना ऊर अभिमानाने भरून येतो. आपला भारत देश खरोखरच 'सुवर्णभूमी' म्हणून ओळखला जात असे. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
'तुजसाठी मरण ते जनन।
तुजविण जनन ते मरण ॥
अशा भावनेने स्वातंत्र्यवीरांनी आणि कित्येकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या काळी साऱ्यांचे एकच ध्येय होते - 'देश हा देव असे माझा!' त्याची पूजा करण्यासाठी सर्वस्वाचा होम करायचा.
आता स्वातंत्र्याच्या काळात नवे युग सुरू झाले आहे. आजही आपला देश हा आपला देव मानला पाहिजे. त्याची तेजोमय पूजा आपल्या हातून घडायला पाहिजे. देश म्हणजे देशातील दगड माती धोंडे नव्हेत, तर देशातील माणसे, आपण सारे!
आपल्या साऱ्यांच्या रक्षणासाठी कायम घरादारापासून दूर राहणाऱ्या, आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना 'देश हाच देव!' असतो. समरप्रसंगी हे जवान आपल्या पंचप्राणांचा नैवेद्य अर्पून या देशरूप देवाची पूजा करतात. मात्र देशाच्या ठिकाणी असणारे हे देवत्व फक्त जवानांनाच जाणवून भागणार नाही.
तर ते तुम्हा आम्हा सर्वांना जाणवले पाहिजे. आणि या देशाची पूजा करण्यासाठी म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने झटले पाहिजे. आपल्या देशात हिमालयातील उंचच उंच पर्वतरांगा, गंगेचे सुपीक मैदान, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार असा विविधतेचा समृद्ध ठेवा आहे.
गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा आदी नद्यांनी हा देश सुजलाम् व सुफलाम् झाला आहे.अनेक धर्म-पंथांचे लोक भारतात बंधुभावाने राहत आहेत. भिन्न भिन्न भाषा येथे बोलल्या जातात. परंतु साऱ्या विविधतेतून, भिन्नतेतून एकच संस्कृतिप्रवाह वाहत आहे आणि अखंड एकता नांदत आहे.
भारतीय संस्कृती सर्वांना आपल्यात सामावून घेते व सर्वांना बंधुभावाने राहायला शिकवते. अशा या देशाच्या पूजेसाठी आपण सदैव झटले पाहिजे. ही पूजा कशी करावयाची? तर आज देशापुढे अनेक आर्थिक, सामाजिक, राजकीय समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे.
या ध्येयासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करणे ही देशाची पूजा ठरेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरही जीवघेणी स्पर्धा चालू आहे. काही बडी राष्ट्र आपले वर्चस्व टिकविण्यासाठी भारतासारख्या विकसनशील राष्ट्रात अराजक निर्माण करू पहातात. अशा वेळी दक्षतापूर्वक आपल्या देशहिताचे रक्षण केले पाहिजे. पूर्वी आपला देश विद्येच्या क्षेत्रात आघाडीवर होता.
अनेक परदेशी ज्ञानार्जनासाठी इथे येत असत. आज मात्र या भूमीत अनेक लोक निरक्षर आहेत. त्यांना साक्षर करणे, त्यांचा विकास घडवून आणणे आणि पर्यायाने देशहिताचा विकास साधणे हीही देशरूपी देवाची पूजाच होय.
आपल्या देशातील प्राचीन मूर्ती चोरट्या मार्गाने परदेशात पाठविणे, देशातील संरक्षणविषयक गुप्त रहस्ये बाहेर देशात पोहोचवणे आदी गोष्टी करणाऱ्या समाजकंटकांना शासन करणे व देशहिताचे रक्षण करणे हीही देशदेवाची पूजा होय.
स्वार्थासाठी आपल्या विद्येचा उपयोग परदेशांमध्ये करणाऱ्यांना 'देश हा देव असे माझा' असे म्हणता येणार नाही. आज भारताने अणुस्फोटचाचण्या करून आपला देश महासत्ता व्हायला सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र अणुशक्तीचा शांततामय कार्यासाठी वापर करण्याचे भारताचे धोरण आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे स्थान प्राप्त होण्यासाठी भारताला आर्थिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक आघाड्यांवरही आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून घेऊन तो टिकवून ठेवता आला पाहिजे. या ध्येयाचा पाठपुरावा करणे ही महान देशसेवा, देशदेवाची पूजा ठरेल.
आपल्या कर्तृत्वाने, मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो, आपण आपल्या देशाला अग्रक्रमावर नेले पाहिजे. जय जवान ! जय किसान! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद