समाधान हेच श्रेष्ठ धन मराठी निबंध | Essay In Marathi On Samadhan Hech Shrestha Dan

 समाधान हेच श्रेष्ठ धन मराठी निबंध | Essay In Marathi On Samadhan Hech Shrestha Dan

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण समाधान हेच श्रेष्ठ धन मराठी निबंध बघणार आहोत. सर्व प्रकारच्या धनात समाधान हेच श्रेष्ठ धन होय. इतर सर्व प्रकारची संपत्ती याच्यासमोर नगण्य आहे.मनुष्य एक संवेदनशील प्राणी आहे. त्याच्या इच्छा कधीही न संपणाऱ्या आहेत. एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी इच्छा निर्माण होते. 


अशी इच्छांची परंपराच निर्माण होते. हेच दु:खाचे मूळ कारण आहे. इच्छांचे दमन करूनच मानवाला खरे सुख प्राप्त होऊ शकते. भारतीय संस्कृतीही याच धनाला श्रेष्ठ मानते. समाधानरूपी धन मिळताच माणूस इच्छांचे दमन करण्यास शिकतो.महोपनिषदात असे म्हटले आहे की "अप्राप्य वस्तूची चिंता करू नये. 


प्राप्त वस्तूत समाधानी असावे. उगाचच आपल्या इच्छा वाढवू नयेत. व्यक्तीच्या ज्या इच्छा सामर्थ्याबाहेरच्या असतात म्हणजे ज्या ती पूर्ण करू शकत नाही त्यापासून दूरच राहावे. मृगजळापासून दूर राहून इच्छित वस्तू प्राप्त करून संतुष्ट व्हावे हीच सुखी मनुष्य जीवनाची ओळख आहे."


समाधान हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. संत कवींनी समाधान हे भक्तीचे एक अंग मानले आहे. वर्तमान युगात मनुष्य पैशाच्या मागे वेड्यासारखा धावत सुटला आहे. त्यात तो सर्वांच्या पुढे जाऊ इच्छितो. लाखोपतीच करोडपती होऊ इच्छितो. 


अशा परिस्थितीत जर त्याने समाधानाचा आश्रय घेतला तर त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला मिळतील. संत कबीर म्हणतात, "हे ईश्वरा मला इतके धन दे की ज्यात माझ्या कुटुंबाचे पालनपोषण होईल. मी व माझ्या घरी आलेला अतिथी उपाशी राहणार नाही.


समाधान हे असे अमृत आहे ज्याचे सेवन करून व्यक्ती अमर होते. त्यामुळे माणसात इतकी शक्ती येते की तो इच्छांचे दमन करतो. एका अमूल्य खजिन्याची प्राप्ती झाल्यामुळे तो जो आधी भिकारी असतो तो राजा बनतो. समाधान मिळाले की सगळ्या चिंता दूर होतात. मन चिंतामुक्त होते. ज्यांना काहीच इच्छा नसतात ते राजे असतात.


आज मनुष्य असमाधानी आहे. तो अकारणच स्वत:च दु:खाच्या चक्रव्यूहात अडकतो. स्वार्थामुळे देशाशी, मानवतेशी विश्वासघात करतो म्हणून आज अतृप्ती, वैमनस्य आणि अराजकता पसरलेली आहे. अशा वातावरणात केवळ समाधानरूपी धनच शांती देऊ शकते.


समाधानाच्या विरुद्ध तृष्णा असते. मनुष्य जास्तीत जास्त भौतिक पदार्थ मिळवू इच्छितो. तृष्णेमुळे पतन होते हे त्याला माहीत असले तरी तो माया-मोहाच्या जाळ्यात सापडतो आणि त्यातून सुटण्याचा जितका प्रयत्न करतो तितका त्यात अडकतच जातो. 


ज्याप्रमाणे मधावर बसलेली माशी जितका उडण्याचा प्रयत्न करते तितकी त्यात अडकतच जाते आणि शेवटी मरते. तृष्णा ही भयंकर महारोग असेल तर लालसा तिचा पती आहे. यांच्याशी कधी मैत्री करू नये. कारण यांच्या साध्या स्पर्शानेही आपणास तो रोग होतो. म्हणून लोभ आणि तृष्णेपासून नेहमी दूरच राहावे. 


मनुष्याच्या मनांत जर लोभ रूपी महारोगाने घर केले तर तो अशांत होतो. इच्छापूर्तीसाठी कोणताही मार्ग स्वीकारतो. आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हेही त्याला कळत नाही याउलट समाधानी मनुष्य असा कुठेही भटकत नाही अस्वस्थ होत नाही.


असंतुष्ट मनुष्य तृष्णेच्या दलदलीत फसत जातो. आपल्या इच्छापूर्तीसाठी वाईट मार्गाने जातो. शत्रूला आपल्या देशाची रहस्ये विकतो. या तृष्णेमुळे तो आतून पोकळ होतो. जशी लाकडाला लागलेली वाळवी लाकूड पोकळ करते तसा. अशी व्यक्ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या दु:खी असते असे म्हटले आहे की


'लोभ पापस्य कारणम्' अर्थात् लोभ हेच पापाचे कारण आहे हा वाईट गुण जर व्यक्तीमध्ये असेल तर इतर वाईट गुण त्याच्यात असण्याची गरज नाही. कारण ते वाईट गुण आपोआपच येतात. काही लोकांचे असे मत आहे की, समाधान आळसाला जन्म देते व व्यक्ती जीवन संघर्षापासून पलायन करू लागते परंतु असा विचार करणे चूक आहे


 कारण समाधान व्यक्तीला अकर्मण्य करीत नाही तर जीवनसंघर्षात विवेकीपणाने भाग घेण्यास शिकविते. समाधानी व्यक्ती वर्तमानात कर्म करताना भविष्याप्रति प्रयत्नशील असते. वर्तमान व्यवस्थित करण्यात व भविष्याला निश्चित करण्यासाठी सदैव झगडत असते. अडचणी आल्या तरी निराश होत नाही.


समाधानरूपी धन प्राप्त झाल्यावर व्यक्तीच्या डोळ्यांत एक चमक आणि चेहऱ्यावर एक अनोखे तेज येते. ओठांवर हास्य असते आणि मन कर्तव्यपरायण होते. समाधानामुळेच मानव मानवच राहतो. सामान्यापासून विशेषत्वाकडे जातो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद