शिस्तीचे महत्व मराठी निबंध | Essay On Discipline In Marathi

 शिस्तीचे महत्व मराठी निबंध | Essay On Discipline In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शिस्तीचे महत्व मराठी निबंध बघणार आहोत. एखाद्या इमारतीचा टिकाऊपणा, मजबूती, भक्कमपणा तिच्या पायावर आधारलेला असतो किंवा एखाद्या रोपाचे वृक्षात रूपांतर ज्याप्रमाणे त्या रोपाला ते लहान असताना जे जलसिंचन झाले, त्याचे जे संरक्षण झाले त्यावर अवलंबून असते. 


त्याचप्रमाणे शिस्तच नागरिकांचे जीवन सुखमय बनवू शकते. नियमबद्ध जीवन म्हणजे शिस्त. म. गांधी, पं. नेहरू, लाल बहादुर शास्त्री इ. थोर लोकांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे चालणे म्हणजे शिस्त. प्रत्येक व्यक्ती सुखाच्या अपेक्षेने कोणतेही कार्य करते. 


ते करीत असताना दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण होऊ नये हे ध्यानात ठेवणे म्हणजे शिस्त. शिस्त दोन प्रकारची असते. एक म्हणजे सरकारने बनविलेल्या कायद्याचे पालन करणे, दुसरा प्रकार म्हणजे समाजाने बनविलेल्या नियमांचे पालन करणे. शिस्तीत राहणारी व्यक्ती सभ्य समजली जाते.


संपूर्ण विश्वात केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी अस्तित्वात असून त्यात मानवसृष्टीच सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. शिस्तीत जगणाऱ्या लोकांमुळेच कित्येक राष्ट्रांनी उन्नतीचे शिखर पादाक्रांत केले. बेशिस्त लोकांमुळे देशाची अवनती होते. म्हणून देशातील नागरिकांनी


शिस्त पाळली पाहिजे. शिस्तीमुळे हिंसा, अराजकता इ. प्रवृत्ती नष्ट होतात. शिस्तीमुळे दृढ़ संयम येतो. कोणत्याही क्षेत्रातील शिस्त असो तिचे महत्त्व निर्विवाद आहे. निसर्गसुद्धा शिस्तपालनाचा उपदेश करतो. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, सूर्योदय पूर्वेकडे व सूर्यास्त पश्चिमेकडे होणे, चंद्र ताऱ्यांचे उगवणे-मावळणे हे सर्व शिस्तबद्ध रीतीने होत असते. 


जर या सर्वांनी शिस्त न पाळली तर सृष्टीत प्रलय होईल. शिस्तीमुळेच विजयाची दारे उघडतात याला इतिहासही साक्ष आहे. मूठभर शिस्तबद्ध इंग्रजांनी कोट्यावधी बेशिस्त भारतीयांवर. १५० वर्षे राज्य केले.


शिस्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्वात जास्त शिस्त देशाच्या सैन्यात दिसून येते. शिस्त नसेल तर सैन्य म्हणजे एक भली मोठी गर्दीच! भारताच्या शिस्तबद्ध सेनेने तीन युद्धांत पाकिस्तानवर त्यांच्याकडे विदेशी हत्यारे असूनही विजय मिळविला. इतिहासात अशी अनेक उदाहरणे सापडतात की, छोट्याशा सैन्याने विशाल सेनेवर विजय मिळविला होता.


बेशिस्त ही देशातील अनेक समस्यांची जननी आहे. या समस्यांचे उत्तर जवळच्या भविष्यकाळात सापडेल असे वाटत नाही. याच कारणामुळे देश हळूहळू रसातळाकडे जात आहे. देशातील समस्यांकडे एक नजर टाकल्यास असे दिसते की, प्रत्येक जण कुणाच्या न कुणाच्या हातातली कळसूत्री बाहुली बनून नाचत आहे. 


मग त्यात त्यांचा फायदा असो वा नसो. समाज, धर्म आणि जातीच्या काही ठेकेदारांनी आज देशावर, भाषिक, धार्मिक, राजनैतिक, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक प्रश्न लादले आहेत. आपण डोळे बंद करून त्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानतो. शेवटी ती कोणती कारणे आहेत जी सत्य माहीत असूनही सत्यापासून तोंड लपवितात. 


खरी गोष्ट ही आहे की स्वातंत्र्यानंतर देशाबद्दलचा आपलेपणा कमी झाला. कसे-बसे राष्ट्रगीताच्या वेळी स्थिर उभे असतो. हे सर्व बेशिस्त आणि देशाच्या अपमानाचे द्योतक नाही का? अशीच छोटी छोटी कारणे शेवटी देशाच्या विघटनाला, देशातील प्रश्नांना कारणीभूत ठरतात, दहशतवाद निर्माण करतात. 


समस्यांसाठी एक नवीन वातावरण तयार करतात. बेशिस्त कधीकधी कौतुकास पात्र बनते. परतंत्र भारतातील नेत्यांनी तरुणांना ब्रिटिश शासनाची शिस्त न पाळण्यासाठी प्रेरित केले होते. विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला, सरकारी कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडल्या. 


या बेशिस्तीमुळेच आपला देश स्वतंत्र झाला. परंतु असे करणे तेव्हा आवश्यक होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात देश विद्यार्थ्याच्या बेशिस्तीला कंटाळून गेला आहे. कारण त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. अशाप्रकारे बेशिस्त ही केव्हाही निंदनीयच?


वाढत चाललेल्या बेशिस्तीमुळे माणूस स्वैराचारी बनला आहे. सगळीकडे बेशिस्तीचा बोलबाला आहे. म्हणून या समस्येची कारणे व त्यावरील इलाज याकडे लक्ष देण्याची


या समस्येचे सर्वात मुख्य कारण मुलांचे अनावश्यक लाडा योग्य संस्कारांच्या अभावी मुले मोठी झाल्यावर बेशिस्त होतात. दुसरे कारण आहे योग्य शिक्षणाचा अभाव, आजच्या वास्तव जीवनाशी आधुनिक शिक्षणाचा काही संबंध नाही. त्यामुळे मुले समाजशील बनू शकत नाहीत. 


यातूनच बेशिस्तीचा जन्म होतो, तिसरे कारण म्हणजे शिक्षणात झालेला राजकारणाचा प्रवेश. यामुळे विद्यार्थी पदभ्रष्ट व बेशिस्त झाले आहेत. बेशिस्त नष्ट करावयाची असेल तर वरील कारणांकडे खास लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार करावे लागतील. 


त्यांच्या चांगल्या प्रवृत्ती विकसित कराव्या लागतील तरच त्यांना शिस्त लागेल. आपली शिक्षण पद्धती सुधारली पाहिजे. ती जीवनाशी संबंधित असली पाहिजे. नागरिकांचा नैतिक दर्जा उंचावला पाहिजे. आणि शिक्षण राजकारणापासून लांब असले पाहिजे.


शिस्तच राष्ट्राची रचना करते. अशा राष्ट्रात उच्च नीच भेदभाव नसतो. यासाठी लोक सुशिक्षित असले पाहिजेत. त्यांचे विचार राष्ट्राच्या प्रगतीला पोषक असले पाहिजेत. आर्थिक स्त्रोत असे असावेत की त्यांच्यामुळे भांडणे उद्भवू नयेत. सर्व धर्म, मतांना राष्ट्राची मान्यता असावी.


देशद्रोहयांना मृत्युदंडाची शिक्षा असावी. सरकारने राष्ट्रीय संस्कृती आणि परंपरांच्या निर्दोष विकासासाठी विभागीय स्तरावर काम करावे. म्हणजे एक सुंदर, शिस्तबद्ध राष्ट्र साकार होईल. आपल्या देशाने लोकशाही शासनप्रणाली स्वीकारली आहे. म्हणून त्याच्या यशस्वितेसाठी शिस्त आवश्यकच आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद