राष्ट्रभाषा हिंदी मराठी निबंध | Essay on Hindi- Our National Language in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण राष्ट्रभाषा हिंदी मराठी निबंध बघणार आहोत. भारत एक फार मोठे राष्ट्र आहे. येथे भाषा, धर्म, जाती, पंथ, पोशाख इत्यादी ची विविधता आहे. परंतु जगात भारत हा एकच असा विलक्षण देश आहे की ज्याच्या विविधतेत एकता अंतर्भूत आहे.
याची धार्मिक ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजनैतिक, भौगौलिक इत्यादी अनेक कारणे आहेत. ऐक्याच्या अनेक साखळ्या आहेत. त्यापैकीच एक साखळी भाषा हिंदी. जेव्हा मनुष्य या पृथ्वीवर जन्म घेतो आणि कालांतराने जेव्हा त्याला कळू लागते. तेव्हापासून त्याला भाषेची गरज वाटू लागते. भाषा हेच ते साधन आहे.
ज्याच्याद्वारे मनुष्य आपल्या विचारांची देवाण-घेवाण करतो. इथे अनेक भाषा बोलल्या, वाचल्या जातात. तरी संपूर्ण राष्ट्रात एक भाषा अशी असते जिच्यामुळे लोकांमध्ये परस्पर भावसंबंध निर्माण होतात. तिचा देशाच्या राज्यकारभारातही वापर होतो. तिलाच राष्ट्रभाषा म्हणतात.
२६ जानेवारी १९५० पासून भारतीय राज्यघटना अमलात आली व देवनागरी लिपीत लिहिली जाणारी हिंदी भाषा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यात आली. हीच भाषा आपल्या राष्ट्राचा आत्मा, भारतीय सभ्यता आणि संस्कृतीच्या अभिव्यक्तीचे माध्यम, राष्ट्रीयता आणि ऐक्याचा मंत्र फुकणारी शक्ती, देशवासीयांमध्ये प्रेम आणि विवेकाला जागृत करणारी, स्वाभिमान उत्पन्न करणारी आणि राष्ट्रीय गौरव दर्शविणारी भाषा होय.
राष्ट्रभाषेची निवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. त्या याप्रमाणे की देशांतील अधिकांश जनता कोणती भाषा बोलले व तिला समजते? जनसामान्यांचे लिहिण्या वाचण्याचे माध्यम कोणती भाषा आहे. कोणत्या भाषेत जास्तीत जास्त वाङमय निर्माण झाले आहे व होत आहे
या आधारावर हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला. राष्ट्रभाषेसाठी आवश्यक असणारे सगळे गुण हिंदीमध्ये आहेत. प्राचीन काळापासून आजतागायत हिंदीची वाङमय गंगा अव्याहत वाहत आहे. हिंदी भाषेचा शृंगार, सूर, तुलसी, कबीर, महादेवी वर्मा, प्रसाद, निराला, बच्चन इत्यादी जगप्रसिद्ध वाङमयनिर्मात्यांनी केला..
राष्ट्रभाषेच्या अभावी देश सभ्यता, सांस्कृतिक जीवन ज्ञान विज्ञानात स्वावलंबी होऊ शकत नाही. तसेच नागरिकांचे स्वतंत्र बौद्धिक चिंतन आणि संशोधन होऊ शकत नाही. परकीय भाषेच्या कुबड्यांच्या आधारे कोणतेही राष्ट्र अणुशक्ती व अंतराळाच्या युद्धाच्या शर्यतीत विकसित राष्ट्रांबरोबर भाग घेऊ शकणार नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी त्याशिवाय चालणार नाही हेही खरे, कारण हिंदी जरी राष्ट्रभाषा असली तरी आंतरराष्ट्रीय भाषा नाही.
असे असले तरी तिचे महत्त्व यत्किंचितही कमी होत नाही. परकीय भाषा आपणास भयावह अशा मानसिक दास्यात जखडते. परकीय भाषेपेक्षा लवकर आपली मातृभाषा व राष्ट्र भाषा मुलांना येते. त्यामुळे त्यांच्या बालमनावर दडपण येत नाही.
घटनेने हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आणि हे निश्चित केले की १९६५ पर्यंत इंग्रजीवर हिंदीचे वर्चस्व प्रस्थापित होऊन ती पट्टराणी बनेल पण ती बनली दासी. पांडवांना बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. रामाला चौदा वर्षे वनवास भोगावा लागला.
भारतात जन्मठेपेची शिक्षा चौदा वर्षे असते. चांगल्या वर्तणुकीमुळे ही शिक्षा कमी पण होऊ शकते. परंतु हिंदी भाषेच्या नशिबाला आलेला वनवास कमी होण्याऐवजी तो वाढतच चालला आहे. आज आपल्यासमोर सर्वात मोठा आव्हानात्मक प्रश्न हा आहे की हिंदीला तिच्या गौरवशाली सिंहासनावर कसे बसवावे? राष्ट्रभाषा हिंदीच्या मार्गात अडचणी उभी करणारी कारणे कोणती आहेत?
या सर्व प्रश्नांचे उत्तर असे आहे की आपल्या राजकीय मत्सद्यांची, विचारवंतांची अल्पसंतुष्ट वृत्ती ही मंडळी संपूर्ण भारतात राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार, प्रचार, होण्यावर जोर देत नाही. दुसऱ्या राज्यातील भिन्न भाषा बोलणारे लोक नाराज होऊ नयेत म्हणून ते काळजी घेतात.
कारण प्रादेशिक भाषेबरोबरच तेथे इंग्रजी भाषेवरही जोर दिला जातो. हिंदी तिथे गौण विषय आहे. हिंदीच्या प्रगतीच्या मार्गात इंग्रजी भाषा अडथळे उत्पन्न करते. इंग्रज तर निघून गेले. पण भारतीय लोक अजूनही त्यांच्या पदराला धरून चालतात.
त्यांच्या दृष्टीने इंगजी हेच प्रगतीचे मूळ कारण आहे. हीच आंतरराष्ट्रीय जनसंपर्काची भाषा आहे. इंग्रजी भाषेच्या ज्ञानामुळेच आपण विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत येऊ शकतो. आपल्या सदोष शिक्षण पद्धतीने आपण हिंदीच्या मार्गात अडथळे उभे केले आहेत.
आपल्या देशात आजही इंग्रजांचीच शिक्षण पद्धती आहे. जिने फक्त कारकून निर्माण केले. आपले भारतीय लोक हा विचार करतात की जर हिंदी भाषा सत्तेत आली तर प्रादेशिक भाषा लुप्त होतील. परंतु त्यांना हे कळत नाही की हिंदी राष्ट्रभाषा व इंग्रजी पाहुणी भाषा असेल व प्रादेशिक भाषांचे वर्चस्व पूर्वीप्रमाणेच कायम राहील.
आज हिंदीकडे उपेक्षेच्या दृष्टीने पाहिले जाते. इंग्रजी येत असलेली व्यक्ती दुसऱ्याकडे तिरस्कृत नजरेने पाहते. राज्य सरकार आणि केंद्र सरकारांच्या परस्पर पत्रव्यवहाराचे माध्यमही इंग्रजीच आहे. राजकीय मुत्सद्दी आणि नेते परदेशांत जेव्हा जातात तेव्हा इंग्रजीतच भाषण देतात.
परंतु परकीय राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात येतात तेहा त्यांच्याच मातृभाषेत ते भाषण करतात. त्याही वेळी आपले नेते इंग्रजीत भाषण करतात आणि त्याचा त्यांना अभिमान वाटतो. केंद्र सरकार हिंदी प्रचार प्रसाराचे कार्य आपण करते असा दावा करते पण त्यासाठी खंबीर पावले उचलत नाही. सध्या हिंदी ही केवळ अनुवादाची भाषा झाली आहे.
हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळे आपण तिचा प्रसार, प्रचार केला पाहिजे. हिंदीला प्राथमिक वर्गापासून महाविद्यालयीन वर्गांपर्यंत अनिवार्य करावे. राजकीय कार्यासंबंधीचा पत्रव्यवहार हिंदी भाषेत व्हावा. संस्था आणि रेल्वे स्टेशनची नावे प्रादेशिक भाषेबरोबरच हिंदीतही लिहिली जावीत.
निमंत्रण पत्रिका हिंदीत छापाव्यात. नावांच्या पाट्या हिंदीत लिहाव्यात. न्यायालयाचे कामकाज हिंदीत व्हावे. हिंदी भाषेच्या प्रचार प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम वृत्तपत्रे आणि दूरदर्शन आहे. त्यांची प्रगती म्हणजे हिंदीची प्रगती.हिंदी आपली राष्ट्रभाषा असली तरी प्रादेशिक भाषेलाही हिंदीइतकाच मान मिळावा.
पारतंत्र्याचे प्रतीक असलेली इंग्रजी भाषा हटवून हिंदीला पट्टराणी करावे. जर रशिया, चीन, जापान, कोरिया इ. देश आपल्या राष्ट्रभाषेचा उपयोग करून प्रगतीच्या शिखरावर विराजमान होऊ शकतात. तर भारतही इंग्रजीचा त्याग करून हिंदीला स्वीकारून मागासलेला राहील कसा?
केवळ १४ डिसेंबरला 'हिंदी दिवस' साजरा, करून समाधान मानू नये तर तिच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद