राष्ट्रीय एकता वर निबंध | Essay on National Unity In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण राष्ट्रीय एकता मराठी निबंध बघणार आहोत. राष्ट्राच्या प्रगतीचा मूळ आधार असतो, त्या राष्ट्रातील लोकांचे आपल्या देशावर असलेले प्रेम व आपापसांतील प्रेम, राष्ट्रासाठी त्याग व राष्ट्रावरील प्रेम देशवासीयांमध्ये ऐक्याची भावना उत्पन्न करते.
राष्ट्रीय ऐक्य राष्ट्राची समृद्धी आणि सुखशांतीसाठी आवश्यक असते. राष्ट्रीय ऐक्य राष्ट्राला विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत नेऊन उभे करते. राष्ट्रीय समस्यांचे निवारण करून राष्ट्रावर आलेल्या संकटांना तोंड देण्यास समर्थ करते. राष्ट्रीय ऐक्य हे असे एक अदृश्य सूत्र आहे जे देशातील लोकांना एका सूत्रात बांधण्याचे कार्य करते.
राष्ट्रीय ऐक्याच्या अभावी जातिवाद, भाषावाद, प्रांतवाद, बेशिस्त इत्यादी समस्या डोके वर काढू लागतात. भारत हे नेहमीच एक राष्ट्र राहिले आहे. उत्तर भारतातील एक भारतीय रामेश्वरच्या समुद्रात स्नान करून आपले जीवन सफल झाले असे मानतो, दक्षिणेतील एक तामिळ भारतीय हरिद्वारला गंगास्नान करून स्वत:ला धन्य समजतो.
दक्षिण भारतातील शंकराचार्याकडे संपूर्ण भारत आदराने पूज्यभावाने पाहतो. म. बुद्ध, महावीर, शिवाजी, राणा प्रताप, कालिदास, भवभूती आपापल्या जन्मस्थानाच्या सीमा ओलांडून संपूर्ण देशाचे गौरवाशाली पूर्वज म्हणून स्मरणीय आहेत.
हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत रामायण व आसामपासून द्वारकेपर्यंत महाभारत समस्त भारताला जोडते. भारतभर पसरलेली तीर्थस्थळे राष्ट्रीय ऐक्याची महत्त्वाची केंद्रे होत. जेव्हा एक भारतीय, बंकिमचंद्र चटर्जीचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' गातो तेव्हा संपूर्ण राष्ट्र, 'त्रिशंकोटि-कण्ठकल निनाद कराले द्वित्रिंश-कोटिभुजैधृतर करवाले' गात धुंद होतो.
गुजरातमधील गांधीजींच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल, लाला लाजपतराय, देशबंधू चित्तरंजन दास, मौलाना अबुल कलाम आजाद, गफ्फार खान, मोतीलाल नेहरू इत्यादी सर्व राज्यांतील पुढारी राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मैदानात उतरले. वंदेमातरमचा जयघोष आणि खादीचा पोशाख राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक बनले.
देशाचे ऐक्य नष्ट होणे. देश परतंत्र होणे, सुदैवाने पुन्हा तो स्वतंत्र होणे यात देशाला अनेक आघात सहन करावे लागले. तरीही आज दुर्दैवाने भारताचे राष्ट्रीय ऐक्य छिन्न विछिन्न होत आहे.
राष्ट्रीय ऐक्याला बाधक ठरणारे मुख्य घटक म्हणजे धार्मिक, आर्थिक, भाषिक, भौगोलिक विषमता इ. भारतात हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, पारशी इत्यादी निरनिराळ्या धर्मांचे लोक राहतात. हे धर्म पण अनेक मते मतांतरांमध्ये वाटले गेले आहेत.
काही कट्टरपंथी लोक आपला धर्म श्रेष्ठ मानतात. भारतात धार्मिक दंगली होऊन संचारबंदी लागू होणे ही सामान्य गोष्ट आहे. भारतात आर्थिक विषमतेची प्रचंड दरी आहे. भांडवलदारांकडे प्रचंड धन आहे. तर गरीब लोकांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्यांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत.
परंतु आधुनिक भारतात मध्यमवर्गीयांचे प्रमाण वाढत आहे हा एक शुभसंकेतच आहे. भारतात अनेक भाषा आणि बोली बोलणारे लोक राहतात. भाषेच्या आधारे प्रांत पाडण्यात आले व नवीन प्रांतांची भाषेच्या आधारेच मागणी होत आहे. भौगोलिकदृष्ट्याही भारतात खूप विषमता आहे.
उत्तरेकडे हिमालय पर्वत व मैदानी भाग आहे तर दक्षिणेकडे पठारी भाग आहे. पश्चिमेकडे थरचे वाळवंट आहे. या सर्व कारणांमुळे भारताची विविधता दिसून पडते. याच अनेकतेत एकता लपलेली आहे. भारतात जरी अनेक धर्म असले तरी धार्मिक सहिष्णुता आहे.
भारत सरकार गरीब लोकांना दारिय रेषेच्या बाहेर आणण्यासाठी कंबर कसून उभे आहे. भारतात हिंदी भाषा व देवनागरी लिपीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे. भौगोलिक अंतर विज्ञानाच्या प्रगतीमुळे कमी झाले आहे.
राष्ट्रीय ऐक्यासाठी आवश्यक असलेले घटक म्हणजे राष्ट्रीयत्वाची भावना, धर्म निरपेक्षता, राष्ट्रभाषा, राष्ट्रीयत्वाची भावना आणि देशप्रेम देशाला त्याचे तुकडे होण्यापासून वाचविते. परंतु भारतात राज्याराज्यांत भांडणे आहेत. प्रादेशिकतेची भावना राष्ट्रीय ऐक्याला बाधक ठरते. भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.
धर्माने देश जोडला जातो. परंतु राजकारणामुळे राष्ट्रीय ऐक्याचे नुकसान होते. राजकीय पक्षांद्वारे धर्म लक्षात घेऊन तिकिटांचे वाटप करणे व अल्पसंख्याकांचे समाधान करणे ही नीती राष्ट्रीय ऐक्याला बाधक ठरते. आपली घटनाच धर्मनिरपेक्षतेची बहुसंख्याकांमध्ये व अल्पसंख्याकांमध्ये वाटणी करते.
ज्यादेशात वेगवेगळ्या धर्माच्या स्त्रियांसाठी वेगवेगळे संरक्षणात्मक कायदे केले जातात. तिथे राष्ट्रीय ऐक्याची केवळ कल्पनाच केलेली बरी. भारतीय घटनेने हिंदीला राष्ट्रभाषा मानले. परंतु खऱ्या अर्थाने अद्यापपर्यंत ते स्थान तिला मिळाले नाही. सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा हिंदीच आहे.
दक्षिण भारतातील काही राजकीय पक्षांनी तिला वादाचा विषय केले आहे. "गर्व से कहो, हम सब भारतीय है" भारत सरकारची ही घोषणा गर्वाची भावना निर्माण करू शकत नाही. _राष्ट्रीय ऐक्याचा एकमात्र मार्ग देशाच्या रथाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो. म्हणून राष्ट्रीय ऐक्याच्या विकासासाठी उपाययोजना केली पाहिजे.
त्यासाठी मुख्य साधन म्हणजे शिक्षण. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत केले जाऊ शकते. राष्ट्रगीताचे उच्चारण, देशांतगर्तत प्रवास आदी मुळे राष्ट्रीय ऐक्याचा विकास होतो. यादृष्टीने वृत्तपत्र, रेडियो, दूरदर्शन आदी प्रसार माध्यमे पण महत्त्वाची भूमिका बजावतात.
भारताचे सांस्कृतिक मंत्री हुमायून कबीर यांनी निरनिराळ्या राज्यांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान. राष्ट्रीय संग्रहालय आदी खेरीज आणखी चार बाबी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात त्या म्हणजे १) भारतातील विविधतेचा स्वीकार करावा.
२) प्रत्येक भारतीय नागरिकाने संपूर्ण भारतीय संस्कृती आपली समजावी. ३) प्रत्येक अल्पसंख्याक जातीने भारतीय संस्कृतीत जी भर घातली तिची किंमत केली पाहिजे. ४) देशातील सर्व लोकांना आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रगतीची संधी मिळावी.
भारताचा जुना अभिमान परत प्राप्त व्हावा. जगद्गुरूचे स्थान पुन्हा मिळावे, आर्थिक व सैनिकी शक्ती वाढावी याची एकमेव किल्ली आहे-राष्ट्रीय ऐक्य, मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद