परोपकार मराठी निबंध | Essay on Philanthropy in Marathi

परोपकार मराठी निबंध | Essay on Philanthropy in Marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण परोपकार मराठी निबंध बघणार आहोत. गोस्वामी तुलसीदास म्हणतात परहित सरिस धर्म नहीं भाई। पर पीड़ा सम नहिं अधमाई॥ अर्थात् दुसऱ्यांचे चांगले करण्यासारखा दुसरा धर्म नाही, आणि दुसऱ्यांना पीडा देण्यासारखे दुसरे पाप नाही. 


परोपकारांचा शाब्दिक अर्थ आहे दुसऱ्यांची भलाई. नि:स्वार्थ भावाने दुसऱ्यावर उपकार करणे म्हणजे परोपकार. आपले, परके, मित्र, शत्रू, पशू, पक्षी कीटक इत्यादी च्या दु:खाचे निवारण निष्काम भावाने करणे म्हणजे परोपकार. परोपकार हे एक प्रकारचे कठीण तप आहे जे सामान्य माणसाला शक्य नाही परोपकारी व्यक्ती स्वत:च्या स्वार्थाचा त्याग करून मनातील वाईट भावना काढून टाकते. 


तेव्हा त्याचे परोपकाराचे तप पूर्ण होते. दुसऱ्यांवर उपकार करून मानवाला आत्मिक सुखाची प्राप्ती होते. हरबर्टच्या शब्दांत परोपकार करण्यात जे सुख आहे ते जगातील कोणत्याही सुखापेक्षा मोठे आहे". निसर्गात सेवेचा नियम अव्याहत कार्य करीत असलेला दिसतो. 


सूर्य आणि चंद्र जगाला प्रकाश व उष्णता देतात. वायू जीवनास आवश्यक प्राणवायू देतो, पृथ्वी राहण्यास जागा देते, वृक्ष सावली देतात, मेघांमुळे पाऊस पडतो, झऱ्यातून पाणी पडते, शिंपले मोती देतात, नदी आपले पाणी देते, शेतमळे धान्य देतात इत्यादी कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेने निसर्ग हे देत नाही. 


ते केवळ आपल्या जन्मजात स्वभावामुळे असे करतात. मग दुसऱ्याच्या हितासाठी आपले जीवन वाहून टाकावे हे मानवाचे कर्तव्य नाही का? व्यक्ती दीन दुबळ्यांना कोणत्या तरी आंतरिक प्रेरणेनेच मदत करते. 


जखमी माणसाला दवाखान्यात घेऊन जाताना आपण असा विचार करीत नाही की बरा झाल्यावर तो आपल्याला काही बक्षीस देईल. परोपकारी कृत्ये आंतरिक सद्गुणांमुळेच होतात. श्रीमंत व्यक्तीच परोपकार करू शकतात असा तर्क केला जातो. परंतु विचारांती असे दिसते की परोपकारासाठी धनाची गरज नसते तर फक्त सेवाभावी मनाची आवश्यकता असते. 


आपण मार्ग चुकलेल्या माणसाला मार्ग दाखवू शकतो. रस्त्याच्या मधोमध पडलेला कचरा, केळीची साल, दगड उचलून एका बाजूला फेकू शकतो. हा सर्व परोपकारच आहे. आपण दुःखिताचे अश्रू पुसू शकलो, त्याच्या दु:खात भागीदार बनू शकलो, एखाद्याच्या डोक्यावरचा बोजा हलका करू शकलो, तहानलेल्याला तांब्याभर पाणी देऊ शकलो तर आपण परोपकाराचा आनंद व पुण्यफल प्राप्त करण्याचे सहज अधिकारी बनू. 


परोपकारासाठी धनादी साधनांपेक्षा दुसऱ्याच्या दु:खामुळे कातर होणाऱ्या, द्रवणाऱ्या हृदयाची जास्त गरज असते. म. येशू ख्रिस्ताने जगाचे पाप स्वत:चे आहे असे मानले आणि ते हलके करण्यासाठी स्वत:चे बलिदान केले. भगवान शंकराने देवदानवांच्या हितासाठी विष प्राशन केले. 


दधिची ऋषींनी शरीर त्याग करून आपल्या अस्थीपासून वज्र तयार करण्याची परवानगी देवांना दिली होती. अगणित स्वातंत्र्यसैनिक देशासाठी बळी गेले. राजा रतिदेव आपले सर्वस्व दान देऊन चाळीस दिवस उपाशी राहिले. 


त्यानंतर जेव्हा भोजनाची तयारी झाली तेव्हा अतिथींना जेवायला घालून ते संतुष्ट झाले. राजा रतिदेवाने "कामार्ताहिः दु:ख तप्तानां प्राणिनामात्र नाश मने" ची कामना केली अर्थात, मला मुक्ती ही नको माझी फक्त एकच कामना आहे ती अशी की समस्त प्राण्यांच्या दु:खाने माझ्या हृदयात निवास करावा. कुणाचे नुकसान न व्हावे इतके तरी आपण करूच शकतो.


परोपकाराची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. प्रत्येक समाजात परोपकारी व्यक्ती जन्म घेतात. जर असे नसते तर समाजात रचनात्मक कार्याचा आरंभच शक्य नव्हता. दवाखाने, रस्ते, विहिरी, तलाव, धर्मशाळा, मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारे इत्यादी परोपकारी व्यक्तींचीच देणगी आहे. 


देशसेवेसाठी जातीच्या उद्धारासाठी आदर्श ठेवून हुतात्मा होणाऱ्या व्यक्ती परोपकाराच्याच भावनेने प्रेरित झालेल्या होत्या. खरेच आहे की "जो आपल्या जातीसाठी मरतो तो जिवंत राहतो" आपला पुरुषार्थ, आपले मनोबल आपले शरीर जर जातीच्या कामी आले नाही तर सगळे व्यर्थ आहे.


"जो परक्याच्या कामी येतो तो जगात धन्य आहे. धन साठवून कुणी यशस्वी होत नाही" असे मानले जाते की ८४ लाख योनीतून गेल्यावर मनुष्यजन्म प्राप्त होतो. म्हणून ते महत्त्वाचे आहे. त्याचे महत्त्व आणखी वाढण्यासाठी शरीराला परोपकारांच्या कामी लावावे. 


नि:स्वार्थीपणे दुसऱ्यांची सेवा करावी. त्यामुळे आत्मा प्रसन्न होतो. त्यास अलौकिक, मानसिक सुख प्राप्त होते. स्वार्थी मनुष्य असा खरा आनंद प्राप्त करण्यास असमर्थ ठरतो. जीवन अमर करण्यासाठी ते दुसऱ्याला समर्पित करावे. केवळ लाभाचा


विचार करणारी व्यक्ती 'माणूस' म्हणविण्यास लायक नाही असा मनुष्य पशु असतो. जो मनुष्य परोपकारात मग्न असतो त्याचे भले आपोआपच होते. ज्याप्रमाणे मेंदी वाटणाऱ्या माणसाचे हात लाल होतात.


आज परोपकाराचे स्वरूप बदलत आहे. परोपकाराच्या आवरणात लोक आपला स्वार्थ साधून घेतात. राजकीय पुढारी 'गरिबी हटाओ' ची घोषणा करून गरिबांची मते आपल्याकडे खेचून घेतात. अनुसूचित जातिजमातींसाठी जागा आरक्षित करून आपली मते पक्की करतात. 


काही व्यापारी आयकरात सूट मिळविण्यासाठी दवाखाने उघडतात 'हे आजच्या परोपकाराचे बदलेलेले स्वरूप आहे. अशा परिस्थितीत भारतीय संस्कृती" वसुधैव कुटुंबकम, आत्मवत्सर्वभूतेष, बहुजन हिताय बहुजन सुखाय' च्या सद्विवेकाचा संदेश देते. आज याच भावनेची आवश्यकता आहे. भारतीय संस्कृतीच्या या संदेशांना आपलेसे करूनच आपण परोपकाराच्या अगदी जवळ पोहोचू शकतो.


मानवजातीच्या रक्षणासाठी जनमानसात परोपकाराची भावना जागृत करणे आवश्यक आहे. खरे सुख मानवाजवळच असते ते म्हणजे परोपकार. परोपकाराद्वारे मानव ईश्वराजवळ जातो. ज्या यशाच्या प्राप्तीसाठी मनुष्य करोडो रुपये खर्च करतो. त्याच यशाची प्राप्ती परोपकारी माणसाला खर्च न करताही होते. महर्षि व्यास यासंबंधी म्हणतात “परोपकारा: पुण्याय, पापाय, परपीडनमो" मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद