संत ज्ञानेश्वर वर निबंध | Essay on sant dnyaneshwar in Marathi

 संत ज्ञानेश्वर वर निबंध | Essay on sant dnyaneshwar in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संत ज्ञानेश्वर मराठी निबंध बघणार आहोत. महाराष्ट्राच्या स्वतंत्र संस्कृतीचा, भागवत पंथाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला. ज्ञानेश्वरांच्या काळात यादवांचे राज्य होते, तरी वैदिक धर्माची परंपरा खिळखिळी झाली होती. 


कृत्रिम व्रतवैकल्यात व धार्मिक कर्मकांडात समाज बुडून गेला होता. उच्च ज्ञान, धर्मज्ञान संस्कृतात असल्याने मराठी भाषिकांना त्याचा फारसा उपयोग नव्हता. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरांनी एक नवे चैतन्य निर्माण केले. म्हणून त्यांनी मराठी संस्कृतीचा पाया घातला असे म्हटले जाते.


ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना त्यांनी नेवासे येथे इ. स. १२९० मध्ये केली. ही भगवद्गीतेवरील टिका आहे. गीतेवरील या ओवीबद्ध भाष्यात ज्ञानेश्वरांनी ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग यांचा सुंदर आविष्कार केलेला आहे. समाजाला या भाष्यरूपाने एक सर्वंकष तत्त्वज्ञान सादर केले आणि हे तत्त्वज्ञान महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार महत्त्वाचे ठरले.


ज्ञानेश्वरी म्हणचे एक अक्षरकाव्य आहे. तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा फार सुरेख संगम या ग्रंथात आढळतो. या संस्कारग्रंथातून शतकानुशतके मराठी मनांचे पोषण झाले आहे. संस्कृतात अडकून राहिलेले तत्त्वज्ञान मराठी माणसाला समजावे म्हणून ज्ञानेश्वरांनी मुद्दाम मराठीतून मांडले. आणि मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले


 'माझा मराठाचि बोलु कौतुके। 

परि अमृतातेही पैजा जिंके॥


ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे इ. स. १२७५ मध्ये झाला आणि इ.स.१२९६ मध्ये त्यांनी आळंदी येथे समाधी घेतली. या अवघ्या २१ वर्षांच्या कालखंडात त्यांनी जे कार्य केले त्याला जगात तोड नाही. संन्याशाची मुले म्हणून समाजाने त्यांना लहानपणापासून वाळीत टाकलेले होते. 


परंतु समाजाने अवहेलना करूनही या भावंडांचा समाजाविषयी असलेला जिव्हाळा कमी झाला नाही. ज्ञानेश्वरीच्या पसायदानात ज्ञानेश्वर मागणे मागतात 'जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात॥' तत्कालीन समाजाचे नेमके दुखणे कशात आहे याची पूर्ण जाणीव ज्ञानेश्वरांना होती. 


म्हणून त्यांनी नामदेवांबरोबर सोप्या, सुलभ अशा भक्तिमार्गाची स्थापना केली. समाजातील जातिभेद, विषमता नष्ट करून भागवत धर्माचा पाया घातला. या भागवत धर्माच्या झेंड्याखाली कोणीही येऊ शकत होते. त्यात नरहरी सोनार,


बंका महार, चोखा मेळा, गोरा कुंभार, सावतामाळी असे सारेजण होते. या साऱ्यांना बरोबर घेऊन ज्ञानेश्वरांनी वाटचाल केली हे त्यांचे वेगळेपण आहे, मोठेपण आहे.


ज्ञानेश्वरांनी लोकांना भक्तीचा सुलभ मार्ग दाखवून दिला. 'देवतांचे अवडंबर माजवू नका, लबाड पुजाऱ्यांवर अवलंबून राहू नका. देव भावाचा भकेला असतो. तुम्ही भक्तिभावाने केवळ देवाचे नामस्मरण करा. त्याला धूपदीप नैवद्य कशाचीही जरूर नाही, तुम्ही मनापासून भक्ती करा. 


देव तुमच्यावर प्रसन्न होईल.' अशा त-हेची शिकवण त्यांनी जनसामान्यांना दिली. भक्तिरस आळविताना त्यांनी केलेली अभंगनिर्मिती, अनुभवामृत ही सारी साहित्यरचना मराठी सारस्वताचे अनमोल लेणे आहे. 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी


तेणे मुक्ति चारी साधियेल्या' ज्ञानेश्वरांनी असा हा सोपा भागवत धर्म समाजमानसात रुजवला. 'चांगदेव पासष्टी' लिहून त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण केले. ज्ञानेश्वरांनी लिहिलेले


 'पैल तो गे काऊ कोकताहे।

शकुन गे माये सांगताहे।' 


असे अनेक अभंग आजही मराठी मनावर राज्य करीत आहेत. ज्ञानेश्वर हे खऱ्या अर्थाने ज्ञानियांचा राजा होते. तेव्हा ज्ञानेश्वर हा महाराष्ट्र भूमीत घडलेला एक महान चमत्कार होय. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद