नैनितालची सहल मराठी निबंध | Essay on a Visit Nainital
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण नैनितालची सहल मराठी निबंध बघणार आहोत. नैनिताल हे उत्तर प्रदेशातील एक अत्यंत रमणीय, आकर्षक, आनंददायक पर्वतमय प्रदेशात वसलेले एक पर्यटनस्थळ आहे. १९३८ मीटर उंचीवर असलेल्या या स्थळाची जितकी स्तुती केली जाईल तितकी कमीच आहे.
दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक येथे आनंद मिळविण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी व सुट्टी घालविण्यासाठी येतात. हे शहर एका विशाल तलावाच्या चारी बाजूस वसलेले आहे. या सरोवराचे नाव नैनीझील किंवा नैनी सरोवर असे आहे. तलाव आणि शहराचे नाव स्थानिक नैनीदेवीच्या नावावरून पडले आहे.
नैनी देवीचे मंदिर भव्य आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मलाही नैनितालला जायला मिळाले. आम्ही काठगोदामपर्यंत रेल्वेने गेलो तिथून टॅक्सीने नैनितालला. काठगोदाम ते नैनिताल अंतर ३५ किलोमीटर आहे. पक्क्या रस्त्याने ही गावे जोडलेली आहेत.
नैनिताल इतर ठिकाणांशीही रस्त्यांनी जोडलेले आहे. तिथून अलमोडा ६८ किमी., दिल्ली ३२२ किमी, रानीखेत ५९ किमी आहे. या सर्व शहरांमधून नैनितालला बसेसची जा-ये चालू असते. पंतनगरचे फुलबाग विमानतळ इथून ७१ कि.मी. दूर आहे. पूर्ण तयारीनिशी मी नैनितालला गेलो होतो.
या पर्यटन स्थळाबद्दलची सर्व माहिती मी गोळा केली होती. त्याबदलची पुस्तके, मासिके वाचली होती आणि माझ्या गुरुजींनाही विचारले होते. ते बरेचदा तिथे जाऊन आले होते. खूप माहिती मिळाल्यामुळे माझ्या आनंदात भर पडली.
मला इतकी माहिती असल्याचे पाहून माझ्या आई बाबांना आश्चर्य वाटले व त्यांनी माझे कौतुक केले. नैनितालला पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये उतरलो, जेवण केले आणि झोपलो. लांबच्या प्रवासामुळे थकलो होतो.
दुसऱ्या दिवसापासून आमची सुखद सहल दिनचर्या सुरू झाली. जी पुढे आठवडाभर चालू राहिली. असे म्हणतात की एका इंग्रज प्रवाशाने १८४१ मध्ये नैनितालचा शोध लावला होता. त्याचे नाव बरो होते. आपण सगळे खरोखरच त्याचे ऋणी आहोत.
त्याने इंग्रज प्रशासकांना त्यास विकसित करण्यासाठी प्रेरित केले. पाहता पाहता नैनिताल संयुक्त प्रान्ताची ग्रीष्मकालीन राजधानी आणि आवडते पर्यटनस्थळ बनले. प्रसिद्ध शिकारी आणि पर्यावरण तज्ज्ञ, जिम कॉर्बेटनेही आपले पुस्तक 'माय इंडिया' मध्ये याचा विस्ताराने उल्लेख केला आहे.
हिऱ्याप्रमाणे चमचमणारे नैनी सरोवर येथील मुख्य आकर्षण आहे. आम्ही कितीदा तरी या सरोवरात नौकाविहाराचा आनंद लुटला. प्रत्येक वेळी आम्हाला एक नवाच अविस्मरणीय अनुभव आला. त्याच्या चारी बाजूला विलोची सुंदर झाडे आहेत. त्यांचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब मायावी वाटते.
रात्री शहरातील दिव्यांची असंख्य प्रतिबिंबे पाण्यात पडतात. ते दृश्य अलौकिक व चमत्कारिक दिसते. परंतु दु:खाची गोष्ट ही आहे की, नैनी सरोवर प्रदूषणाचे शिकार बनले आहे. नैनी सरोवराने शहराला मल्लीताल आणि तल्लीताल या दोन भागांत विभागले आहे.
नैनितालला अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. सर्वप्रथम आम्ही नैना शिखरावर गेलो यालाच चायना पीक असेही म्हणतात. २६११ मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. हिमालयाची हिमाच्छादित शिखरे येथून दिसतात.
येथून नैनिताल शहर आणि सरोवराचे दृश्य पण फार मनोहर दिसते. लारियाकान्ता येथील दुसरे उंच शिखर आहे. येथूनही चारी बाजूंचे सुंदर दृश्य दिसते. हनुमान गढी हे आणखी एक प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील हनुमान मंदिरात नेहमीच दर्शनासाठी लोकांची गर्दी असते. स्टेट औवजखेट्री डोरोयिसीट, किलबरी येथील इतर प्रेक्षणीय ठिकाणे व शिखरे आहेत.
एक दिवस आम्ही भूवालीत घालविला. हे ठिकाण नैनितालपासून ११ कि.मी. दूर आहे. फिरण्यासाठी आम्ही सतताल, भीमताल, आणि नौकछियातील येथेही गेलो. सर्व ठिकाणी खूप आनंद वाटला. आम्ही मनसोक्त भटकलो. मी माझ्याबरोबर स्वयंचलित कॅमेरा नेला होता.
ठिकठिकाणी आम्ही सुंदर दृश्यांचे फोटो काढले आणि आमची सहल स्मरणीय केली. हे सर्व फोटो खूप सुंदर आले आणि आमच्या अल्बमची शोभा बनले. ते पाहिले की माझ्या आठवणी ताज्या होतात आणि मी भावविवश होतो.
संध्याकाळ होताच सगळे प्रवासी आपल्या उतरलेल्या ठिकाणाहून बाहेर फिरायला निघतात. मालरोड, रस्ते, बाजारात जातात. रंगीबेरंगी नवनव्या फॅशनचे कपडे घालून नटून थटून स्त्री पुरुष मुले खूप छान दिसतात. ते स्वर्गातीलच एक दृश्य वाटते.
त्यांचे कपडे, आणि अंगाला येणारा अत्तराचा वास सगळ्या वातावरणाला मादक सुगंधित बनवितो. विविध मूल्यवान दागिन्यांने मढलेल्या व फुलांनी सजलेल्या स्त्रिया अप्सरेसारख्या भासतात. मंत्रमुग्ध होऊन कोणी त्यांच्याकडे पाहत राहील तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.
खरोखरच ही सहल माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. मला, तिथे वारंवार जावेसे वाटेल. पण न जाताही मी तिथल्या आनंदाची आणि मौज मस्तीची कल्पना करून त्यातच मग्न होतो. तिथे घोडेस्वारीचाही एक वेगळाच आनंद मिळतो.
तिथे जाऊन प्रथमच मला असा अनुभव आला की पर्वतमय स्थळांचा प्रवास आणि भ्रमण यात एक वेगळीच जादू आहे. किती आकर्षण आणि आनंद आहे त्यात. तिथे गेल्यावर असे वाटले की जगात आनंदच आनंद आहे. अजिबात दु:ख नाही.
परंतु तिथून परतल्यावर पुन्हा वास्तवाच्या कठोर पृथ्वीवर आलो आणि अभ्यासाला लागलो. परिश्रम करून घाम येण्याचाही एक वेगळा आनंद आहे. विशेषतः सुखद सहलीनंतर. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद