हे गणराया मराठी निबंध | Hey Ganaraya Essay Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हे गणराया मराठी निबंध बघणार आहोत. हे गजानना, गणेशचतुर्थीला तुझे घरोघरी आगमन होते. हा एक सुंदर आनंदसोहळा असतो. वर्षभर तुझे भक्तजन या मंगल दिवसाची वाट पाहत असतात.
आपल्या काळज्या, व्यथा, दु:खे नेहमीचीच आहेत, पण हे सारे विसरून लोक या उत्सवात सहभागी होतात. म्हणूनच हे गणराया, प्रतिकूल परिस्थितीतही जीवन आनंदाने जगण्याची उमेद देणारे दैवत म्हणून सारे तुझ्याकडे पाहतात.
या दहा दिवसांच्या सोहळ्यातून तू उमेदीचे टॉनिक भक्तांना देतोस. हे गणेशा, तू आनंदाची उधळण तुझ्या चारही हातांनी अथकपणे करतोस. तू माणसातील स्वत्व जागवतोस, त्यातून त्याची उमेद वाढते, स्वत:च्या कर्तृत्वावरचा भरवसा वाढतो व असा ध्येयासक्त माणूस झपाटल्यासारखा कार्य करतो आणि यशाची नवीनवी शिखरे पादाक्रांत करतो.
या अर्थाने तू ऊर्जानिधी आहेस. तुझ्या असण्याने, तुझ्या दिसण्याने तुझ्या 'मंगलमूर्ती मोरया' या जयजयकाराने रोमारोमात उत्साहाचा संचार होतो. सबलालाच नव्हे अपंगालाही हा उत्साह उमेदीचे वाटप करतो.
हे गजानना, तुला सुखकर्ता, दुःखहर्ता म्हणतात. संकटात सापडलेल्या देवांचा तू गणनायक झालास. अत्यंत कुशलतेने लष्कराची आखणी करून तू असुरांचा नि:पात केलास. याचाच अर्थ असा की साऱ्या दुर्गुणांचा, अपप्रवृत्तींचा नाश करून माणसातील मांगल्य जागे केलेस.
या तुझ्या मांगल्यमय उत्सवाचे आज व्यापारीकरण झाले आहे. उत्सवाचा फेस्टिवल बनला आहे. उत्सवामागचा भाव हरवला आहे आणि मानवी संबंधांचे, भावभावनांचे सुंदर पैलू व्यवहाराच्या तागडीत तोलले जात आहेत. गणेशोत्सव छानछोकीने, थाटाने करण्यासाठी वैध-अवैध मार्गाने निधी उभा केला जातो.
वर्गणीची खंडणी बनते, स्वत:चे महत्त्व वाढावे म्हणून 'पुणे फेस्टिवल' चालू केला जातो. हे गणराया, तुला बुद्धीचा देव म्हणतात. देवनागरी लिपीचा तू उद्गाता आहेस, त्या अर्थाने शब्दसृष्टीचा तू ईश्वर आहेस, शब्दाला अर्थ देणारा देव आहेस. संकटनिवारकही आहेस.
पण आज आमच्या अवतीभोवती जे चालले आहे ते पाहिल्यावर बुद्धिभ्रष्टांचा अंमल सध्या सुरू आहे काय असे वाटू लागते. राजकीय विचार, नीतिमूल्ये, आदर्शवाद या साऱ्या गोष्टी पुराणातील वांग्याप्रमाणे कालबाह्य ठरल्या आहेत. आणि केवळ स्वार्थासाठी सत्ता वापरणे एवढेच राजकारण उरले आहे.
गरीब आणि निवाराहीन लोकांचे पुनर्वसन करण्याची भाषा बोलत सारे लोक स्वतःच्या भावी सात पिढ्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम करून घेत आहेत. भूखंड, एफएसआय, कर्जरोखे यांच्या गैरव्यवहारातून हे राज्य कधीच बाहेर पडणार नाही काय? हे गजानना, आज अनेक प्रकारची प्रश्नचिन्हे आमच्याभोवती गरगरत आहेत.
तेव्हा गजानना, 'ऊठ महागणपती' अशी आळवणी सर्वसामान्य जनता करीत आहे. उद्दामांना शासन करण्यासाठी व साऱ्यांना चांगली बुद्धी देण्यासाठी गणराया, तू ऊठ. या गणेशोत्साबरोबरच उमेदीचे, मांगल्याचे सहस्रावधी दीप तेवू देत आणि त्यांच्या प्रकाशात आमचा अंधकारमय मार्ग तेजाने उजळू दे! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद