जगण्यात मौज आहे मराठी निबंध | jagnyat mauj aahe marathi essay.
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जगण्यात मौज आहे मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण जगण्यात मौज आहे शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत 'जीवन ही एक शाळा आहे', 'जीवन ही एक लढाई आहे' असे निरनिराळे विचार आपण ऐकतो. प्रत्यक्षात जीवन कसे आहे? तर 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असे जीवन आपल्याला लाभलेले असते.
जीवन हा सुखामृताचा पेला आहे. जीवनातील आनंदाचा लाभ कितीही घेतला तरी तो थोडाच आहे. मात्र काही लोकांना जीवनासाठी, जगण्यासाठी द्यावा लागणारा लढा फार भीषण असतो. बेकारी असते, वस्तूंची टंचाई असते, भ्रष्टाचार असतो. या संघर्षाशी मुकाबला करताना त्यांना वाटते
'जगणे कठीण होत आहे. परंतु अशा संघर्षाला तोंड देऊन त्याच्याशी मुकाबला करणे हेच खरे जीवन आहे. प्रत्येकाचे जीवन ही संघर्षाची एक रोमांचक कथा असते. आणि या संघर्षानंतर प्राप्त होणारे यश आपल्याला जगण्यातला राम दाखवून देते. दुःखानंतर प्राप्त झालेल्या सुखाची खरी किंमत आपल्याला कळते.
तेव्हा 'अमुचा पेला दुःखाचा डोळे मिटुनी प्यायाचा' असे न म्हणता, पेला अर्धा रिकामा आहे असा विचार न करता वा! वा! अर्धा पेला तर भरलेलाच आहे. आता फक्त अर्धा भरायचा उरला आहे, अशी वृत्ती बाळगा तर जगण्यातला आनंद आपल्यला उपभोगता येईल.
दुःखेही आपल्या अंगावर धावून येत असतात. पण सुख मात्र शांतपणे तुमच्या अवतीभोवती पसरलेले असते. या सुखाचा आपण शोध घेतला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद आपण अनुभवू शकलो की जगणे आनंदमय बनेल. आणि बालकवींप्रमाणे आपणही म्हणू शकू 'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.'
हा इकडे तिकडे पसरलेला आनंद आपल्याला टिपता आला पाहिजे. मग आपल्याला जगण्यातला आनंद मनमुराद लुटता येईल. झाडाची हिरवीगार पालवी, सभोवतालची हिरवळ, त्यात फुललेली फुले, त्यावर बागडणारी फुलपाखरे, आकाशात मस्त विहार करणारे पक्षी असे विहंगम दृश्य आपल्या भोवती आनंदाची सप्तरंगी उधळण करीत असते.
आपल्या भोवतालचा चिरतरुण निसर्ग, ऋतुमानाप्रमाणे बदलणारे त्याचे सप्तरंग, उंचउंच गिरिशिखरे, दरीतून वर येणारे धुके, खळखळणारे निर्झर, कड्यांवरून कोसळणारे धबधबे या साऱ्यांचा अनुभव घेणे हे स्वर्गसुखासारखे आहे.
फुलांनी बहरून आलेले झाड, वर्षाकाळात धो धो कोसळणाऱ्या पाऊसधारा, निसर्गातील ऊनपावसाचा खेळ, सप्तरंगी इंद्रधनुष्य, वाऱ्यावर सळसळणारी शेते अशा कितीतरी गोष्टींत आनंद दडून राहिलेला आहे. तो आपण शोधू शकलो की जगण्यात मौज आहे हे आपल्याला मान्य होईल.
कुंचल्याच्या जादुगिरीने कॅनव्हासवर उतरणारी सुंदर कलाकृती, भान हरपवून टाकणारी रविशंकरांची सतार, खूप रंगलेली गाण्याची मैफल, पु. ल. देशपांड्यांचे (हसता हसता जीवनातले तत्त्वज्ञान सांगणारे) एकपात्री प्रयोग अशा कितीतरी गोष्टींची यादी सांगता येईल.
ही सगळी, आपले जीवन आनंदमय करणारी सौंदर्यस्थळे आहेत. संगीतामध्ये देहभान हरपवून टाकण्याचे सामर्थ्य आहे. रागसंगीत ऐकत असताना वैयक्तिक सुखदुःखे, वैयक्तिक जीवनातील रागलोभ यांचा आपल्याला विसर पडतो.
परमेश्वर माना वा न माना, पण भव्यदिव्यतेशी, उदात्ततेशी, विशालतेशी आपले नाते जोडले जाते. ही अनुभूती आपल्याला जगण्याची उमेद देते, जीवनातील मौज दाखवून देते. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता .पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
जगण्यात मौज आहे मराठी निबंध | jagnyat mauj aahe marathi essay.
काही वर्षांपूर्वी मुंबईला एक चित्रपट आला होता - ‘एक दूजे के लिये' त्या चित्रपटातल्या प्रेमी युगुलाने आपल्या घरच्या विरोधाला व जाचाला कंटाळून अखेर आत्महत्या केली होती. आणि काय आश्चर्य ? तेव्हापासून वर्तमानपत्रात सारख्या तरुण-तरुणींच्या आत्महत्येच्या बातम्या येऊ लागल्या. (आणि नंतर याच धर्तीचे चित्रपटही अनेक येऊन गेले!)
प्रेमी युगुलांची आत्महत्या. प्रेमभंग झालेल्या तरुणांची आत्महत्या. सासू-सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून सुनेची आत्महत्या, मुले आपल्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून वृद्धांच्या आत्महत्या, नोकरी मिळत नाही म्हणून नवयुवकांच्या आत्महत्या ! भारतातच नव्हे तर जपानसारख्या देशातही आत्महत्या !.
अशा बातम्या सारख्या येऊ लागल्या की असं वाटतं जग खरंच का इतकं दुष्ट आहे ? जीवन इतकं भीषण आहे का की माणसाला जगावंसंच वाटू नये? आणि जग व जीवन जर इतकं कुरूप आणि भयंकर असेल तर ही बाकीची सारी माणसं जगण्यासाठी धडपडत आहेत ? ते कशासाठी जीवन इतकं असह्य आहे का ?
तसं म्हटलं तर एका दृष्टीने जीवन दिवसेंदिवस जास्त भीषण व अधिक असह्य होत चाललं आहे हे नाकबूल करता येणार नाही. जगाबरोबर भारताची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते आहे. अन्नधान्य, कपडालत्ता, राहण्याला निवारा या अत्यावश्यक गरजा सध्या भागत नाहीत.
हौसमौज दूरच ! अशा या दुःखीकष्टी मनात निराशेने सतत भाजून निघण्यापेक्षा सरळ सरळ सरणावर उडी घेतली तर काय बिघडलं ? बिघडलं नाही कसं ? बिघडलंच आहे. अशा एकांगी व टोकाची विचारसरणी करणारं मन नक्कीच बिघडलंय. खरं पाहिलं तर माणसाचा जन्म आणि मृत्यू या गोष्टी त्याच्या हातात नसतातच.
अवती भवती पसरलेलं हे सृष्टीचं स्वप्नरम्य स्वरूप, ते निळे डोंगर, ती तांबडी माती, ते खळखळणारे जलप्रवाह, ही सळसळणारी पाने, त्यातून झुळझुळणारा वारा. ती हिरवी पिवळी शेते. ती हजारो रंगीबेरंगी सुंदर सुंदर फुले आणि मधुर फळे. तो सूर्योदय तो सूर्यास्त; ते चांदण्यांनी उधळलेलं आभाळ ! निसर्गाचं हे वेड लावणारं रमणीय रूप ! आपण कधी पाहतो का ?
भरपूर अंगमेहनत अगर डोकेदुखीचे काम केल्यावर मस्त सुग्रास जेवणावर ताव मारण्यात तृप्ती आहे, तर दुसऱ्या गरजू भुकेलेल्याला आपल्या पुढ्यातलं ताट देण्यात समाधान आहे. स्वतः सुखी राहण्याची धडपड करता दुसऱ्याला सुखी करण्यात पीडितांचे, व्याधिग्रस्तांचे अश्रू पुसण्यात त्याहून मोठा आनंद आहे. जगण्यात मौज आहे !
जगाबरोबर जगण्यात मजा आहे. जगात दुसऱ्या कोणासाठी तरी जगण्यात जास्त आनंद आहे. स्वतः बरोबरच इतरांनाही जगविण्यात परमानंद आहे.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद