खाजगी क्लासेसची आवश्यकता मराठी निबंध | Khajagi Classeschi Avashkata Essay Marathi

  खाजगी क्लासेसची आवश्यकता मराठी निबंध | Khajagi Classeschi Avashkata Essay Marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  खाजगी क्लासेसची आवश्यकता मराठी निबंध बघणार आहोत. आजकालच्या समाजात निरनिराळे बदल घडून येत आहेत. त्यानुसार नवनवे व्यवसाय, उद्योग, फोफावत आहेत. त्यांपैकी एक महत्त्वाचा उद्योग म्हणजे क्लासेस चालविण्याचा व्यवसाय. 


पूर्वी मॅट्रिकच्या मुलांसाठी, इंटरसायन्ससाठी क्लासेस असायचे. पण आता क्लासेसची प्रथा तेवढ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. प्लेग्रुप मध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या पूर्वतयारीपासून दहावी, बारावीपर्यंत तसेच पदवी परीक्षांसाठीही क्लासेस मोठ्या प्रमाणावर चालताना दिसतात. 


यासाठी फीचा आकडा मोठा असतो तरीही हजारो विद्यार्थी तिथे प्रवेश घेताना दिसतात. वडिलधाऱ्या मंडळींचे म्हणणे असते की, शाळेत शिक्षक शिकवतात ना? मग पुनः क्लासेस कशाला ? बरे, शाळेत खूप विद्यार्थी असतात म्हणून शिक्षक प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकत नाहीत असे म्हणावे तर क्लासमध्येसुद्धा 


आजकाल पुन: शाळेतल्या वर्गाइतकीच किंबहुना जास्त मुले असतात, शिवाय शाळेव्यतिरिक्त इतक्या क्लासेसना मुले जात असतात की शेवटी अभ्यास करायला वेळ तरी उरतो का? तेव्हा क्लासबिसचे खूळ डोक्यातून काढून टाकावे, शाळेत शिक्षक शिकवतात तेव्हा लक्ष द्यावे अन् क्लाससाठी दामदुप्पट पैसे वाया घालवू नयेत.


या मंडळींचे म्हणणे काही अंशी बरोबर असले तरी आजकाल सर्वच क्षेत्रात स्पर्धा इतकी जीवघेणी वाढली आहे, की एकेका मार्कासाठी विद्यार्थ्यांचा नंबर जातो. मग सायन्सला प्रवेश मिळवणे कठीण होते. तेव्हा हे जे मार्कासाठी आकाशपाताळ एक करावे लागत असते, त्याचा विद्यार्थ्यांवर फार ताण पडतो. 


अशा वेळी हे क्लासेस त्यांच्या मदतीला येतात. त्यांच्याकडून खूप प्रश्नपत्रिका सोडवून घेतात, त्यांना तयार नोटस् देतात आणि परीक्षेसाठी सर्व प्रकारे तयारी करून घेतात. म्हणून विद्यार्थ्यांना या क्लासेसवाचून पर्याय नाही असे वाटते.


क्लासेस मुलांना आवश्यक वाटतात, याची आणखीही काही कारणे आहेत. शाळा कॉलेजात शिक्षकांना नियमांच्या चौकटीत राहून काम करावे. लागते. वेळापत्रकांचे बंधन असते. याबाबतीत क्लासमध्ये बरेच स्वातंत्र्य असल्याने क्लासमधल्या शिक्षकांना विषयाला व विद्यार्थ्यांना न्याय देता येतो. 


आणखी एक गोष्ट म्हणजे हल्ली शैक्षणिक संस्थांची संख्या व विद्यार्थ्यांची संख्या भरमसाट वाढली आहे. तेव्हा इतक्या संख्येने गुणी अध्यापक मिळणे जरा कठीणच पडते. त्यामुळे शाळेतील अध्यापनाचा दर्जा कमी होणे अपरिहार्यच आणि मुले क्लासला जाणेही अपरिहार्यच! क्लास म्हणजे 'इनएव्हिटेबल इव्हिल' म्हणजे घातक अशी पण अटळ असलेली गोष्ट आहे. यात दोष कोणाचाच नाही. 


परिस्थितीच्या रेट्यामुळे हे घडत आहे. क्लासला 'इव्हिल' म्हणण्याचे कारण असे की बरेचदा तेथे वैचारिक, बौद्धिक विकासाला पोषक वातावरण नसते. मुले म्हणचे परीक्षेच्या शर्यतीतील घोडे झाले आहेत. तेव्हा त्यांना केवळ परीक्षेचे तंत्र शिकवून परीक्षार्थी बनवणे एवढाच प्रकार आज चालू असतो. 


ज्ञानलालसा, अभ्यासातला आनंद, शिकण्यासाठी शिकणे हे आजकाल मागे पडत चालले असून हल्ली ९० टक्के मार्कस् मिळवणे, ९५ टक्के मार्कस् मिळवणे हे ध्येय ठेवन शिक्षण चाललेले दिसते. पुन: एकदा सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यात विद्यार्थ्यांपेक्षा परिस्थितीचाच दोष अधिक मानावा लागेल. 


एकेका गणासाठी जी 'टरेस' चालते, त्यात टिकून राहायचे तर मग विद्यार्थ्याला पर्यायच राहात नाही. शेवटी असे म्हणता येईल की, विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष ठेवून, त्यांच्या कवतीचा अंदाज घेऊन त्यांच्याकडून अभ्यास करवून घेणे, त्यावरच्या चाचण्या घेणे आणि परीक्षांचा सराव देणे हे पद्धतशीरपणे झाल्यास क्लासेस आजच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद