"मन हरले तर मनुष्य हरतो मराठी निबंध | MAN HARLE TAR MANUSHYA HARTO MARATHI NIBANDH

 "मन हरले तर मनुष्य हरतो मराठी निबंध | MAN HARLE TAR MANUSHYA HARTO MARATHI NIBANDH

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण "मन हरले तर मनुष्य हरतो मराठी निबंध बघणार आहोत. मन जिंकले तर मनुष्य जिंकतो" सुख दु:खाचा अनुभव सगळ्यांनाच येतो. दु:खाला घाबरून मनुष्याने आपल्या पौरुषाचा त्याग करू नये. कारण मन हरले की मनुष्य पराभूत होतो. आणि मन बलवान असेल तर मनुष्याला विजय मिळतो.


मन ही जगातील खूप मोठी शक्ती आहे. मनुष्य शारीरिकदृष्ट्या कितीही बलवान असो जर तो मानसिकदृष्ट्या दुर्बल असेल तर तो जीवनात प्रगती करू शकत नाही. मनुष्य एक समाजशील प्राणी व ईश्वराची सर्वश्रेष्ठ कृती आहे. समाजात राहून त्याला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. 


मन स्थिर असेल तरच तो या जबाबदाऱ्या पार पाडू शकतो. माणसाचे मन फार चंचल असते. मनावर संयम ठेवूनच व्यक्ती प्रत्येक कार्यात यश मिळविते. मोठमोठ्या संकटांना तोंड देते. मनाची हार म्हणजे मरण, मनाचा विजय म्हणजे जीवन.


शास्त्रकारांनी मनाला इंद्रियांना स्वामी मानले आहे. गीतेत मनाला चंचल मानले आहे. वेद म्हणतात मनुष्याचे मन सर्वात जास्त बलवान आहे. त्यांची शक्ती अपरिमित आहे. म्हणून ते दिव्य आहे. मनुष्य झोपलेला असताना त्याचे मन जागृत असते आणि सुप्त मनाकडे निर्देश करते म्हणून स्वप्ने पडतात. 


सारांश ज्याचे मन कधीही हार मानत नाही तो खरा मनुष्य. जर प्रत्येक व्यक्तीच्या मनात कल्याणाची भावना आली तर संपूर्ण जगाचेच चित्र पालटेल. सज्जन माणसे जितकी कर्मे सामान्य लोकांना आपल्याबरोबर घेऊन करतात ती सर्व मनाच्या मदतीनेच करतात.


मनाची एकाग्रता असल्याशिवाय अपेक्षित सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. सर्व प्राण्यांमध्ये असलेली ही महाशक्ती उच्च स्थानी आहे. सर्व इंद्रियांच्या आधी मन असते. आपण असे पण म्हणू शकतो की एखाद्या इंद्रियांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म क्रिया संचालनासाठी जागृत वा सुप्त मनाकडून संकेत मिळणे अनिवार्य आहे. त्याशिवाय साधी डोळ्यांची उघडझापसुद्धा होऊ शकत नाही.


गूढ तत्त्वाच्या रूपात मन मनुष्याच्या सर्वोच्च शक्तींवर नियंत्रण ठेवते आणि त्या आपल्या ताव्यात ठेवते. मनावर संपूर्ण नियंत्रण असणारी व्यक्तीच प्रखर रूप प्राप्त करू शकते. मनच सर्व प्राण्यामंधील शक्तींना प्रकाशित करणारी ज्योती आहे. 


मनापासून इच्छा नसेल तर सावध पुरुषही काही कार्य करू शकत नाही. काहीही करण्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक असते.मनातून हार न स्वीकारणारा मनुष्य महापुरुषांच्या श्रेणीत जाऊन उभा राहतो. जर महाभारत युद्धात अर्जुन मनाने पराजित झाला असता तर इतिहास वेगळा झाला असता. 


दुसरीकडे पितामह भीष्माने मृत्युशय्येवर आपल्या शक्तीने मृत्यूला रोखून मनाने जिंकले होते व जिवंत होते. आपण मनात सदैव उच्च भावना बाळगाव्यात. मनात निराशावादी विचार कधीही येऊ देऊ नयेत. आशावादी माणसाला कर्म करताना अलभ्य वस्तूचाही लाभ होऊ शकतो. जगात त्याला प्रसिद्धी मिळू शकते. 


सर्व विद्या मनावर आधारित आहेत. ज्याप्रमाणे चाकाच्या अक्षाला सगळे आरे जोडलेले असतात त्याप्रमाणे मन जोपर्यंत एकाग्र होणार नाही तोपर्यंत मनुष्य कोणतीही विद्या ग्रहण करू शकत नाही म्हणूनच असे म्हणतात की प्राण्याचे सर्व ज्ञान, विज्ञान, चिंतन मनामध्येच विणलेले असते. जसे वस्त्राचे धागे विणलेले असतात.


"हे! मानवा निराश होऊ नकोस काही चांगले कर्म कर जगात काही नाव कर कोणत्याही धनाला अलभ्य समजू नकोस असशील आशावादी तू तर समज सारे तुझेच आहे" जर तुम्ही स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ करू इच्छिता तर मनोबल वाढवा, आशा कोमेजू देऊ नका, हिंमत हारू नका. 


हाच दृढ संकल्प पराजितांचे परिवर्तन विजयात करेल. मन एक असा कुशल सारथी आहे ज्याच्या ताब्यात मनुष्यरूपी घोड़ा नेहमी राहतो. ज्याप्रमाणे घोडेस्वार लगामाच्या साह्याने आपल्या इच्छेप्रमाणे पाहिजे तिकडे जाऊ शकतो.


त्याप्रमाणे मन आपल्याकडून कार्ये करवून घेते. मन फार प्रबळ असते बाहेरून ते कधीही प्रभाव टाकत नाही आपल्या अंतर्मनाचाच आपल्यावर प्रभाव पडत असतो. शरीर जरी रोगग्रस्त झाले तरी मन रोगग्रस्त होत नाही. मनाचा वेग तर प्रसिद्ध आहे.


मनाच्या हरण्याचे कारण मनाची अस्थिरता हे आहे. एकाग्रता हे मनाच्या जिंकण्याचे कारण आहे. महाभारतात अर्जुनाने द्रौपदी स्वयंवरात जो मत्स्यभेद केला तो मनाच्या एकाग्रतेच्या जोरावरच. सावित्रीने आपल्या मनोबलावरच सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळविले. 


मनाचे परिवर्तन झाल्यामुळेच डाकू रत्नाकर ऋषी झाला. मूर्ख कालिदास महाकवि कालिदास झाला. मन जिंकल्यामुळेच हे सर्व जण जिंकले. मनाला सदैव आशा असली पाहिजे, 'किंग ब्रूस अँड स्पायडर'ची गोष्ट वाचून आपणास कळते की कोळी स्वत च स्वत:चे जाळे विणतो. 


हे जाळे विणताना तो अनेकदा अपयशी पण होतो पण शेवटी त्याला यश मिळते. हीच घटना किंग ब्रूससाठी प्रेरणा बनली. ती अशी की मनाने कधीही हार स्वीकारू नये. जीवनात यश-अपयश नेहमीच येते. मनुष्य यश मिळाले की आनंदी होतो. 


अपयशाने दु:खी होतो. परंतु अपयश जरी झाले तरी मनावरील संयम सुटू देऊ नये. अपयशात गुंतून पडू नये. धैर्याने आणि उत्साहाने मनाला पुन्हा कार्यात गुंतविले पाहिजे व अपयशाला यशात परिवर्तीत केले पाहिजे. हेच मोठेपणाचे लक्षण आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद