माझी महत्त्वाकांक्षा मराठी निबंध | Mazi mahatwakansksha Essay marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी महत्त्वाकांक्षा मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. प्रत्येक व्यक्तीची काही तरी महत्त्वाकांक्षा असते. त्याशिवाय जीवन नीरस, निरर्थक होते. आकांक्षा व्यक्तीला एक ध्येय देते. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग ठरवते.
मार्गात येणाऱ्या अडचणींचा सामना कोणत्या साधनाने कसा करावयाचा ती साधने प्राप्त कशी करावयाची ते ठरवते. उद्दिष्ट निश्चित झाल्यावर ते प्राप्त करणे त्यासाठी आवश्यक गोष्टी जमा करणे सोपे होते. उद्देश नसेल तर काहीच शक्य नाही. उद्दिष्टाशिवाय प्रवास कसा? म्हणून जीवनात महत्त्वाकांक्षा असणे अत्यंत आवश्यक आहे.
यशाची ही एक आवश्यक किल्ली आहे. सर्व थोर आणि यशस्वी व्यक्ती महत्त्वाकांक्षी होत्या. त्यांच्या महत्त्वाकांक्षांनी त्यांना थोर करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. महत्त्वाकांक्षा ही यशाची आणि महानतेची पहिली पायरी आहे.
मनुष्य स्वभावत:च महत्त्वाकांक्षी असतो. माणसाचा हाच गुण त्याला इतर प्राण्यांपासून वेगळे करून उच्च स्थानी नेतो. मनुष्य स्वप्ने पाहतो आणि ती जीवनात साकार करतो. आपली प्रगती, समृद्धी आणि सांस्कृतिक विकासाचा हाच मूलमंत्र आहे. महत्त्वाकांक्षा नसेल तर जीवन नीरस, भकास आणि उपेक्षणीय होईल.
आकांक्षा आणि अभिलाषाच जीवनात नवे रंग भरून त्याला प्रेरणादायक आणि महत्त्वपूर्ण बनविते, जीवनात ऊर्जा, स्फूर्ती, कल्पना, सार्थकता, सहकार्य, स्वावलंबन इत्यादी गुणांचा आधार हीच महत्त्वाकांक्षा आहे. निरनिराळ्या लोकांच्या निरनिराळ्या आवडी, इच्छा, आकांक्षा आणि ध्येये असतात. कुणाला डॉक्टर, कुणाला इंजिनियर, तर कुणाला संगणकतज्ज्ञ
व्हावेसे वाटते. कुणाला सैन्यात नाव मिळवायचे असते. कुणाला लेखनात प्रसिद्ध व्हावयाचे असते. जीवन जितके विशाल, विविध आहे तितक्याच महत्त्वाकांक्षा विशाल, विविध आहेत. परंतु कोणतीही महत्त्वाकांक्षा व्यवहार्य असली पाहिजे. हवेत मनोरे बांधण्यात काही अर्थ नाही.
चंद्रावर घर बांधण्याची महत्त्वाकांक्षा व्यवहार्य असू शकत नाही. कारण ही गोष्ट कधीच शक्य होणार नाही. जीवनात काहीही अशक्य नाही पण ध्येयसिद्धीस आवश्यक साधने मिळाली तरच. त्याअभावी निराशा आणि अपयश पदरी येते. कल्पना करीत राहणे आणि स्वप्ने पाहणे ठीक आहे. पण त्याबरोबरच व्यावहारिक असणे जरुर आहे.
संतुलित जीवनाचा हा सुवर्ण सिद्धांत होय. । माझी महत्त्वाकांक्षा माझा स्वभाव, माझ्याकडे उपलब्ध असणारी साधने आर्थिक स्थिती, योग्यता याला अनुरूपच आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा असून मला माझ्या मर्यादांचे, शक्तीचे ज्ञान आहे. माझी महत्त्वाकांक्षा असाधारण नाही.
मला डॉक्टर, इंजिनियर किंवा वकील बनायचे नाही. मी एक प्रामाणिक यशस्वी व योग्य शिक्षक बनू इच्छितो जो खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माता असतो. अध्यापन माझ्या स्वभावातच नव्हे तर रक्तातही आहे. माझे स्वर्गवासी वडील एक खूप चांगली व्यक्ती आणि यशस्वी शिक्षक होते.
त्यांचे अनेक विद्यार्थी/विद्यार्थिनी प्रतिष्ठित आणि चांगल्या उच्च पदांवर कार्यरत आहेत. ते सर्व जण मोठ्या श्रद्धेने व आदराने त्यांची आठवण काढतात. लेखन-वाचनाची मला खूप आवड आहे. वाचनाचा मला छंद आहे. पाठ्य पुस्तकांव्यतिरिक्त मला इतर विषयांचेही चांगले ज्ञान आहे.
माझे व्यक्तिगत छोटे ग्रंथ संग्रहालय आहे. त्यात थोर नेत्यांची चरित्रे, जीवन वृत्तांत, प्रवास वर्णने, आठवणी, सामान्य ज्ञान, विज्ञान, इतिहास, भूगोल इत्यादी विषयांवरील पुस्तके आहेत. मी माझ्या शाळेच्या मासिकाचाही बरीच वर्षे संपादक होतो. दरवर्षी माझा एखादा लेख एखादी कविता-कथा त्यात प्रकाशित होत असते.
पुढच्या वर्षी मी कॉलेजात जाईन. पदवीधर झाल्यावर बी. एड. होईन. त्यानंतर मी शिक्षक होईन. चांगल्या कुशल, यशस्वी शिक्षकांची या देशात टंचाई आहे. अध्यापन हे विशिष्ट प्रकारचे काम व व्यवसाय आहे. ज्याच्यासाठी एका विशिष्ट मानसिक दृष्टिकोन, शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असते.
माझ्याजवळ या सर्व गोष्टी आहेत. शिक्षक अभ्यासू, मेहनती, सहिष्णु, सेवाभावी, सरळ स्वभावाचा असणे आवश्यक आहे. त्याने पैशाच्या मागे धावू नये. आपल्या कर्तव्याप्रती सदैव जागरुक राहिले पाहिजे. लोभी, अतिमहत्त्वाकांक्षी व्यक्ती कधी चांगला शिक्षक बनू शकत नाही.
शिक्षकाच्या ठिकाणी असलेल्या गुणांमुळे त्याला राष्ट्रनिर्माता म्हणतात. त्याचे एकमेव उद्दिष्ट आपल्या शिष्याचे भविष्य सुधारणे, त्याला यशस्वी नागरिक बनविणे व आर्थिकदृष्ट्या आपल्या पायावर उभे करणे हे असते.
मी या विषयावर बऱ्याचदा गांभीर्याने विचार केला आहे व प्रत्येक वेळी या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो की माझ्यासाठी हाच व्यवसाय योग्य व श्रेष्ठ आहे. भारत आदर्श गुरूंचा देश आहे. त्यांनी आपणास अनेक विभूती दिल्या. ते माझी प्रेरणा आहेत. मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून देशाची मनापासून सेवा करू इच्छितो. हा मार्ग सोपा नाही. अनेक अडचणी आहेत.
परंतु मी दृढनिश्चयी आहे आणि मला आशा आहे विश्वास आहे की माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल आणि मी कसोटीवर उतरेन. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद