राष्ट्र निर्मितीत साहित्याचे योगदान मराठी निबंध | RASHTRA NIRMITIT SAHITYACHE YOGDAN MARATHI NIBANDH
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण राष्ट्र निर्मितीत साहित्याचे योगदान मराठी निबंध बघणार आहोत. "जिथे सूर्य नसेल तिथे अंध:कार असेल ज्या देशात साहित्य नसेल तो देश मृत असेल" जेथे सूर्य नसतो तिथे निश्चितपणे अंधार असतो. ज्या देशात साहित्य नसेल तो देश मृत असतो. यावरून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की, साहित्य नसले म्हणजे देश
मृत कसा? साहित्य आणि राष्ट्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याप्रमाणे शरीरातून प्राण निघून गेल्यावर ते मृत होते त्याचप्रमाणे साहित्य नसेल तर राष्ट्र मृत होते. साहित्यच व्यक्तीमध्ये नवजीवनाचा संचार करून राष्ट्राला प्रगतिशील आणि विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन उभे करते.
प्राचीन काळात देवऋण, पितृऋण आणि ऋषी-ऋणाची कल्पना केली गेली होती. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात ही तीन ऋणे फेडावी लागतात. देवऋण व पितृऋण तर फेडले जाते पण ऋषीऋण फेडण्याबाबत उदासीनता असते.
लेखक साहित्यनिर्मिती करून ऋषीऋण फेडतो. राष्ट्रनिर्मितीमधे साहित्याचे योगदान नाकारता येत नाही. प्राचीन काळापासून आजतागायत साहित्य एक महत्त्वाची भूमिका पार पाडीत आले आहे. काळानुसार मानवात जे बौद्धिक परिवर्तन झाले तेच आपणास साहित्यात दिसून येते. पण इतिहासात दिसून येत नाही.
समाजात जे परिवर्तन साहित्य करू शकते ते कोणतेही शास्त्र करू शकत नाही. अशी अनेक उदाहरणे. आपणास इतिहासात मिळतात. साहित्याने फ्रान्समध्ये लोकशाहीची स्थापना केली. पोपचे वर्चस्व कमी केले. धार्मिक रुढी नष्ट करून जातीय स्वातंत्र्याचा श्रीगणेशा केला.
पारतंत्र्यात असणाऱ्या भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची इच्छा निर्माण केली. साहित्य व्यक्तीमध्ये विवेकच जागृत करते, तसेच राष्ट्रनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते. खरा लेखक ही राष्ट्रातील सर्वात जागरुक व्यक्ती असते. जी गोष्ट सामान्य माणूस पाहू शकत नाही ती लेखकाला दिसते व आपल्या साहित्याद्वारे तो ती सामान्यापर्यंत पाहोचवितो.
त्यांना अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. प्राचीन काळापासून लेखकांनी आपले कर्तव्य चांगल्याप्रकारे बजावले आहे. उदा० तुलसीदासाने 'रामचरितमानस' लिहून त्यात भारताच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक अशा सर्व पैलूंना प्रकाशित केले आहे.
आज हे हिंदूंचे एक लोकप्रिय धार्मिक पुस्तक आहे. भारतीय संस्कृती आणि देशातील तरुण पिढीला तुलसीदासाने एक प्रेरक मंत्र दिला. "पराधीन सपने हुं सुख नही." (पारतंत्र्यात सुख नाही) वाल्मीकीच्या रामायणाने आणि व्यासांच्या महाभारताने हेच कार्य केले.
ज्या ज्या वेळी येथील राजे भोग विलासात मग्न झाले, त्या त्या वेळी लेखकांनीच त्यांना योग्य मार्गावर आणले. व कर्तव्याची जाणीव करून दिली. समर्थ रामदासस्वामींनी मोंगलांविरुद्ध उभा महाराष्ट्र त्या काळात पेटविला. लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली.
लेखक आपल्या अवती-भोवती जे काही पाहतो त्याची जी प्रतिक्रिया त्याच्या मनात उमटते तिला आपल्या कल्पनेची जोड देऊन आपल्या साहित्यात तिला मूर्त रूप देतो. त्यात "सत्यं शिवम् सुंदरम" या तत्त्वांचा आधार घेतो शेवटी मानव कल्याण करणे हीच लेखकाची इच्छा असते.
लेखकाकडे राष्ट्राचे सौंदर्य पाहण्याची एक अलौकिक दृष्टी असते. त्यातून तो आनंदमय राष्ट्राच्या निर्मितीचे स्वप्न पाहतो. लेखकाने आपल्या साहित्यात चांगल्या वाईट दोन्ही बाजू व्यक्त केल्या पाहिजेत. निवडीची जबाबदारी त्याने वाचकांवर सोपविली पाहिजे.
राष्ट्रातील सामाजिक, विषमता, द्वेष, घृणा, ईर्ष्या, वैमनस्य, वाईट रुढी साहित्य दूर करते. ___लेखक नाटक, कविता, निबंध, कादंबरी, एकांकिका, लघुकथा इत्यादी वाङमय प्रकारांत लेखन करून सामाजिक क्रांतीच्या दिशेने प्रगती करण्यास सांगतो.
तद्वतच आर्थिक संपन्नतेचा पोकळपणा, राजकारण्यांचा मुत्सद्दीपणा, गरिबीतील वाढ, वेठ बिगारी, हुंडा प्रथा इत्यादी बाबत सरकारचा उदासीनपणा दहशतवादाची भीती, तस्करी इत्यादी बाबत आपले विचार प्रकट करतो.
प्राचीन काळात उगम पावलेली ही साहित्यगंगा आजही वाहतच आहे. तिला वाहती ठेवण्याचे श्रेय अनेक लहान-मोठ्या लेखकांना आहे. जो लेखक काळाच्या मागणीनुसार लेखन करतो तो यशस्वी लेखक बनतो. शासन ही लेखकांच्या ऋणांची फेड विविध पुरस्कार देऊन करते. त्यात धनाचीही प्राप्ती त्यांना होते.
प्रभावी लेखक जनजागृती करण्यात नेहमीच यशस्वी होतो. समाजही अशाच लेखकांच्या मागे धावतो. आपले अज्ञान लेखकच दूर करतात. आणीबाणीच्या काळात गोठविण्यात आलेल्या विचार लेखन व मत स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांच्या विरोधात पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत, नरहर कुरुंदकर या सारख्या मोठया लेखकांनी आवाज उठविला होता. वर्तमान युगात राष्ट्रनिर्मितीमध्ये साहित्याचा सिंहाचा वाटा आहे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद