साहित्य एक सजावटीची वस्तू मराठी निबंध | SAHITYA AK SAJAVTICHI VASTU ESSAY MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण साहित्य एक सजावटीची वस्तू मराठी निबंध बघणार आहोत. साहित्यात तत्कालीन काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक इत्यादी विभिन्न मान्यता आणि प्रश्नांचे, जीवनातील परिस्थितीचे, आजूबाजूच्या वातावरणाचे प्रतिबिंब पडलेले असते म्हणून विचारवंत त्याला समाजाचा आरसा, मार्गदर्शक म्हणतात.
साहित्य जसे समाजाचे वास्तव रूप, प्रकट करते तसेच लोकांना मार्गदर्शन करून प्रगतीच्या दिशेने घेऊन जाते. कोणत्याही प्रतिष्ठित समाजाची साहित्य ही एक अशी ठेव आहे की जी पिढ्यान्पिढ्या वाढत जाते कमी होत नाही. साहित्याला अधिक विकसित करण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकाने व सरकारने मदत केली पाहिजे.
प्रत्येक युगात साहित्य एक महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. मानवाला अज्ञानाच्या अंध:कारातून काढून ज्ञानाच्या प्रकाशात आणते. जीवनातील मार्मिकतेचे वास्तव वर्णन करते. देशात धार्मिक सहिष्णुता आणते. चांगल्या साहित्यामुळे व्यक्तीचा बौद्धिक विकास होतो.
साहित्य सरितेत स्नान केल्यामुळे वाचकांना आनंद होतो. साहित्यात जर जीवनातील वास्तव नसेल आणि ते कल्पनेच्या आकाशात स्वैर विहार करीत असेल तर जास्त वेळ उडू शकत नाही. जीवन चित्रण करण्यामुळेच साहित्याची प्रगती होते. राष्ट्र निर्मितीत साहित्य एक महत्त्वाची भूमिका बजावते ही गोष्ट नाकारता येत नाही..
प्राचीन काळात सामान्य माणसाजवळसुद्धा बरीच पुस्तके असत. त्याचे तो मनन, चिंतन करीत असे. वादविवादात त्याचे पांडित्य दिसून येई. साहित्याची आवड असणाऱ्या प्रत्येक बुद्धिजीवी माणसाचे स्वत:चे ग्रंथालय असे. आपला जास्तीत जास्त वेळ तो अभ्यासात व्यतीत करीत असे.
आपल्या उत्पन्नाचा एक भाग श्रेष्ठ साहित्याची खरेदी करण्यात खर्च करीत असे. परंतु आता आधुनिक काळात परिस्थिती बदलली आहे. आजचा मानव ईहवादी झाला आहे. भोगी झाला आहे. भोगवादाला महत्त्व दिल्यामुळे त्या वातावरणात राहिल्यामुळे त्याच्या मानसिकतेतही बदल झाला आहे.
साहित्याबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. आज साहित्य अध्ययन, मनन, चिंतनाचे साधन नसून दिवाणखान्यातील, सजावटीची वस्तू बनत चालले आहे. आज लोक सर्वोत्कृष्ट, श्रेष्ठ पुस्तके विकत तर घेतात परंतु ती न वाचता कपाटात सजवून ठेवतात.
ज्यामुळे इतरांना असे वाटावे की ते साहित्यावर फार प्रेम करतात. अशा प्रकारे आज श्रेष्ठ पुस्तके आणि मासिके प्रतिष्ठेचे प्रतिक बनत चालले आहे. समाजात साहित्याबद्दल एक प्रकारची उदासीनता येत आहे. वाचनाचा आनंद गौण झाला आहे.
ही परिस्थिती अचानक निर्माण झालेली नाही. हे खरे की भौतिक सुखे प्राप्त करण्याच्या स्पर्धेत मनुष्याचे जीवन यंत्रवत झाले. त्याच्याजवळ नेहमीच वेळेचा अभाव असतो. म्हणून तो साहित्याचे अध्ययन करून आपली मानसिक भूक भागवू शकत नाही. तरी पण ग्रंथप्रेमींची संख्या काही कमी नाही.
वाचकांची संख्या पुष्कळ आहे. पण श्रेष्ठ पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. शासनही साहित्याबद्दल उदासीन आहे. शासनाची नीती आणि वाढत्या महागाईने श्रेष्ठ साहित्याच्या किमतीही वाढल्या. त्यामुळे सामान्य माणूस ती पुस्तके विकत घेऊ शकत नाही.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज पुस्तक मुद्रणात उच्च तांत्रिक तंत्राचा उपयोग होऊ लागला आहे. नव्या तंत्राद्वारे आकर्षक पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. पुस्तके बहुसंख्येने निघत आहेत. शाई, कागद आणि मुद्रणात दरवाढ झाल्यामुळे पुस्तकांच्या किमती खूपच वाढल्या.
आज कथासंग्रह, काव्यसंग्रह, लघुकथा, चांगल्या कांदबऱ्या यांची किंमत फार वाढली असल्यामुळे सामान्य माणूस ते घेताना शंभरदा विचार करतो. मासिके पण महागच झाली आहेत. विशेषांकांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचे पुस्तकांवरून लक्ष उडू लागले असून तो मनोरंजनासाठी नवे मार्ग नित्य शोधत आहे.
आज मनोरंजनाचे सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय साधन आहे दूरदर्शन. कमी पैशात जास्त मनोरंजन होते. साहित्य वाचण्याऐवजी चित्रपट पाहणे श्रेयस्कर वाटते. त्यामुळे आर्थिक बचत होते. दूरदर्शनवर कार्यक्रमांची, चॅनल्सची संख्या खूप वाढल्यामुळे समाजाचा एक मोठा वर्ग त्याचा चाहता बनला आहे.
आज लोक नियमितपणे टी. व्ही. वर सिनेमे पाहतात. पण पुस्तके वाचत नाहीत. दरवर्षी बहुसंख्य पुस्तके प्रकाशित होतात. पण त्यांच्या प्रकाशनाबद्दलची माहिती लोकांना मिळतच नाही. म्हणून त्याला वाचकही मिळत नाही.
दुसरे असे की जी पुस्तके प्रसार माध्यमांच्या चर्चेत येतात. तीच पुस्तके बुद्धिजीवी लोक आपल्या खाजगी ग्रंथालयासाठी घेतात. उदा० सलमान रश्दीचे, 'द सॅटॉनिक व्हर्सेस, तस्लिमा नसरीनचे 'लज्जा' ही पुस्तके जगभर चर्चेचा विषय झाली आहेत. अशी पुस्तके न वाचता आपल्या कपाटात सजवून ठेवण्यात त्यांना धन्यता वाटते. त्यांच्या प्रतिष्ठेचे ते द्योतक असते.
साहित्य आणि वाचकांमधील अंतर वाढतच आहे याचे कारण श्रेष्ठ साहित्य विक्रीस ठेवणाऱ्या दुकानांचा अभाव. शहरात ही सोय पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तिथे उच्च दर्जाचे साहित्य नेहमीच मिळते. लहान गावात इच्छा असूनही वाचकांना चांगली पुस्तके मिळत नाहीत.
कनिष्ठ दर्जाची पुस्तके सर्वत्र मिळत असल्यामुळे सामान्य वाचक ती सहजपणे विकत घेऊ शकतात. असे साहित्य मन बुद्धी विकृत करते. जे लोक पुस्तके घेऊ शकत नाहीत ते वाचनालयात जाऊन आपली ज्ञानक्षुधा भागवितात. ग्रंथालयांची स्थितीही दयनीयच बनली आहे.
आर्थिक टंचाईमुळे महाग असलेली नवीन पुस्तके ती घेऊ शकत नाहीत. पुस्तकांची योग्य निगा न राखल्यामुळे ती लवकर खराब होतात. कित्येकदा विद्यार्थी त्यातील पाने फाडून घेतात. त्यामुळे ती वाचण्यायोग्य राहत नाहीत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारने आपल्या देशात पुस्तकांबाबत काहीच केलेले नाही.
सरकारनेच कमी किमतीत चांगली पुस्तके उपलब्ध करुन दिली पाहिजेत. साक्षरतेसाठी प्रत्येक स्तरातील वयोगटानुसार प्रत्येक वाचकाला पुस्तके सहज मिळतील अशी सोय केली पाहिजे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद