साहित्य आणि समाज मराठी निबंध | Sahitya Ani Samaj Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण साहित्य आणि समाज मराठी निबंध बघणार आहोत. शेलीच्या मते "जितका आपण अभ्यास करीत जातो, तितकी आपल्याला आपल्या अज्ञानाची जाणीव होते."अज्ञानाच्या अंध:कारातून काढून प्रकाशात आणणारा आपला एकमेव हितचिंतक आहे तो म्हणजे साहित्य.
म्हणूनच साहित्याला समाजाचा आरसा आणि दिवा म्हटले जाते. विद्वानांनी "साहित्य म्हणजे हित करणारे"असा साहित्याचा अर्थ लावला आहे. साहित्यनिर्मिती करणाऱ्याला साहित्य वाचणाऱ्या जिज्ञासूंच्या हिताची इच्छा असते. साहित्यात भाव असतो. ज्यावेळी प्राचीन साहित्याचे नव-साहित्याशी मीलन होते तेव्हा वर्तमान साहित्य भविष्याकडे बोट दाखविते.
सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रगतीबरोबरच साहित्याची रचना आणि त्याच्या अध्ययन, अध्यापनाबद्दल वाचकांची जिज्ञासा वाढत गेली. श्रेष्ठ साहित्य मानवाच्या कल्याणाच्या भावनेने ओतप्रोत भरलेले असते. नाटक, काव्य, कथा, कादंबरी, एकांकिका ही साहित्याची विविध रूपे होत.
वास्तविक साहित्य समाजाकडून आणि समाज साहित्याकडून निरंतर प्रेरणा घेत असते. समाजातून प्राप्त होणाऱ्या अनुभवाला साहित्यात मुख्य स्थान असते. लेखक त्याला आलेल्या अनुभवांवर चिंतन करून ते साहित्यात लिपीबद्ध करतो. त्याला मानवासाठी कल्याणकारी रूप देतो.
साहित्य रुढी, परंपरा बदलू शकते, तितकी क्षमता त्याच्यात असते. तसेच नवराष्ट्र सृजनालाही हातभार लावते. मानव हा पृथ्वीवरील विवेकी आणि विचारी प्राणी आहे. तो ज्या समाजात राहतो आपल्या आजू-बाजूस जे पाहतो, ज्या सामाजिक घडामोडी पाहतो त्याचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याला चिंतनाच्या भट्टीत तापवून त्याची भावाभिव्यक्ती शब्दात करतो.
ही अभिव्यक्ती म्हणजेच साहित्य. अशाप्रकारे साहित्य आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत व त्या परस्परावलंबी आहेत. लेखक समाजात राहून जे काही ऐकतो, पाहतो ते त्याच्या मन, बुद्धीवर प्रभाव टाकते. समाजाच्या त्याच विविध रूपांचे चित्रण करणे हा लेखकाचा उद्देश असतो.
लेखक समाजाची उपेक्षा करून साहित्यनिर्मिती करू शकत नाही. कारण साहित्य हे समाजाचेच एक अंग आहे. साहित्य केवळ बुद्धीचा विलास नसून जीवनाची वास्तविकता अंशतः दर्शविणारी एक रीत आहे. साहित्य समाजाचे वास्तव चित्रण करते. असे न केल्यास अनेक विकृती उत्पन्न होतात आणि मानव सदैव वास्तविकापासून अनभिज्ञ राहतो.
समाजात घडणाऱ्या लहानमोठ्या सर्व घटनांचा प्रभाव साहित्यावर पडतो. आधुनिक काळात ना. सी. फडकेंसारख्या अनेक विद्वानांनी 'कलेसाठी कला' या सिद्धातांचे समर्थन केले आहे. त्यांच्या दृष्टीने साहित्य आणि समाजाचा काही संबंध नाही. त्यांच्या मते समाजापासून दूर राहूनही साहित्य आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकते. पण
ही धारणा चुकीची आहे. समाजाशी निकट संबंध ठेवूनच साहित्य विविध संस्कृतींचा अंतर्भाव आपल्यामध्ये करू शकते अन्यथा नाही. लेखक आपल्या काळाचे वास्तव चित्रण करून त्याचे प्रतिनिधित्व करतो. सामान्य लोकांपेक्षा लेखक जास्त विवेकी, संवेदनशील, विचारी, स-हृदय असतो.
इतकेच नव्हे तर त्यावेळच्या सर्व समजुती, मान्यता, वाईट रुढी, समस्या, भावना, उन्नती, अवनती, गुण-दोष इ. सर्व गोष्टींना आपल्या साहित्यात स्थान देतो. आपल्या भावनेनुसार त्याची रचना करतो. साहित्य हा समाजाचा आरसा आहे. साहित्याची निर्मिती एकट्याने होऊ शकत नाही. ते समाजाशी बांधलेले असते.
साहित्य आपल्या कल्पनेनुसार नवे राष्ट्र आणि नवा समाज निर्माण करू शकते. परंतु हे कार्य लगेच होत नाही. साहित्य आधी हळूहळू लोकांचे मानसिक परिवर्तन करते. तेच संस्कार हळूहळू परिपक्व होतात व समाजावर त्यांचा प्रभाव दिसतो. साहित्य समाजाकडून जसे काही घेते तसेच समाजाला काही देते.
ते लोकांना आणि राष्ट्राला पतनाच्या गर्तेत पडण्यापासून वाचविते. कलुषित मन, विचार, शुद्ध करते, पतनाच्या गर्तेतून काढून उन्नतीच्या शिखरावर बसविते. उत्कृष्ट साहित्य समाजाला अप्रत्यक्षपणे प्रभावित करते. हा प्रभाव हळूहळू कळतो.
समाजातील वाईट रुढी परंपरांना विरोध करून अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाते. मेरिस्टो या अमेरिकन लेखकाच्या 'अंकल टॉम्स् केबिन' या साहित्यकृतीने अमेरिकेत निग्रोंची एक चळवळच उभी केली. त्याची परिणती काळ्या-गोयऱ्यांमधील भेद समाप्त होण्यात झाली आणि निग्रोंना समान अधिकार मिळाले.
आता आधुनिक वैज्ञानिक युगात हे साहित्याचे प्रयोजन गौण झाले आहे. आनंदानुभूती हा काव्याचा मूळ उद्देश आहे. काव्य असे असले पाहिजे की ज्याच्या आस्वादानंतर वाचक आपली शुद्ध विसरले पाहिजेत.
जीवनातील वास्तवाला कथा, वा नाटकाच्या माध्यमाद्वारे असे रूप प्रदान करते की ते थेट वाचक, प्रेक्षकांच्या हृदयालाच जाऊन भिडते. इतिहास साक्ष आहे की साहित्याने आपल्या राष्ट्रीय चळवळीत एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिका पार पाडली होती.
पुढारी आणि स्वयंसेवी संस्था मिळून राष्ट्राला एका सूत्रात बांधू शकल्या नाहीत, पण साहित्याने ते कार्य करून दाखविले. 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' हे इकबालचे आणि वंदेमातरम् हे बंकिमचंद्र चटर्जीचे गीत सामान्य जनता गात होती.
साहित्य जीवनाच्या कोणत्याही क्षेत्राचे अस्पष्ट चित्रण वा उल्लेख करीत नाही. ते मानवी दुर्बलतेचे स्वाभाविक चित्रण जोपर्यंत त्यात गंभीर प्रेरणा वा शिकवण येणार नाही तोपर्यंत करीत राहते. साहित्यात वाचकांना गंभीर उद्देश सांगण्याची क्षमता आणि गुणदोषांनी युक्त चरित्रे दाखविण्याची संधी मिळते.
साहित्य समाजात प्रसन्नता आणि हर्ष उत्पन्न करते व जीवनाला दोषमुक्त करण्याचा प्रयत्न करते. मानवाच्या हितासाठी समाजातील विखुरलेल्या शक्तींना एकत्र आणते. लेखक आपल्या कल्पनेने कुरूपाला सुंदर रूप देतो. लेखक मानवाच्या हितासाठी कल्पना, चिंतने आणि अनुभवाचा सुंदर समन्वय करून वाचकांना काही ना काही चांगलेच देतो.
लेखक आपल्या कल्पनेच्या साह्याने जीवनाचे चित्रण करतो. असे दिसते की, कित्येकदा लेखक समाजातील कुप्रथांना विरोध करतो. परंतु कित्येकदा त्यांच्यासमोर पराजित झालेला पण दिसतो. साहित्य सांगते की, हुंडा देणे वा घेणे दोन्ही दंडास पात्र आहे. पण लेखकच आपल्या मुलीला हुंडा देताना दिसतात.
लेखक त्याच्यातल्या पित्यासमोर नतमस्तक होतो. आपल्या मुलीच्या सुखासाठी आपल्या तत्त्वांचा बळी देतो. असे आहे आणि असे झाले पाहिजे या मतांमध्ये गेली अनेक शतके द्वंद्व चालू आहे. जो लेखक या द्वंद्वाला आपल्या विद्वत्तेच्या साह्याने जितक्या चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो तो श्रेष्ठ लेखक ठरतो.
सामान्यपणे साहित्य समाजाची खालील तीन रूपे स्पष्ट करते. १) वास्तववादी चित्रण-समाजाची वास्तववादी दृष्टिकोणातून व्याख्या करणे. २) सामाजिक सुधारणांसाठी चित्रण-समाजातील वाईट गोष्टींचे नीतिनुसार निवारण करणे.
३) क्रांतीचे चित्रण-समाजातील गतानुगतिक रुढींना विरोध करून समाज रचनाच बदलून टाकण्याचा संदेश देणे. साहित्य केवळ मानवाचे कल्याण करू इच्छिते तसेच समाजही मानवी कल्याणासाठीच कटिबद्ध आहे.
साहित्याचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत केवळ मानवाचे कल्याण आणि सूखच राहिले आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामयाः। मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद