साहित्याचे महत्त्व मराठी निबंध | SAHITYACHE MAHATVA ESSAY MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण साहित्याचे महत्त्व मराठी निबंध बघणार आहोत. कोणत्याही राष्ट्राच्या उत्कृष्टतेचे मूल्यांकन त्याच्या साहित्यावरून होते. ज्या देशाचे साहित्य जितके उत्कृष्ट तितकी त्याची प्रगती होते. प्राचीन काळात साहित्यामध्ये जगात सर्वात जास्त प्रगती भारताने केली होती.
म्हणून जगद्गुरू या नावाने भारत विख्यात झाला. ज्यावेळी जग अज्ञानाच्या अंध:कारात बुडालेले होते त्यावेळी भारतात साहित्य सृजनाची परंपरा चालू होती व ती आजही चालू आहे. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ "ऋग्वेद" आणि सर्वात मोठा ग्रंथ "महाभारत" आहे. ही दोन्ही पुस्तके ऋषिमुनी व पं. व्यासमहर्षांनी रचली.
साहित्याचे महत्त्व यासाठी आहे की ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्षप्राप्तीची इच्छा करते. मानवाला मानसिक समाधान व आनंद देते. मोहमाया, सुख-दु:ख, आशा-निराशा, साहस-भय, उत्थान पतन यातून वर काढून मानवतेला नैतिक मूल्यांचा धडा शिकविते. इतकेच नव्हे तर मनुष्याला पशुत्वातून बाहेर काढून देवत्वाकडे नेते.
ज्याप्रमाणे भोजनामुळे आपली शारीरिक गरज भागते त्याचप्रमाणे चांगल्या साहित्यामुळे आपले मानसिक पोषण होते. आपण फक्त चांगल्या साहित्याचेच अध्ययन केले पाहिले. विकृत साहित्यामुळे आपली मानसिकता दूषित होते. आपली विचार करण्याची क्षमता नष्ट होते.
बौद्धिक विकास थांबतो, वाईट विचार मनात घर करतात. या सर्व कारणांमुळे राष्ट्राच्या प्रगतीत बाधा उत्पन्न होते. चांगले साहित्य मानवी मन-बुद्धीचे पोषण करून मानव आणि राष्ट्र दोन्हीच्या प्रगतीला उत्तेजन देते. वाईट साहित्य मानव आणि राष्ट्र दोन्हीला पतनाच्या गर्तेत ढकलते.
साहित्याच्या महत्त्वाबद्दल विचारवंतांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. साहित्य समाजाचे प्रतिबिंब असते तसेच समाजाचे ते मार्गदर्शक पण आहे. सिसरो या इंग्रजी लेखकाच्या मते साहित्याचे महत्त्व तेव्हाच स्पष्ट होते जेव्हा त्याच्या अभ्यासामुळे तरुणांचे मानसिक पालन पोषण होईल, वृद्धांचे मनोरंजन होईल, संकटात धैर्य मिळेल, घरात उत्साह येईल, बाहेर वागणुकीत विनम्रपणा येईल.
गटेच्या मते, "साहित्याचे पतन राष्ट्राच्या पतनाचे द्योतक आहे." महावीर प्रसाद द्विवेदींच्या मते "ज्ञानाच्या संचित कोषाचे नाव साहित्य." ज्या भाषेजवळ हा ज्ञानकोश नाही ती भाषा भावाभिव्यक्तीत समर्थ असूनही एखाद्या रूपवान भिकारणीप्रमाणे तिरस्कृत ठरते.
मुन्शी प्रेमचंद यांच्या मते, "साहित्य ते ज्यात जीवनाचे सौंदर्य असते, सृजनाचा आत्मा असतो, जे आपल्यात गती, संघर्ष आणि अस्वस्थता निर्माण करते, आपल्याला झोपविण्याचा प्रयत्न करीत नाही." साहित्य हे हृदयाची भाषा बोलणारे भावनाप्रधान लिखित वाङमय आहे. रूक्ष बुद्धीची भाषा नव्हे. हे विचारात घेऊन भर्तृहरीने हजारो वर्षांपूर्वी म्हटले होते.
साहित्य - संगीत कलाविहिनः
साक्षात पशुः पुच्छ विषाणहीनः
अर्थात साहित्य, संगीत आणि कलाविहीन असेल तर शेपटी व शिंगे नसलेल्या पशुप्रमाणे वाटेल. यावर गटेने असे भाष्य केले की." "He who has no ear for poetry is a barbarian." सारांश साहित्यात जीवनातील सत्यम शिवम् सुंदरम्चे महत्त्वाचे स्थान आहे. जर साहित्यातून 'शिवम्' वेगळे काढले तर ते साहित्यच राहणार नाही.
धार्मिक कट्टरपणाला साहित्य विरोध करते व धार्मिक सहिष्णुता उत्पन्न करते. आपणास एखाद्या धर्माची घृणा येऊ शकते, एखाद्या धार्मिक ग्रंथाबद्दल अनास्था दाखवू शकतो परंतु साहित्य कृतीची घृणा करू शकत नाही. कालिदासाच्या 'शाकुंतल' नाटकाची देशी-विदेशी वाचकांनी, समीक्षकांनी प्रशंसा केली.
इतकेच नव्हे तर त्याच्या नावे लेखकांना कालिदास पुरस्कारही दिला जातो. जर आपले साहित्य राष्ट्र जाती आणि धर्माच्या आधारावर विभागलेले असते तर गटे, कालिदास, शेक्सपियर, मिल्टन, आदीनां जागतिक प्रसिद्धी मिळाली नसती. फक्त साहित्यच विश्वाला मानवतेचे धडे शिकविते.
जीवनात साहित्याचे महत्त्व यासाठी ही आहे की त्यावरून आपणास तत्कालीन परिस्थितीचे ज्ञान होते. इतिहास कळतो. प्राचीन काळातील लोकांचे आचार विचार समजतात. त्यांच्या चुका कळतात. त्यावरून आपण धडा घेतो व पुन्हा त्या चुका करीत नाही.
साहित्य जीवनाचे वास्तव दाखविते. त्यात सामान्य लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची अद्भुत क्षमता असते. अनेक जातींचा इतिहास आणि ज्ञान ते आपल्यात सामावून घेते. काळानुसार लोकांचे विचार परिवर्तन करते. राजकीय, धार्मिक, आर्थिक सामाजिक परिवर्तनात साहित्याचा विशेष सहभाग राहिला आहे.
आनंद मिळविणे, निसर्गाच्या सौंदयाकडे आकृष्ट होणे, प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याची प्रेरणा देणे हे काम साहित्याचेच आहे. साहित्य नैतिक मूल्यांची अवनती थांबविते, मनुष्याचे चारित्र्य विकसित करते, मनाला शांती देते, अडचणींवर विजय मिळविण्यास शिकविते.
वाईट चालीरीतींविरुद्ध आवाज उठविते तसेच पर्यावरण, प्रदूषण, वृक्षारोपण याबाबत जनजागृती करते, जे लोक पथभ्रष्ट झाले असतील त्यांना मार्ग दाखविते. पारतंत्र्याबद्दल सजग करते त्याचबरोबर आपणास कर्त्तव्यांची जाणीवही करून देते. पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याची क्षमता फक्त साहित्यातच आहे.
मुन्शी प्रेमचंदांच्या मते, "साहित्य हाच जीवनाचा खरा इतिहास आहे. ही एक अशी ठेव आहे की जी सदैव प्रेरणा देत राहते आणि जीवनाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाते." मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद