संतांचे कार्य निबंध मराठी.| Santanche kary Marathi nibandh.
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संतांचे कार्य मराठी निबंध बघणार आहोत. जगाच्या कल्याणा। संतांच्या विभूती। देह कष्टविती। उपकारे ॥ या ओळींतून आपल्याला संतांचे कार्य काय आहे, हे नेटकेपणाने मांडलेले आढळते. संत हे जगाच्या कल्याणासाठीच स्वतःचा देह झिजवीत असतात.
महाराष्ट्रात संतांची परंपरा फार मोठी आहे. परकी आक्रमणाने, मुसलमानांच्या जुलमाने सारी प्रजा त्रस्त झालेली असताना संतांनी आपल्या अभंगांनी या माणसांच्या मनातील मरंगळ दूर करण्याचा विडा उचलला. त्या काळात चातुर्वर्ण्य व्यवस्था फार कडक होती.
धार्मिक कर्मकांडांना महत्त्व प्राप्त झालेले होते. अशा वेळी ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्गाचा पाया घातला. देवाला पूजेचे अवडंबर नको आहे. केवळ तुम्ही नामस्मरण करा, भक्तिभावाने त्याला पूजा, तो देव तुम्हाला प्रसन्न होईल, अशी ज्ञानेश्वरांनी शिकवण दिली. गीतेचे तत्त्वज्ञान सामान्य माणसासाठी मराठीतून आपल्या 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथात सांगितले. अनेक रसाळ अभंग लिहिले.
यानंतर संतांची परंपराच चालू झाली. नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास हे त्यातील प्रमुख होत. या संतांनी संसार सोडून संन्यास घ्यायला सांगितले का? तर, नाही. 'आधी प्रपंच करावा नेटका। मग परमार्थ विवेका ॥
तेव्हा आपली कर्तव्यकर्मे करीत असतानाच केवळ पांडुरंगाचे नामस्मरण करा. त्याने देव तुमच्यावर प्रसन्न होईल. त्यामुळे जनाबाई म्हणते - 'दळिता कांडिता तुज गाईन अनंता।' सावता माळी म्हणतो - 'कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी'...
ज्ञानेश्वरांनी जन्मभर समाजाकडून उपेक्षा व त्रास सहन केला. परंतु त्यांनी सर्व भूतमात्रावर तसेच समाजावरही प्रेम केले. 'जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात' असेच पसायदान ईश्वराजवळ मागितले. एकदा फक्त ते चिडून झोपडीचे दार लावून बसले होते. तेव्हा मुक्ताबाईने ताटीचे अभंग म्हटले. यातील उपदेशही संतांचे मोठेपण सिद्ध करणारा आहे. मुक्ताबाई म्हणते
"विश्वरागे झाले वन्हि, संते सुखे व्हावे पाणी' तेव्हा जग कितीही वाईट वागले तरी संतांनी न रागावता आपले जीवितकार्य पुढे चालूच ठेवावे. साऱ्याच संतांनी ईश्वरभक्तीची शिकवण दिली; समाजात कसे वागावे याबद्दल विवेचन केले.
'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा', 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे', 'दया तिचे नाव, भूताचे पालन, आणि निर्दालन कंटकांचे' अशा त-हेचा उपदेश आपल्या समाजाला संतांनी केला आणि माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनविण्याचा प्रयत्न केला.
संतांचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी जाती जमातीतील भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 'भेदाभेद भ्रम अमंगळ' असे सांगून, देवाच्या पायाशी सर्व जातीची माणसे सारखीच आहेत, सर्वांनी बंधुभावाने राहावे, सर्वांनी दु:खी माणसाला मदत करावी, अनाथ अपंगांच्या कल्याणासाठी झटावे अशी शिकवण संतांनी दिली.
त्यामुळे त्यांनी प्रचलित केलेल्या भागवत धर्मात तुकाराम वाणी, नामदेव शिंपी, चोखा महार, गोरा कुंभार, सेना न्हावी, दासी जनी, सावता माळी अशा साऱ्या जातीचे लोक होते. या साऱ्यांच्यात एकता समानता आणली, हे संतांचे लाखमोलाचे कार्य आहे.
स्त्रियांनाही संतपरंपरेत स्थान आहे हे या भागवत धर्माचे, संतांच्या शिकवणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. संतांचे स्वत:चे आचरणही सात्विकतेने भरलेले होते. असे तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणेच त्यांची वागणूक होती. संता कशाचीही आसक्ती बाळगीत नाहीत, कोणावरही रागलोभ धरीत नाहीत.
'संत जेणे व्हावे, तेणे जग बोलणे सोसावे' हे त्यांच्या आचरणातून आपल्याला दिसून येते. संतांचा महिमा सांगताना एकनाथ म्हणतात - 'संत नाम गाय कामधेनू'. कामधेनूप्रमाणे संत भक्तांच्या इच्छा पुरवतात. त्याला ईश्वराजवळ जाण्यास मदत करतात. 'तुका म्हणे सुख। पराविण सुखे ॥'
संतांना नेहमी दुसऱ्याच्या सुखात आपल्याला सुख लाभले असे वाटते. सर्व समाज सुखी व्हावा, त्यातले 'हीन' नष्ट व्हावे यासाठी संत आयुष्यभर झटले. तेव्हा अशा त-हेने संतांचे कार्य ऐतिहासिक आहे, सामाजिक आहे. त्यांच्या काळात समाजोन्नतीसाठी त्यांनी कार्य केले. पण आजही त्यांचे विचार व शिकवण तितकीच महत्त्वाची आहे.
त्यांचे अभंग त्रिकालाबाधित सत्ये सांगत असतात. तेव्हा त्यांची महती जाणून 'दया, क्षमा, शांती। तेथे देवाची वसती ॥' हे तत्त्व अंगी बाणवून घेतले पाहिजे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद