सत्संगती मराठी निबंध | Satsangati Essay in Hindi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सत्संगती मराठी निबंध बघणार आहोत. दुष्ट व्यक्ती ही सत्संगती प्राप्त झाल्यास सुधारतात. ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंड सुवर्ण बनते. मनुष्य ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ रचना आहे. मनुष्याला या सृष्टीतील सर्वोत्कृष्ट प्राणी मानले जाते. मानवसदृश गुण असलेले पशुपक्षीही निसर्गात आहेत परंतु मानव श्रेष्ठतम् आहे. कारण मानवामध्ये विचार करण्याची, समजून घेण्याची शक्ती असून तो स्वत:ला परिस्थितीशी जुळवून घेतो.
तो ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणाच्या गुणांचा उद्भव त्याच्यामध्ये होतो. सत्संगतीमुळे माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याची उत्तरोत्तर प्रगती होते. ज्या प्रमाणे फुलात असलेल्या कीटकालाही ईश्वराच्या डोक्यावर स्थान मिळते.
फुलांच्या सुगंधामुळे मातीही सुगंधित होते परंतु मातीच्या वासाचा फुलांवर काहीही परिणाम होत नाही. अशा प्रकारे साधूसज्जनांच्या संपर्कात आल्यामुळे दुष्टांमध्येही चांगले गुण येतात. परंतु दुष्टांच्या दुष्टपणाचा सज्जन माणसावर काही परिणाम होत नाही.
सत्संगती मानवासाठी एक उत्तम वरदान आहे. नीतिशतकात भर्तृहरीने सत्संगतीचा महिमा सांगताना म्हटले आहे, जाडयं धियो हरति सिच्चाति वाचि सत्य मानोन्नति दिशति पापमापकरोति। चेतः प्रसादयति दिक्ष तनोति कीर्ति
सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम॥ अर्थात् सत्संगती बुद्धीची जडता दूर करते. वाणीमध्ये सत्याचा आविष्कार होतो, मान वाढतो, पापे नष्ट होतात, चित्त प्रसन्न होते व सर्व गोष्टीत यश मिळते. सांगा! सत्संगती मनुष्यासाठी काय करीत नाही.
सत्संगती माणसासाठी सर्व काही करते. नारदमुनींच्या सहवासात आल्यामुळे वाल्याचा महर्षि वाल्मीकी बनला. गौतम बुद्धाच्या सहवासात आम्रपालीचा उद्धार झाला. मूर्ख कालिदास गुरूचे सान्निध्य प्राप्त झाल्यामुळे संस्कृत साहित्यातील एक उज्ज्वल नक्षत्र बनले. अशा प्रकारे सत्संगतीमुळे मानवाची जीवनशैलीच बदलून जाते.
सज्जन आणि दुर्जनाला ओळखणे फार कठीण आहे. मोठमोठ्या अनुभवी आणि बुद्धिमान व्यक्तीही सज्जन आणि दुर्जनाला ओळखण्यास फसतात. गोस्वामी तुलसीदास म्हणतात
साधु-चरित सम सरिस कपासू।
निरस, विसद, गुनमय फल जासू॥
जो सहि दुःख पर छिद्र दुरावा।
वंदनीय जेहि जग जस पावा॥
अर्थात् सज्जन माणसे कापसाप्रमाणे असतात. कापसात रस नसतो पण तो उज्ज्वल आणि रेशायुक्त असतो. कापूस पिंजणे, धुनकणे त्याचे कापड तयार करणे असे कापसाला अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. तरी पण तो उतावीळ होत नाही. तर वस्त्राच्या रूपात जाऊन दुसऱ्याच्या शरीराचे रक्षण करून शोभा वाढवितो.
त्याचप्रमाणे सज्जन माणसेही अनेक कष्ट सहन करीत सदैव परोपकार करीत राहतात. संगतीचा परिणाम प्रत्येक माणसावर होतोच. जशा संगतीत तो राहतो तसेच त्याचे आचरण बनते. ज्याप्रमाणे स्वाती नक्षत्राच्या पाण्याचे थेंब केळीच्या पानावर कापूर आणि सापाच्या मुखात जाऊन विष बनतात. थेंब तोच आहे पण संगतीच्या प्रभावामुळे कापूर आणि विषाचे रूप धारण करतो.
सत्संगती माणसाला विकासोन्मुख करते तर कुसंगती माणसाला विनाशाकडे घेऊन जाते. कुसंगतीमुळेच कर्ण, द्रोणाचार्य, भीष्म, दुर्योधन इत्यादी पतनाच्या गर्तेत, पडले. असे म्हणतात की दुर्जन जरी विद्वान असला तरी त्याचा संग सोडला पाहिजे. मणी धारण करणारा साप भयंकर नसतो का?
विद्यार्थी जीवनात सत्संगतीला विशेष महत्त्व आहे. कुसंगतीत पडल्यास विद्यार्थी हात चोळत बसेल. सत्संगतीत राहील तर कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे मोती बनून सदैव चमकत राहील. मणी आणि विष दोन्ही सापाच्या मस्तकावर विराजमान असतात परंतु मण्यात विषाचा मारक गुण येत नाही.
सापाच्या संसर्गात राहूनही मणी विष ग्रहण करीत नाही तर विषाला नष्ट करते. त्याचप्रमाणे सज्जन दुष्टांच्या संगतीत राहूनही दुष्ट बनत नाही. ईश्वरभक्तांवर कुसंगतीचा काहीही परिणाम होत नाही. वातावरणामुळे प्रभावित होऊनच माणूस सत्संगती किंवा कुसंगतीत सापडतो.
शिक्षेच्या भीतीने दुष्ट माणसाने मार्ग जरी बदलला तरी त्याचा स्वभाव बदलू शकत नाही. स्वभाव परिवर्तन केवळ सत्संगतीमुळेच होणे शक्य असते. गोस्वामी तुलसीदास, रामचरित मानस या ग्रंथात सत्संगतीचा महिमा वर्णन करताना लिहितात बिन सत्संग विवेक न होई। मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद