स्त्री शिक्षणाचे महत्व मराठी निबंध | Stri shikshan kalachi garaj in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्त्री शिक्षणाचे महत्व मराठी निबंध बघणार आहोत. भारतीय संस्कृती खूप प्राचीन आहे. प्राचीन काळात स्त्रीला समाजात सर्वश्रेष्ठ स्थान मिळाले होते. मनु म्हणतो.
“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः।
यत्रात्मस्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफल:क्रिया॥"
अर्थात जिथे स्त्रीची पूजा होते तिथे देवता रमतात. जिथे स्त्रीची पूजा होत नाही तिथे कोणत्याही प्रकारची फलप्राप्ती होत नाही. गार्गी, मैत्रेयी, लीलावती, अत्री, अनसूया या विदुषींना वैदिक काळात शिक्षण मिळाले होते. आपल्या पतीच्या कार्यात त्या त्याच्या बरोबरीने भाग घेत असत.
म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना पुरुषांप्रमाणेच मान होता. म्हणूनच स्त्रीला अर्धांगिनी म्हणण्यात येते. स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे. कोणत्याही प्रकारचे यज्ञ व शुभकार्य पत्नीशिवाय संपन्न होत नाही. उदा. जेव्हा अश्वमेध करण्यात आला तेव्हा रामाने सीतेच्या अनुपस्थितीमुळे तिची सुवर्ण प्रतिमा बनवून यज्ञाची पूर्णाहुती केली.
स्त्रीला मानवी हक्कांपासून वंचित केले जाणे हे इतिहासातील सर्वाधिक दु:खद व आश्चर्यकारक प्रकरण आहे. हजारो वर्षे इतक्या कठीण यातना व घुसमटी स्त्रियांशिवाय क्वचितच इतर कुणी सहन केले असेल. पुराणांत असे उल्लेख सापडतात की, धर्माच्या ठेकेदारांनी स्त्रियांना वेदाध्ययनापासून पूर्णपणे वंचितच केले इतकेच नव्हे तर जर स्त्रीने वेदांचे शब्द ऐकले तर तिच्या कानात वितळलेले शिसे टाकले पाहिजे असे म्हटले आहे.
समाजात स्त्रियांची स्थिती इतकी हीनदीन पण बनू शकते यावर वेदातील उल्लेख पाहिल्यावर विश्वासही बसत नाही. गार्गी, मैत्रेयी, सुलभा, कात्यायनी इत्यादी सुशिक्षित स्त्रिया ऋषिमुनींच्या शंकांचे समाधान करीत. आर्यावर्तातील राजांच्या राण्या धनुर्वेद चांगल्याप्रकारे जाणत होत्या. जर जाणत नसत्या तर युद्धात कैकयी दशरथाबरोबर कशी गेली असती?
काळ बदलत असतो. आपल्या देशावर परकियांचे आक्रमण झाल्यामुळे. स्त्रियांची प्रतिष्ठा घटू लागली. स्त्रियांना आपली मान मर्यादा व सतीत्वाच्या रक्षणासाठी आपले कार्यक्षेत्र केवळ घराच्या चार भिंतीतच मर्यादित करावे लागले.
अनेक वाईट रुढी सुरू झाल्यामुळे आपल्या मुलींना त्यापासून वाचविण्यासाठी बालविवाहाची प्रथा सुरु झाली. अशा अंध:काराच्या युगातही अहिल्याबाई, दुर्गादेवी, कर्मवती आणि लक्ष्मीबाईसारख्या वीरांगनांनीच भारतीय संस्कृती जिवंत ठेवली.
स्त्री ही श्रेष्ठ समाजाच्या सर्जनाच्या प्रक्रियेचा मेरुदंड आहे. योग्य, सुसंस्कृत अपत्ये प्रथम तिच्या पदराखालीच वाढतात. म्हणून तीच त्यांची प्रथम गुरू आहे. गर्भावस्थेपासून वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जे संस्कार माता आपल्या मुलावर करते ते कोणतेही शाळा, महाविद्यालय करू शकत नाही. हेच संस्कार पुढे जीवनभर विकसित होत राहतात. या दृष्टीने स्त्रीचा शिक्षणातील सहभाग नि:संशय उत्कृष्ट आहे.
स्त्री केवळ जन्मदाती नसून ती आपल्या अपत्याचे चारित्र्यही बनविते. उदा. जिजाबाईने शिवाजीवर केलेल्या संस्कारांमुळेच तो इतका श्रेष्ठ राजा बनला. प्रत्येक महान, प्रसिद्ध व्यक्तीच्या मागे स्त्रीचा हात असतो उदा. तुलसीदासाला ईश्वरभक्त बनविण्यात त्याची पत्नी रत्नावलीचा हात होता.
पिढ्यानपिढ्या जीवनमूल्ये पुढे नेण्यासाठी स्त्रीशिक्षण आवश्यक आहे. देशाला स्वतंत्र करण्यात स्त्रियांचा फार मोठा सहभाग होता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर स्त्रियांना उच्च शिक्षणाचे महत्त्व समजले व त्यांनी ते मिळविलेही. सर्वच क्षेत्रांत त्यांनी पदार्पण केले उदा. पोलिस, सेना, वैद्यकीय, शिक्षण, राजकारण इत्यादी.
आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून चालतात म्हणूनच आपण म्हणतो की स्त्रीशिक्षण आवश्यक आहे. सुशिक्षित स्त्री जीवनातील प्रत्येक क्षेत्राची योग्य देखभाल करू शकते. शिक्षण स्त्रियांमधील अवगुण दूर करून गुणांची वाढ करते. उदा. बुद्धिविकास, आरोग्याची काळजी घेणे, गृहस्थ धर्माचे पालन करणे, स्वावलंबन, व्यवहार कौशल्य इ.
स्त्री शिक्षित होताच तिची बुद्धी क्रियान्वित होते. विचारशक्ती वाढते. ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र सर्वांचाच विचार करते. देशाच्या भविष्याचा विचार करते. जेव्हा तिच्या हक्कांवर अतिक्रमण होते तेव्हा ती त्याविरुद्ध आवाज उठविते.
कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्याच्या बऱ्यावाईटाचा विचार करते. अंधविश्वासाच्या मोहात पडत नाही. सुशिक्षित स्त्री ही घर आणि देश यांना जोडणारा प्रगतीचा पूल असतो. सुशिक्षित स्त्री रोग्यावर योग्य प्राथमिक उपचार करू शकते. घरातील प्रत्येकाच्या आरोग्याकडे लक्ष देणे हे तिचे नैतिक कर्तव्य असते.
आहार चौरस असण्याकडे तिचा कटाक्ष असतो. रोग्याच्या व मुलांच्या स्वच्छतेकडे लक्ष पुरविते. मुलांच्या जीवनावर त्यांच्या आईचा पूर्ण प्रभाव पडतो. आई शिकलेली असेल तर मुले पण शिकतील, सभ्य होतील कारण मुलांची पहिली शाळा आईच्या कुशीपासून सुरू होते. मुलांना वाईट संगत लागू नये म्हणून शिकलेली आई काळजी घेते.
आजच्या महागाईच्या काळात स्त्रीने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे फार आवश्यक आहे. अडचणीच्या वेळी, संकटप्रसंगी हेच कामी येते. ती आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकते. आणि समाजात सन्मानाने जगू शकते. शिकलेल्या स्त्रीमध्ये व्यावहारिक कौशल्य असते.
कुणाशी कसे बोलावे, कुणाशी कसा व्यवहार करावा हे तिला कळते. घरगुती कामांतही ती कुशल होते. पुस्तकाच्या आधारे नवे नवे पदार्थ करते. फॅशनचे कपड़े निवडते. घरातील प्रत्येकाच्या सुखदु:खात भागीदार बनते. त्यांच्या समस्या सोडविते. परंतु या सर्व गोष्टी स्त्री शिकली तरच होतील.
कित्येकदा असे दिसून येते की जर घरात एकच स्त्री शिकलेली असेल तर ती अहंकारी असते. नोकरी करीत असेल तर घरातील कोणतेही काम ती करू इच्छित नाही. इतरांवर वर्चस्व गाजविते. घरातील स्त्रिया एकमेकींशी मिळून मिसळून वागल्या नाहीत तर घर नरक बनेल.
शिकलेल्या स्त्रियांचा फॅशन करण्यावर जास्त भर असतो. त्यामुळे बचत कमी व खर्च जास्त होतो. ती पुरुषी कपडे वापरते. स्त्री शिक्षणाचा उद्देश कधीही असा नव्हता तर स्त्रियांचा आत्मिक विकास करून त्यांना स्वावलंबी बनविणे हा होता. जर यात यश मिळाले नाही तर आपण स्त्री शिक्षणाच्या मूळ उद्देशापासून खूप दूर निघून गेलो आहोत असे सिद्ध होईल.
राष्ट्राला स्वावलंबी बनविण्यासाठी स्त्री शिक्षण आवश्यक आहे. राष्ट्र शस्त्रास्त्रांमुळे शक्तिशाली होत नसते तर नैतिक चारित्र्यामुळे होत असते. ईश्वराने या सृष्टीची निर्मिती करून प्रत्येक व्यक्तीला तिच्या क्षमतेनुसार कार्य दिले आहे. अशाप्रकारे ज्या स्त्रीच्या खांद्यावर प्रजापालनरूपी कार्यभार असेल ती स्त्री अशिक्षित असून कसे चालेल?
राष्ट्राला शक्तिशाली बनविण्यात स्त्रीचा विशेष सहभाग आहे. अशिक्षित स्त्री राष्ट्राला दुर्बल करून प्रगतीचे रूपांतर अधोगतीमध्ये करते. राष्ट्राचा चौरस विकास होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात स्त्रीशिक्षण जरुरी आहे. स्त्री ही समाजाचा आधार आहे तर शिकलेली स्त्री संपूर्ण मानवजातीचे भविष्य आहे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद