स्त्री आणि नोकरी मराठी निबंध | STRI AANI NOKARI MARATHI NIBANDH
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्त्री आणि नोकरी मराठी निबंध बघणार आहोत. समाजातात स्त्री आणि पुरुष दोघांचाही अंतर्भाव असतो. दोघांपैकी कुणी एक नसले तरी समाजाच्या अस्तित्वाची कल्पनाच असंभव आहे. त्यामुळेच आपल्या देशात पूर्वीपासून समाजात स्त्रीला उच्च व आदराचे स्थान दिले गेले आहे.
सर्व ऋषिमुनींनी स्त्रीला महत्त्व दिले. काळ हळूहळू बदलतच असतो. देवीच्या सिंहासनावर बसविली जाणारी स्त्री आता घराची शोभा समजली जाऊ लागली. घराच्या चार भिंतीत ती कैद झाली. शिक्षण घेण्याचे तिचे सर्व मार्ग बंद झाले. भारतात स्त्री जागृती एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली.
राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, म. गांधीसारख्या समाजसुधारकांनी स्त्रीला बंधनातून मुक्त करून त्यांना शिक्षण घेता यावे म्हणून चळवळी केल्या. पाश्चात्य देशांतूनही स्त्री जागृतीची प्रेरणा मिळाली. स्त्रीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाज व देशाच्या विकासासाठी प्रभावी भूमिका निभावण्याचा प्रयत्न केला.
रुढीबद्ध जीवनाला तिलांजली देऊन नवयुगाला आव्हान दिले. देशाला स्वतंत्र करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी स्त्री आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रवेश करून आपल्या संघर्षमय स्वरूपाचे दर्शन घडविते. सरकारी आणि खाजगी कार्यालयात पदारूढ होऊन स्त्री आपल्या कार्य कुशलतेची ओळख करून देत आहे.
देशात पंतप्रधानपद प्राप्त करून, राजकारणात प्रवेश करून ती आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पाडीत पुरुषांपेक्षा जास्त आदर प्राप्त करते. उच्च शिक्षण घेऊन, परीक्षेत आपली योग्यता सिद्ध करून, पोलिस, सेना, विमानसेवा, इंजिनियरिंग, विज्ञान, लेखन इत्यादी सर्व क्षेत्रांत स्त्रिया प्रभावशाली भूमिका बजावत आहेत.
आता प्रश्न असा निर्माण होतो की, स्त्रियांना आधीच घरची खूप कामे असतात तरी पण घराबाहेर पडून नोकरी करण्याचा विचार त्यांनी का केला? ही दुहेरी भूमिका त्या का बजावत आहेत? याचे उत्तर आहे. आर्थिक स्वातंत्र्यासाठी इतिहास, साक्ष आहे. की आर्थिक परावलंबन हेच शोषणाचे कारण बनते.
त्यामुळेच स्त्रिया पुरुषांच्या गुलाम बनल्या. घराच्या चार भिंतीत कैद करून त्यांना मानसिक त्रास देण्यात आला. शिक्षण बंद करून त्यांचा बौद्धिक विकास थांबविला का तर त्यांनी पुरुषांच्या बरोबर अधिकार मागू नयेत म्हणून पुरुषाची दासी बनून तिने आपले स्वतंत्र अस्तित्व घालविले. तिला असे वाटू लागले की ती स्त्री म्हणून जन्माला आली हा फार मोठा अपराध झाला.
त्याची शिक्षा हा समाज तिला करीत आहे. शिक्षणामुळे स्त्रियांची विवेकबुद्धी लागृत झाली. तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांना विरोध करून तिने विजय मिळविला. शिकून तिने आपल्या कुटुंबाची प्रगती केली तर नोकरी करून स्त्रीने समाज, राष्ट्र आणि विश्वाची सेवा केली.
लेखिका होऊन आपल्या साहित्य कृतीद्वारे आपल्या बुद्धिकौशल्याचा परिचय करून दिला. भारताच्या पंतप्रधान कै. इंदिरा गांधी यांनी देशाला प्रगतिपथावर नेले आणि जगात भारताची प्रतिमा उज्ज्वल केली. राजकारणातील त्यांची सेवा अमूल्य आहे.
नोकरी केल्यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास जागृत होतो. त्यांचा दृष्टिकोन विशाल होतो. नोकरी करून ती आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते. पूर्वी महागाई कमी असल्यामुळे एकाच्या उत्पन्नावर भागत असे. पण आज ती स्थिती राहिलेली नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पैसा मिळविण्याची वेळ आली आहे. म्हणून आज विवाह ठरविताना मुलगी कमावू शकते किंवा नाही हे पाहिले जाते.
स्त्रिया नोकरी का करतात तर लग्नाआधी पित्याकडे नोकरी करण्याचे स्वातंत्र्य असते, पित्याच्या अकाली मृत्यूमुळे नोकरी करावी लागते, केवळ हौस म्हणून नोकरी करणे, लग्नानंतर संसाराला मदत म्हणून नोकरी करणे, विधवा किंवा घटस्फोटित झाल्यामुळे नोकरी करणे अशा विविध कारणांमुळे स्त्रिया नोकरी करतात.
नोकरी केल्यामुळे समाजातील वाईट रुढींविरुद्ध लढा देण्याचे सामर्थ्य स्त्रियांमध्ये येते. हुंडा प्रथा, बालविवाह, ती रोखू शकते. पतीशी न जमल्यास दु:खी आयुष्य जगण्यापेक्षा त्याला सोडून देणे तिला योग्य वाटते. अंधविश्वासाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडून ती पुरुषाला साथ देते.
स्त्रियांसाठी नोकरी जितकी सुखद आहे तितकीच दु:खदही आहे. कारण आपल्या लहान, तान्ह्या बाळांना पाळणाघरात सोडावे लागते, कृत्रिम दूध आणि नोकरांच्या विश्वासावर सोडलेल्या मुलांचा स्वाभाविक विकास होत नाही. त्यामुळे मुले बिघडतात. वाईट मार्गाला लागतात.
मी नोकरी करते, पैसे कमावते म्हणून घरातल्या प्रत्येकाने माझेच ऐकले पाहिजे असा अहंकार जागृते झाला तर कौटुंबिक संबंध बिघडतात. पतिपत्नी सतत तणावाखाली असल्यामुळे भांडणे होतात व याच वाईट परिणाम मुलांवर होतात. प्रश्न असा निर्माण होतो की, ही समस्या सुटावी कशी?
ही गोष्ट खरी की स्त्रियांनी नोकरी करणे व घर सांभाळणे ही काळाचीच गरज आहे. परंतु हे तेव्हाच शक्य होते जेव्हा पुरुषही स्त्रियांना घर कामांत मदत करतील. संसार रथाची ही दोन चाके आहेत. जर एक चाक खराब झाले तर रथ थांबेल म्हणून स्त्री-पुरुषांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. एकत्र बसून चर्चा करून प्रश्न सोडविले पाहिजेत.
स्त्रियांची नोकरी व्यक्तिमत्त्व विकासासाठी आहे. विघटनासाठी नाही. भारतीय स्त्रीला नोकरीबरोबरच क्षमा, ममता, धैर्य, विनम्रता, त्याग, सहिष्णुता, स्नेहाचे आपले मौलिक रूप सुरक्षित ठेवावे लागेल. नोकरी व कुटुंबात संतुलन ठेवावे लागेल. तरच तिचे कुटुंब, समाज आणि देशाचे भविष्य उज्ज्वल होईल.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद