विज्ञान आणि धर्म मराठी निबंध | VIDNYAN AANI DHRAM ESSAY MARATHI

विज्ञान आणि धर्म मराठी निबंध | VIDNYAN AANI DHRAM ESSAY MARATHI 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विज्ञान आणि धर्म मराठी निबंध बघणार आहोत. विज्ञान आणि धर्म यांच्यातील परस्पर विरोधाला जितकी प्रसिद्धी मिळाली आहे तितकेच ते एकमेकांना पूरक आहेत. दोघेही जीवनाला व सत्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. 


विज्ञानाचा शाब्दिक अर्थ विशेष ज्ञान अर्थात असे ज्ञान जे प्रयोगाद्वारे सिद्ध होते. आणि ज्याचे सार्वभौमत्व सर्वमान्य आहे. धर्म शब्दाची व्युत्पत्ती 'धु' या धातूपासून झाली आहे. ज्याचा अर्थ धारण करणे असा आहे. कोणत्याही वस्तूच्या अस्तित्वाचे जे कारण असते तोच त्याचा धर्म असतो. 


आगीचा धर्म उष्णता देणे आहे कारण उष्णतारहित आग असूच शकत नाही. यासाठी धर्माला जाणणे म्हणजे व्यक्ती, वस्तू आणि भावनांच्या मूळ अस्तित्वाच्या कारणांना जाणून घेण्याचा प्रयत्न. सारांश. विज्ञान आणि धर्माचे ऐक्य हा विवादाचा विषय होऊ शकत नाही.


सत्य काय आहे हे जाणण्यासाठी अनेक मार्गांनी जावे लागते. विज्ञानाचा मार्ग निरीक्षण, परीक्षण, वस्तुनिष्ठा, चिंतन आणि धर्म, आस्था, अंतर्दृष्टी, व्यक्तिनिष्ठा, चिंतन आणि विश्वासाच्या आधारे पुढे जाणे असा आहे. विज्ञानाचे क्षेत्र मूलतः भौतिक आहे तर धर्माचे क्षेत्र आध्यात्मिक आहे. 


शास्त्रज्ञ जगात भौतिक सुखसमृद्धी आणण्याचा प्रयत्न करतो. तर धर्मगुरू जगातील लोकांना आत्मिक सुख व मानसिक शांती देण्याचा प्रयत्न करतो सारांश, विज्ञान आणि धर्म मानवी जीवन अधिक सुखमय बनविण्याचा प्रयत्न करतात. धर्म मृत्यूनंतरही आत्म्याच्या गरजेकडे लक्ष ठेवतो.


विज्ञान आणि धर्माची जगाकडे पाहण्याची दृष्टी भिन्न आहे. विज्ञानासाठी सांसारिक जीवन हेच अंतिम सत्य आहे आणि त्याची सुखसमृद्धी म्हणजेच सर्व काही आहे तर धर्मानुसार हे जग नश्वर असून सांसारिक जीवनातील सुखे महत्त्वपूर्ण नाहीत. जीवन ही मोक्ष प्राप्त करण्याची एक संधी आहे असे धर्म मानतो. 


शास्त्रज्ञ दुसऱ्या कोणत्याही जीवनाची कल्पना करीत नाही. धर्मगुरूसाठी पारलौकिक सुखच महत्त्वाचे आहे. शास्त्रज्ञ बाह्य जीवन सुखमय कारण्याचा प्रयत्न करतो तर धर्मगुरू आंतरिक जीवनाला सुखमय करण्याचा प्रयत्न करतो आणि जगाला समाधान आणि संयमाची शिकवण देतो.


मानवी जिज्ञासेतूनच विज्ञान आणि धर्माची उत्पत्ती झाली. आपल्या चोहोबाजूस जगात जे घडत आहेत ते का आणि कसे घडते हे जाणण्याच्या इच्छेनेच विज्ञानाला जन्म दिला. निरीक्षण, परीक्षण हे शास्त्रज्ञांचे साधन होते म्हणून प्रथम वस्तूंच्या भौतिक रूपाकडे त्यांची शास्त्रज्ञाची दृष्टी गेली, तर्क विश्लेषण प्रयोग व विवेचनावर आधारित विज्ञानाचा मार्ग शंकेच्या मदतीने पुढे जातो. 


ब्रह्म, जीव, जगत, मायेच्या स्वरूपाला जाणून घेण्याच्या जिज्ञासेने धर्माच्या अनेक रूपांना जन्म दिला. कारण धार्मिक शोधाचे साधन वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ होते आणि अनुभव, आस्था, विश्वास आणि अंतर्दृष्टी निष्कर्षापर्यंत जाण्यास मदत करीत होती. म्हणून हे स्वाभाविक होते की धार्मिक लोक कधीही कोणत्याही विषयावर एकमत होऊन निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत.


विज्ञान आणि धर्म दोघेही मानवाच्या विकासास साह्यकारी आहेत. प्राचीन काळापासून आजपर्यंत कधी धर्माचे तर कधी विज्ञानाचे पारडे जड झाले. धर्माने मनुष्याला चांगला मनुष्य बनण्यास मदत केली तर विज्ञानाने त्याच्या भौतिक गरजांची पूर्ती करून त्याचे जीवन सुखमय बनविले.


प्राचीन काळातील भारतात धर्म आणि विज्ञानाचे स्वरूप सारखेच होते. ऋषिमुनींच्या आश्रमात विज्ञान आणि धर्म दोघांनाही सारखेच समजण्याचा प्रयत्न केला जाई. असे कोणतेही उदाहरण दाखविता येत नाही की जे विज्ञान आणि धर्माला वेगळे करीत असेल. 


कदाचित् हेच आमच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य असेल. परंतु आधुनिक विज्ञानाचा जन्मदाता युरोप आहे. युरोपात विज्ञानाला खूप विरोध झाला. धर्माच्या नावावर ब्रुनो, गॅलिलियो, कोपर्निकसला शिक्षा करण्यात आली. डार्विनचा विकासवादाचा सिद्धांत धर्मविरोधी असल्याचे घोषित करण्यात आले. 


विज्ञानातील अनेक शोध धार्मिक विकासाविरुद्ध होते म्हणून धर्म पंडितांनी विज्ञानाला सैतानाची विद्या म्हटले. एकीकडे विज्ञान आपल्या भौतिक वादाच्या मस्तीत धर्माच्या सर्व मान्यता खोट्या ठरवू लागले तर दुसरीकडे धर्माच्या नावावर स्वार्थाने विज्ञानाला तुडविण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे विज्ञान आणि धर्म दोन विरोधी जीवन दृष्टीच्या रूपात दिसू लागले.


सृष्टीची यांत्रिक व्याख्या केल्यामुळे आरंभकाळातील शास्त्रज्ञांना असा विश्वास वाटला की सृष्टीचे रहस्यही यांत्रिक सूत्रांच्या आधारावर शोधता येते आणि जर कोणी परमेश्वर असेल तर तो सृष्टीचा सर्वात मोठा गणितज्ञ आहे. जो सृष्टीला कार्यकारण शृंखलेत बांधून चालवीत आहे. 


निसर्गात सर्व काही नियमित आहेत आणि प्रत्येक वस्तूच्या भूत आणि वर्तमानाचे अध्ययन करून त्याचे भविष्य कळू शकते. निसर्गात सर्व काही पूर्वनिर्धारित आहे. आवश्यकता केवळ ते सिद्धांत आणि त्या सूत्रांचा शोध लावण्याची आहे. ज्याच्या आधीन सृष्टी व्यापार चालू आहे. परंतु काळाबरोबर शास्त्रीय मान्यता बदलू लागल्या. 


न्यूटनने लांबी रुंदी आणि जाडी यावर आधारित सृष्टीचा विचार केला. परंतु आईनस्टाईनने सृष्टीचा विचार लांबी, रुंदी जाडी किंवा उंची आणि काळ याच्या आधाराने केला. काळ स्वीकारल्यामुळे स्मृती आणि कल्पनेचा विज्ञानात प्रवेश झाला. आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार वस्तुमान आणि ऊर्जा परिवर्तनशील आहे. 


वास्तविक जगातील सर्व पदार्थ सर्व व्यापी ऊर्जेच्या विभिन्न स्तरीय घनीभूत रूपात आहेत. आधुनिक विज्ञानही "सर्वम खलाविदम, ब्रह्मम" चा सिद्धांत स्वीकारते. फरक हा आहे की विज्ञान ब्रह्मासाठी ऊर्जा या शब्दाचा वापर करते. अशा प्रकारे अत्याधुनिक विज्ञान धर्म आणि तत्वज्ञानाच्या निकट जात आहे आणि मूळ धार्मिक मान्यतांचा होणारा विरोधही कमी होत आहे. 


विज्ञान आणि धर्म दोघेही जगाला माया समजतात.  विज्ञान आणि धर्म दोघांचाही दुरुपयोग होऊ शकतो. विज्ञानाच्या मदतीने एखादी व्यक्ती सामान्य लोकांना मूर्ख बनविते. विज्ञानाच्या, शोधामुळे अनेक दुर्घटनाही झाल्या. उदा. अणुबाँब टाकल्यामुळे हिरोशिमा-नागासाकी नष्ट झाले. धर्म अज्ञानाच्या अंध:कारात अंधविश्वासाला जन्म देतो.


धर्माच्या नावावर अनेक धर्मगुरू सामान्य लोकांना मूर्ख बनवितात. धर्माच्या नावावर रक्तपात, शोषण, हिंसा झाली व होत आहे. जगातील सर्व धर्म शांती आणि बंधुत्वाचा संदेश देतात. विज्ञान आणि धर्माचा दुरुपयोग थांबविण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.


विज्ञान आणि धर्म मानवतेच्या रथाला पुढे नेणारी दोन चाके होत. त्यांचे ऐक्य ओळखण्याची आवश्यकता आहे. दोघांपैकी कुणा एकाची निवड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मानवतेच्या विकासासाठी पूर्ण सत्याच्या शोधासाठी दोघांचे मिश्रण होणे आवश्यक आहे. 


फक्त विज्ञान माणसाला यंत्र बनवील तर फक्त धर्म माणसाला अज्ञानाच्या आणि रुढी परंपरेच्या गर्तेत ढकलू शकतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद