आज गौतम बुद्ध अवतरले तर ! मराठी निबंध | AAJ GAUTAM BUDDHA AVTARLE TAR ESSAY MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आज गौतम बुद्ध अवतरले तर मराठी निबंध बघणार आहोत. रविवारचा दिवस होता. रामप्रहरी रामाचं नाव घ्यायचं सोडून मी वर्तमानपत्रातील ताज्या, खमंग नि खुसखुशीत बातम्यांचा समाचार घेत होते. वाचता वाचता एका वार्तेने माझे लक्ष वेधून घेतले.
अमेरिका इराक संघर्षासंदर्भात २९ मार्च रोजी वाशीम येथे एक चर्चासत्र घेण्यात आले होते. चर्चासत्राचा सूर होता, 'आज युद्ध नको, बुद्ध हवा.' खरं तर सद्य परिस्थितीत कोट्यावधी लोकांना हेच वाटतंय. 'यदा यदा हि धर्मस्थ ग्लानिर्भवति भारत ! अभ्युत्थानमधर्मस्य तदाऽत्मानं सृजाम्यहम् ।।' या भगवंताच्या वचनाची पूर्ती होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
आर्त स्वरातील ही साद देव ऐकेल? देव करो, नि असंच होवो. करुणानिधी बुद्धदेवा, आज जगाला तुमची नितांत आवश्यकता आहे. तुम्ही अवतरायला हवं, अवतरायलाच हवं. आज गौतमबुद्ध अवतरले तर! चराचर सृष्टी आनंदाने मोहरून जाईल. आकाशातील देव 'बुद्ध' शब्दाचा ध्वनी करतील.
त्यांच्या बालरूपाला मांडीवर घेऊन धरणीमाता रोमांचित होईल. नद्या अंगाईगीत गातील. वारा मंद मंद झोके देईल. ज्ञानसूर्य उगवलेला पाहून सूर्याच्या नेत्रांचं पारणं फिटेल. इडापिडा टळतील. अमंगल पळेल.
सुगतांचा पुनर्जन्मावर विश्वास असो वा नसो, शुद्धोदन नि महामाया त्यांचं मातृपितृपद भूषविण्यासाठी पुन्हा जन्म घेतील. त्या महात्म्याची सहधर्मचारिणी होण्याची सुवर्णसंधी राणी यशोधरा मुळीच दवडणार नाही आणि पुत्र राहुल? पित्याचं आध्यात्मिक धन वारसा हक्काने आपल्याला मिळावं म्हणून त्यांच्या भेटीला नक्कीच येईल. त्यांचा आवडता सेवक छन्न सुद्धा त्यांच्या सेवेत अहर्निश तत्पर राहील.
पण बुद्धदेवांचं काय ? वाळवंटाएवढं दुःख सोसून हास्य नि अणूंच्या पार गेलेल्या 'तथागतांना पुन्हा गर्भवासाच्या नरकयातना भोगाव्या लागतील. 'हिंसाचार, अनाचार, भ्रष्टाचार । हाच आजचा शिष्टाचार ।' झालेला पाहून त्यांचं कोवळं अंतःकरण पिळवटून जाईल.
दूरदर्शनमुळे जगातील यच्चयावत दुःखांचा परिचय त्यांना शैशवावस्थेतच होण्याचा संभव आहे. न जाणो, ते बोबड्या वाणीने सांगतील, 'सलवं दुःथं दुःथं, सलवं छनिकम् छनिकम्' ध्रुवबाळाच्या वयाचे असतानाच परिव्रज्या घेतील नि तपश्चर्येला बसतील.
२५०० वर्षांपूर्वी शाक्य आणि कोलीय या दोन राज्यात रोहिणी नदीच्या पाण्यावरून संघर्ष उद्भवला तेव्हा सिद्धार्थाने सांगितले होते, ‘युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही' आज विश्वयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता उद्भवली असताना शांतीचे उद्गाते यापेक्षा वेगळं काय सांगणार?
सत्ययुग असो वा कलियुग सज्जनांशी निष्कारण वैर करणारे दुर्जन भेटणारच. भगवान बुद्धांचीही त्यातून सुटका नाही. विरोध, टीका, निंदा, अपमान यांचा पदोपदी सामना करावा लागेल. आपण लावलेल्या अहिंसेच्या रोपांच्या जागी हिंसाचाराचं तण वाढलेलं पाहून ते काही काळ निराश, किंकर्तव्यमूढ होतील.
दुःखात सुख म्हणजे आधुनिक भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांनी भारतीय समाजात केलेली नैतिक समाजक्रांती. आपल्या भाकितानुसार मैत्रेय बुद्ध डॉ. आंबेडकरांच्या रूपाने उदयास आले, त्यांनी धम्मकार्यास गतिशील केले. दलितांना अवनतिपंकातून बाहेर काढले हे पाहून परम संतोष वाटेल.
सत्त्व परीक्षेला उतरल्यानंतर विरोधकांना गौतम बुद्धांची, त्यांच्या शिकवणीची चाड वाटू लागेल. ते अंगुलीमालाप्रमाणे शरण येऊन सन्मार्गाचा स्वीकार करतील. असंख्य अनुयायी त्यांनी दाखविलेल्या वाटेने मार्गस्थ होतील. मूठभर मोहयांसाठी दारोदार फिरणाऱ्या मातेचे सांत्वन केले जाईल. पंचशीलात आणखी एका नियमाची भर पडेल, 'दूरदर्शन पाहू नये .'
त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन सारं जग त्या पावन चरणांशी लोळण घेईल. जगातील सर्वोच्च 'नोबेल पुरस्कारा' ने त्यांचा सन्मान केला जाईल. नव्हे, नोबेल पुरस्कारालाच पुरस्कृत झाल्यासारखं वाटेल.
अहिंसेचे वारे वाहू लागतील. शांतीचे मळे फुलतील, सत्याला आश्रयस्थान मिळेल, भोगवाद्यांना त्यागातील आनंद कळेल. दुर्व्यसने देशोधडीला लागतील. सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो, चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. पण बुद्ध मात्र स्वयंतेजाने दिवसरात्र सतत प्रकाशित राहील.
बुद्धगयेचा बोधिवृक्ष पुलकित, पल्लवित होऊन गुणगुणू लागेल. “मोगरा फुलला, मोगरा फुलला फुले वेचिता बहरु, कळियासी आला" मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद