भाव तेथे देव मराठी निबंध | Bhav Tethe Dev Marathi Essay
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भाव तेथे देव मराठी निबंध बघणार आहोत. “उठा लवकरी, जेवा झडकरी माझी माता घरी, वाट पाहे ॥" लहानगा नाम्या देवाजवळ हट्ट धरून बसला होता. नैवेद्याचे ताट समोर असूनही देव हालेना, बोलेना की जेवण्याचे चिन्ह दिसेना. नाम्याचा जीव कासावीस झाला. वदन म्लान झाले.
आसवांचे मोती गालावरून ओघळू लागले. बालकाचा तो शुद्ध, निरागस भाव पाहून विठुमाऊलीला कौतुकाचे भरते न आले तरच नवल. मग काय विचारता ! पाषाणाची ती मूर्ती सगुण, साकार झाली आणि भराभरा जेवू लागली. नामदेवाच्या मुखातही घास भरवू लागली. 'योगिया दुर्लभ' असा महन्मंगल योग चिमुरड्या नाम्याने साधला.
भगवंताचे उच्छिष्ट सांडून पुलकित झालेल्या भूमीचा कणन् कण तेव्हा नक्कीच गुणगुणत असेल, 'भाव तेथे देव, भाव तेथे देव' भाव आणि देव ! एका नाण्याच्या दोन बाजू ! 'चंदु तेथ चंद्रिका, शंभु तेथ अंबिका, संत तेथ विवेका' किंबहुना ‘सूर्य तेथ प्रकाशु' असणारच. तव्दत भाव तेथे देव राहणारच.
श्री गोंदवलेकर महाराजांचं वचन आहे, " जो निरंतर रामनाम घेतो, त्याच्या दारात मी कुत्र्यासारखा लोळत असतो." श्री गजानन महाराजांनीही बंकटलालाच्या निमित्ताने समस्त भक्तांना अभिवचन दिल आहे. "भावभक्तिनाणियावरी, संतुष्ट मी राहातसे.” वत्सल माता तान्हुल्याला क्षणभरही विसंबत नाही. देवही भक्तापासून विभक्त राहू शकत नाही.
शाहीर राम जोशी मठाची उठाठेव करणाऱ्यांना उपदेश करतात, 'भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा' हा पाहुणा भक्ताचं उणं पाहत नाही. पाहुण्यासारखा तर मुळीच वागत नाही. त्याने जनाबाईबरोबर ओव्या गात दळण कांडण केल्याचं, तिची लुगडी धुतल्याचं सर्वश्रुतच आहे.
त्या दयाघनाने एकनाथांकडे पाणी भरलं आणि काय गंमत आहे पहा ! स्वतःच्याच पूजेसाठी चंदन उगाळलं. धर्मराजाने यज्ञात ज्याला अग्रपूजेचा मान दिला तो भक्तवत्सल उष्टी काढण्यातही अग्रेसर होता. कबीराला शेले विणण्यास मदत करणाऱ्या भगवंताने चोखोबाची गुरे पण राखली आणि सजन कसायाबरोबर मांस विकताना त्याला घृणा वाटली नाही.
भक्ताचं हलकं सलकं कामही तो आनंदाने, निरपेक्षपणे, निरनसतेने करतो. त्याला हवा असतो फक्त भक्ताचा भाव आणि भावच ! ‘पाहुणा' म्हटल्यावर ‘पाहुणचार' आलाच. त्याची आवडती पक्वान्ने कोणती, माहीत आहे? सुदाम्याने त्याला मूठभर कोरडे पोहे दिले, विदुरपत्नीने त्याच्यासाठी कण्या रांधल्या, शबरीने उष्टी बोरे अर्पण केली तर गोपालांनी दहीभात भरविला.
द्रौपदीचे भाजीपान खाऊन त्याने तृप्तीची ढेकर दिली नि कवराची भाजीभाकरी मि क्या मारत खाल्ली. या सर्व सामान्य' उपहारात ‘असामान्य' भक्तीचा ओलावा होता हे विसरून चालणार नाही.या भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या आश्वासनाची प्रचीतीच येथे येते नाही का?
सृष्टीच्या कणाकणात नारायण भरलेला आहे हा भक्त प्रल्हादाचा दृढ भाव. त्यामुळे संकटांचे पहाड कोसळले तरी त्याच्या केसालाही धक्का लागला नाही. त्याच्या संरक्षणासाठी साक्षात परमेश्वर स्तंभातून प्रगट झाला.
घनघोर अरण्यात तपश्चर्या करताना ध्रुव बाळाच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता कारण त्याचा परमेश्वर त्याच्या अत्यंत निकट म्हणजे हृदयात होता. म्हणूनच देवाने 'महान' असा 'लहानहट्ट' (बालहट्ट पुरवून त्याला अढळपद दिले.स्वदेश, कर्तव्य, मातापिता, गुरू, अतिथी, समाज, निसर्ग अशा विविध रूपांनी तो नटलेला आहे.
म्हणूनच “कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र, तारे कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे" असा विलक्षण अनुभव कवीला येतो. एक कृष्णभक्त होती. एका गोल दगडाची (ज्याला ती 'गोलमटोल' म्हणायची) ती कृष्णभावाने भक्ती करायची. तिला कृष्णदर्शन झाले तेव्हा तिने काय वर मागावा?
"तू खरा कृष्ण असशील तर मला गोलमटोलच्या रूपात दर्शन दे" कृष्णाने तिची मागणी पूर्ण केली हे सांगणे न लगे. तात्पर्य, 'भाव तेथे देव जाई, न लगे करणे आमंत्रण'. परमार्थात भावाला किती 'भाव' आहे हे सांगताना तुकडोजी महाराज म्हणतात,
'मनी नाही भाव म्हने देवा मला पाव ।
देव अशाने भेटायचा नाही रे ।
देव बाजारचा भाजीपाला नाही रे ।'
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद