दैवायत्तं कुले जन्म मराठी निबंध | devayat kule janma mayat essay in marathi

 दैवायत्तं कुले जन्म मराठी निबंध | devayat kule janma mayat essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण दैवायत्तं कुले जन्म मराठी निबंध बघणार आहोत. उपेक्षा आणि दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेला महारथी कर्ण ! 'सूर्यपूत्र' असूनही क्रूर नियतीने 'सूतपुत्र' म्हणूनच जगाला त्याची ओळख करून दिली; परंतु जन्मतःच सूर्याच्या तेजाचा, पराक्रमाचा वारसा मिळालेल्या कर्णाने काढलेले उद्गार अत्यंत तेजस्वी आहेत. तो म्हणतो -


"सूतो वा सूतपुत्रो वा, यो वा को वा भवाम्यहम् ।

 दैवायत्तं कुले जन्म, मदायत्तं तु पौरुषम् ॥"


कर्णाच्या या उद्गारांवरून त्यावेळी जरी त्याचा उपहासच झाला तरी त्यातील सत्य निर्विवाद आहे. कोणत्या कुळात जन्म व्हावा हे व्यक्तीच्या स्वाधीन नाही. कर्तृत्व गाजविणे मात्र त्याच्या हाती आहे. कुळाबरून व्यक्तीचा मोठेपणा ठरायला लागला तर कर्तृत्वाला तिलांजली द्यायची की काय? सद्गुणांकडे डोळेझाक करायची ? त्रिवार नाही. मग कुळाची थोरवी कशाला गायची?


“जन्मा येणे दैवाहाती, करणी जग हासवी गाता का मग कुलथोरवी ?" या कवीच्या प्रश्नाला आपल्या जवळ काही उत्तर आहे? 'नर करणी करे तो नरका नारायण हो जाय' हे काय आम्हाला माहीत नाही? मग वागण्यात अशी विसंगती का?


काळ्याकुट्ट मेघातून कडकडाट करीत तळपणारी चपला तेजस्वी नाही असं कोण म्हणेल ? चिखलात उमलणाऱ्या कमळाला तुच्छ समजणारा अरसिक अजून तरी जन्माला आला नसावा. कोहिनूर कोळशाच्या खाणीत सापडतो म्हणून त्याच्या धवलत्वाला बाधा येत नाही. 


समुद्रातील खाऱ्या पाण्यात, क्षुद्र अशा शिंपल्यात गवसणारा मोती काय कमी मौल्यवान असतो? समुद्रमंथनातून प्राप्त झालेले अमृत मधुरच होते ना ! एकाच सागरातून प्राणघातक असं हलाहल आणि अमरत्व प्रदान करणारं अमृत निघालं. रावण आणि बिभीषण ! कुळ समान असलं तरी त्यांची वृत्ती समान नव्हती. 


दोहोत जमीन अस्मानाचं अंतर होतं. बिभीषण रामाचा भक्त होता तर रावण कट्टर शत्रू. हिरे आणि गारा एकाच खाणीत सापडतात. म्हणून गारेला हिऱ्याची किंमत थोडीच मिळणार आहे ! फूल आणि काट्याचंच पाहा ना ! “है जनम लेते जगहमें एकही एकही पौधा उन्हें है पालता । 


रातमें उनपर चमकता चाँदभी एकसी ही चाँदनी है डालता ॥" एकच झाड त्यांना जन्म देते. पण फूल आपल्या सुगंधाने, सौंदर्याने सर्वांना आनंद देते. तर काटा मात्र "प्यार डुबी तितलियोंका पर कतर भौर का है बेध देता श्याम तन"


त्यामुळे त्याच्या वाट्याला सदैव तिरस्कारच येणार ! फुले ईश्वराच्या मस्तकावर विराजमान होतात तर काटे पायदळी तुडविले जातात. तात्पर्य, तुमचा जन्म कोणत्या कुळात, जातीत झाला याला महत्त्व नाही. श्री ज्ञानेश्वरांना पुढील पंक्तीतून हाच अभिप्राय व्यक्त करायचा आहे.


"म्हणौनि कुळ जाती वर्ण। 

हे आघवेचि गा अकारण ॥"


भक्त प्रल्हादाचा जन्म राक्षस कुळात झाला पण भगवंताने घोर संकटातही त्याचे रक्षण केले. याउलट क्रूर हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी त्याने रौद्ररूप धारण केले. सुग्रीव व वाली भाऊ-भाऊ ! पण सुग्रीवाला रामाचे प्रेम, मैत्री लाभली तर वालीला रामबाणाने मृत्यू आला.


चोखा महार, गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी, नरहरी सोनार, सजन कसाई, रोहिदास चांभार इत्यादी संतांना उच्च कुळात जन्म घेण्याचे भाग्य लाभले नाही; परंतु आज ते सर्व मानवजातीला वंद्य आहेत. गोरखनाथ उकिरड्यावर जन्मले, भर्तरीनाथ भिक्षापात्रातून जन्माला आले आणि कानीफनाथ हत्तीच्या कानातून अवतीर्ण झाले. तथापि त्यांनी केलेलं कार्य अलौकिक आहे म्हणूनच गुणांची पूजा करा, कुळाची नव्हे. सुभाषितकार म्हणतात - “गुण : 


सर्वत्र पूज्यन्ते पितृवंशो निरर्थकः । 

वासुदेवं नमस्यन्ति वसुदेवं न मानवाः॥"


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद