परीक्षेतील प्रदूषण निबंध मराठी | Essay on Examination System in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण परीक्षेतील प्रदूषण मराठी निबंध बघणार आहोत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार स्थापित झालेल्या क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमाच्या मूल्यमापनासाठी प्रचलित परीक्षापद्धती अपुरी आहे. सदय शिक्षणपद्धतीत 'परीक्षा घेणे' हा अपरिहार्य भाग आहे.
मूल्यमापनाशिवाय शिक्षणाच्या परिमाणाचे मोजमाप कसे होणार? पण 'कुंपणच शेत खाऊ लागते' या न्यायाने या परीक्षापद्धतीतच भ्रष्टाचार वाढला तर ! हे परीक्षांतील प्रदूषण कोण थांबवणार?
असे हे प्रदूषण आताच का वाढू लागले आहे? पूर्वी हे प्रदूषण होते का? या प्रश्नांची उत्तरे देणे अवघड आहे. पण एक नक्की की, वाममार्गाने गुण वाढवण्याचे हे प्रकार मात्र वाढतच आहेत. नवे नवे मार्ग त्यासाठी अवलंबले जात आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, आपण आपली नीतिमूल्ये हरवून बसलो आहोत.
काहीही कष्ट न करता उत्तम यश मिळावे, ही अपेक्षा आपण बाळगतो आणि त्यासाठी नवे नवे वाममार्ग शोधतो. परीक्षेतील गुणांना आलेले अवाजवी महत्त्वही या प्रदूषणाला कारणीभूत होते. आपल्या देशात, विशेषतः शिक्षण क्षेत्रात फार जीवघेणी स्पर्धा आहे. इच्छित विभागात प्रवेश मिळावा, यासाठी मोठी स्पर्धा असते.
अगदी एखाददुसऱ्या गुणानेही आपला क्रमांक गमवावा लागतो. त्या शिक्षणावर भावी आयुष्यातील भरभराट काही अंशी अवलंबून असल्याने, या ना त्या मार्गाने गुण वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि परीक्षेत प्रदूषण निर्माण होते.
सध्या आपल्या देशात बोकाळलेली भ्रष्टाचारी वृत्तीसुद्धा परीक्षेतील प्रदूषणाला जबाबदार आहे. क्षुल्लक आर्थिक फायदयासाठी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न फोडणे, मिळालेल्या गुणांची नोंद करताना जाणूनबुजून गफलत करणे, एखादया खऱ्या विदयार्थ्याऐवजी दुसऱ्याच विदयार्थ्याने परीक्षेला बसणे, सामुदायिक कॉपीला प्रोत्साहन देणे, या साऱ्या वाईट गोष्टी परीक्षेतील प्रदूषणाला कारण असतात.
तेव्हा आता या सैतानाला कसे गाडावे, याचा विचार व्हायला हवा. या प्रदूषणाला काही अंशाने आपली परीक्षापद्धतीही जबाबदार आहे. वर्षभराच्या अभ्यासाचे गुणांकन तीन तासांत लिहिलेल्या उत्तरपत्रिकेवरून केले जाते. त्यामुळे परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप निश्चित केलेले असते.
मग शाळा, महाविदयालये, खाजगी वर्ग येथे परीक्षेची प्रश्नपत्रिका कशी असेल आणि ती सोडवायची कशी, याचाच अभ्यास होतो. विदयार्थी हा ज्ञानार्थी ' न राहता ' परीक्षार्थी' होतो. हा या परीक्षापद्धतीचा मोठा दोष आहे.
ठरावीक पद्धतीच्या लेखी परीक्षांच्या बरोबरीनेच तोंडी परीक्षा, बुद्धिमापन चाचणी, प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्पयोजना, साप्ताहिक / पाक्षिक चाचण्या, अंतर्गत मूल्यमापन वगैरे विविध प्रकारच्या परीक्षापद्धती उपयोगात आणता येतील का, हे पाहिले पाहिजे. पण परीक्षेला बसणाऱ्या विदयार्थ्यांची लाखोंची संख्या ही अशा विविध परीक्षापद्धतींच्या मार्गातील अडथळा ठरेल.
म्हणजे विदयार्थ्यांची संख्या आटोक्यात आणणे हे पहिले पाऊल ठरेल. शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता दिली तरच ही संख्या आटोक्यात आणता येईल. तेव्हा, शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची असेल व त्यासाठी परीक्षापद्धतीत सुधारणा करायची असेल तर स्वायत्ततेचा गंभीरपणे विचार करावा लागेल. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद