मैत्री वर निबंध | Essay On Friendship In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मैत्री वर मराठी निबंध बघणार आहोत. सहवासातून प्रेम निर्माण होते, ही समजूत तितकीशी खरी नसते. वर्षानुवर्षे एकमेकांच्या सहवासात राहणाऱ्या माणसांच्यात स्नेह, जिव्हाळा निर्माण होतोच असे नाही.
प्रश्न असतो तो परस्परांची मने जुळण्याचा! जिवाभावाचे मित्र अनेक वर्षांनी भेटले, तरी सर्व उपचार विसरून पटकन आपुलकीच्या स्तरावर येतात. माधवची आणि माझी जिवाभावाची दोस्ती जमेल, ही गोष्ट कुणी सांगूनही खरी वाटली नसती.
अर्थात या मैत्रीचे सारे श्रेय माधवलाच आहे. कारण दुर्गुणांपलीकडे लपलेले माझे गुण माधवने ओळखले होते. एकदा वर्गात मी आमच्या मॅडमच्या चिरक्या आवाजाची नक्कल करत होतो. नेहमीप्रमाणे माधव पुस्तकात डोके खुपसून बसला होता. पण मी नक्कल इतकी हुबेहूब वठवली होती की, गंभीर स्वभावाचा माधवसुद्धा पुस्तकाआडून खुदकन हसला.
वर्गात आमचा दंगेखोर मुलांचा एक गट होता. आमच्या खोड्यांना अगदी ऊत येत असे. सर त्रासले की, आम्हांला खूप मजा वाटे. एकदा सरांनी याचे उट्टे काढायचे ठरवले. A त्यांनी सगळ्या वर्गाला एक अवघड गणित सोडवायला दिले.
सगळ्या मुलांची त्या गणिताशी झटापट चालली होती. अगदी माधवलासुद्धा गणित सोडवता येईना. सरांनी मला फळ्याशी बोलावून फळ्यावर गणित सोडवण्यास सांगितले. त्यांना माझा वर्गासमोर अपमान करायचा होता. मी हातात खडू घेतला आणि झरझर गणित सोडवले.
माझी प्रत्येक पायरी बरोबर होती. गणिताचे उत्तरही बरोबर होते. सर आश्चर्यचकित झाले. मी हळूच माधवकडे बघितले. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू दिसले. माझ्या मित्रांनी तर माझ्याकडून पार्टीच घेतली. आम्ही कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसलो असता अचानक माधव तेथे आला. आम्हांला आश्चर्य वाटले.
आम्ही त्याला खायचा आग्रह केला. पण त्याने साफ नकार दिला. माझ्याकडे पाहून तो म्हणाला, "अभिनंदन, तू हुशार आहेस." आणि पटकन निघून गेला. तेव्हापासून त्याच्या-माझ्यात थोडेफार बोलणे होऊ लागले. पण तो काही उपदेश करू लागला की, 'उगीच डोस पाजू नकोस' असे म्हणून मी त्याला उडवून लावत असे. पण तो कधीही माझ्यावर रागावत नसे.
परीक्षा जवळ आली होती. महत्त्वाच्या नोटस् देण्यासाठी सरांनी रविवारी जादा तास घेतला होता. मी नेहमीप्रमाणे दांडीच मारली. दुसऱ्या दिवशी कसली तरी सुट्टी होती. माधव सकाळीच माझ्याकडे आला. माझ्यापुढे वही धरत माधव प्रेमाने म्हणाला, “कालच्या नोटस् तुझ्याकरता लिहून आणल्या आहेत. वाचून ठेव. महत्त्वाच्या आहेत. वाचशील ना!"
एकदा बाबा बाहेरगावी गेले होते. छोट्या राजूला ताप भरला होता. आई, आजी आणि माझ्याबरोबर माधवही रात्रभर राजूच्या उशाशी जागत बसला होता. आता आमच्या घरीही तो सर्वांचा आवडता झाला आहे. तो कृश आहे. म्हणून आजी त्याला 'सुदामा' म्हणते.
माधवमुळे मी मन लावून अभ्यास करू लागलो. मला ८० टक्के गुण मिळाले. सरांनी माझी पाठ थोपटली. कौतुकातला आनंद तेव्हा मला कळला. हे सारे माधवमुळे घडले याची मला जाणीव होती.
त्याच्यामुळे माझ्या पायाखालच्या वाटेने एक सुंदर वळण घेतले होते. स्वाभिमान, सज्जनपणा, आत्मसन्मान अशा कितीतरी गोष्टींशी माधवने माझी ओळख करून दिली आणि माझे आयुष्यच बदलले. मित्र असावा तर असा! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद