गुरुपौर्णिमा निबंध मराठी | Essay on Gurupaurnima in Marathi

 गुरुपौर्णिमा निबंध मराठी | Essay on Gurupaurnima in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गुरुपौर्णिमा मराठी निबंध बघणार आहोत. आषाढमासातील पौर्णिमेची पहाट. उत्तराषाढा नक्षत्र सुरू होतं. पराशर ऋषर स्नान करून गुहेत परतले. प्रसूतिवेदनांनी व्याकुळ झालेली सत्यवती स्नानासाठी यमुनातीरी आली. 


वेदना असह्य होऊन तिने नदीच्या किनाऱ्यावर पाठ टेकली आणि यमुनामाईच्या साक्षीने एका अद्भूत बालकाने या विश्वात पदार्पण केले. कोऽहं, कोऽहं असा रुदनध्वनी ऐकू येण्याऐवजी ओकांराचा अमृतमधुर स्वर माता सत्यवतीच्या कानावर आला. 


जन्मल्याबरोबर प्रणवाचा उच्चार करणारं ते दिव्य बालक म्हणजेच पराशरपुत्र भगवान व्यास ! 'कृष्णद्वैपायन', 'बादरायण', 'वेदव्यास' म्हणूनही ते विश्वाला परिचित आहेत. मातापित्याच्या प्रेमळ छायेत सत्यवतीचा लाडका 'कृष्ण' दिसामासाने वाढत होता. ज्ञानसागरात निमज्जन करीत होता. 


ज्ञानावतारच तो! त्याच्या बुद्धीला अगम्य, अनाकलनीय ते काय असणार? अल्पावधीतच पित्याजवळील ज्ञानभांडार त्याने आत्मसात केले. पण विश्वोद्धाराची तळमळ त्याला स्वस्थ बसू देईना. शेवटी सत्यवतीचा निरोप घेऊन पितापुत्रांची ही जोडी पृथ्वीभ्रमणासाठी निघाली.


घोर तपश्चर्येला सखोल अध्ययनाची जोड मिळाली. श्रीव्यासांनी वेदांचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद असे विभाजन केले आणि वैशंपायन, पैल, जेमिनी व सुमंतू या जणू चार वेदासमान असलेल्या शिष्यांद्वारे वेदातील ज्ञान लोकांपर्यंत पोचविले. 


अठरा पुराणे, उपपुराणे, ब्रह्मसूत्रे, बृहद्व्यासस्मृती, लघुव्यासस्मृती इत्यादी ग्रंथांची निर्मितीही बहुजनहिताय, बहुजन सुखाय झाली. 'पंचम वेद' म्हणून गौरविल्या गेलेलं महाकाव्य 'महाभारत' साकार झालं. १८ पर्वांनी युक्त असा हा ग्रंथराज अखिल विश्वाला ललामभूत ठरला. 


तो केवळ कौरव पांडवांच्या युद्धाचा इतिहास नसून सर्व शास्त्रांचे दिग्दर्शन करणारा एक सांस्कृतिक ज्ञानकोषच आहे म्हणा ना ! 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' हा ज्ञान माऊलीचा अभिप्राय म्हणजे त्याच्या सर्वसमावेशकतेची पावतीच नाही का?


महाभारताची थोरवी आणखी एका परीने महान आहे. श्रीव्यासांनी मनातल्या मनात संपूर्ण ग्रंथाची योजना तर केली. पण तो लिहून काढण्यास योग्य लेखनिक पृथ्वीतलावर दिसेना. आणि काय अहो भाग्य ! विद्यानिधी श्रीगणराज ग्रंथलेखनास तयार झाले. 


सरस्वती नदीच्या तीरावर, व्यासाश्रमाच्या अंगणात, ब्रह्मर्षीची काव्यसरिता दुथडी भरुन वाहू लागली. तीन वर्षेपर्यंत श्रीगणेश तिला अक्षरांचा बांध घालीत होते. असे अपूर्व भाग्य वाट्याला येणारा ग्रंथ ‘यासम हा'च ! महाभारताची इतिश्री झाली पण श्रीव्यासांच्या जीवनकार्याची इतिश्री व्हायची होती. 


तृषार्ताची ज्ञानपिपासा तृप्त करूनही श्रीव्यास अतृप्त होते, अस्वस्थ होते. 'भगवंताच्या निर्मळ यशाचे वर्णन केल्याशिवाय मनःशांती लाभणार नाही' हे रहस्य त्यांना उमगले. भगवान श्रीकृष्णांच्या मनोहर लीलांचे रसाळ वर्णन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. बहुमोल रत्नांच्या हारात ‘भागवत' रूपी मेरुमणी गुंफला गेला. श्रीव्यास कृतकृत्य झाले.


“वेदः पुराणं काव्यं च प्रभुर्मिप्रियावच ।

 बोधयन्तीह प्राहुस्त्रिभिर्भागवतं पुनः॥"


भागवतात वेदांची आज्ञा, पुराणांचा मित्रवत सल्ला आणि काव्याचा पतिव्रतेप्रमाणे उपदेश यांचा मधुर त्रिवेणी संगम झालेला आढळून येतो. भक्तिरसाने ओथंबलेला हा ग्रंथराज समस्त भक्तांच्या गळ्यातील कंठमणी होऊन बसल्यास नवल नाही. । 


स्वर्गातील ज्ञानगंगा पृथ्वीतलावर आणून सर्वसामान्यांच्या मुखी घालण्यासाठी साक्षात भगवंत व्यासरूपाने अवतरले. त्यांनी केलेल्या कार्याने त्यांना अजरामर केलं, चिरंजीव केलं. आपलं संपूर्ण जीवन ज्ञानदानाकरिता वेचल्यामुळे जगद्गुरू' होण्याचा मान त्यांना मिळाला. 


त्यांच्या जन्माने पुनीत, प्रकाशित झालेली आषाढी पौर्णिमा 'व्यासपौर्णिमा' म्हणून साजरी व्हावी आणि त्या दिनी समस्त गुरूजनांप्रति कृतज्ञता प्रगट करावी हे योग्यच आहे. विश्ववंद्य व्यासांच्या चरणी हे भावपुष्प अर्पण करुन नतमस्तक होऊ या. 'नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे ।' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद